धार रोडवरील कचरा डेपो तात्काळ हटवा अन्यथा तीव्र जनआंदोलन..प्रहार जनशक्ती पक्षाचा इशारा
परभणी,दि 27 (प्रतिनिधी)ः परभणी शहराच्या वस्तीमध्ये सुरु असलेला धार रोड वरील कचरा डेपो तत्काळ स्थलांतरित करावा अशी मागणी आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्याकडे एका निवेदना द्वारे करण्यात आली आहे.
परभणी शहरातील घनकचऱ्याचे नवीन जागी व्यवस्थापन करण्यासाठी परवानगी मिळावी या साठी दि. १९ मे २००७ रोजी परभणी शहर महानगरपालिकेने केलेल्या अर्जानुसार महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने दि. ०७ जून २००७ रोजी परभणी तालुक्यातील गंगाखेड रोड वरील बोरवंड खुर्द येथे गट न. २६ मध्ये घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी परवानगी दिलेली आहे. यानंतर वेळोवेळी या परवाण्याचे नुतणीकरण ही करण्यात आले. परवानगीला जवळपास १४ वर्ष उलटुनही परभणी शहर महानगरपालिकेने धार रोड वरील कचरा डेपो बोरवंड येथे स्थलांतरीत केलेला नाही. महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार कचरा हा लोकवस्तीपासुन किमान ८ ते १० कि.मी. अंतरावर नेऊन जमा करून मग प्रक्रिया करावा असे स्पष्ट निर्देश आहेत. बोरवंड येथे घनकचऱ्यावरील प्रक्रिया करण्यासाठी लागणारी यंत्रणा तयार आहे. असे असतांनाही महानगरपालिका प्रशासनाच्या कारभारामुळे कचरा डेपो परभणी शहराच्या वस्तीमध्येच बिनदिक्कत सुरु असलेला धार रोड वरील कचरा डेपो तत्काळ स्थलांतरित करावा अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदना द्वारे करण्यात आली आहे.
या बाबत परभणी महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभांमध्ये अनेकवेळा ठराव पास करण्यात आले व डेपो स्थलांतरित करण्याबाबत कालावधी पण निश्चित करून दिलेला आहे असे असताना देखील महानगरपालिका प्रशासनाने धार रोड वरील कचरा डेपो स्थलांतरीत केलेला नाही, प्रत्यक्षात परवानगी नसतांना ही धार रोड वरील कचरा डपोवर परभणी शहरातील संपूर्ण कचरा जमा करण्यात येतो परंतु कागदोपत्री मात्र बोरवंड येथील घनकचरा व्यवस्थापन केंद्रावर कचरा साठवून त्यावर प्रक्रिया केली जाते असे खोटे दाखवण्यात येत आहे. धार रोड वरील कचरा डेपो हा शहरवस्ती अंतर्गत असुन हा रस्ता ८ ते १० गावांना शहराशी जोडणारा मुख्य मार्ग आहे त्यामुळे या कचरा डेपोच्या दुर्गधीचा त्रास व आरोग्यास धोका निर्माण होत असल्याबाबत शहरातील नागरीक व संबंधीत गावाच्या नागरीकांनी अनेक वेळा तक्रारी केल्या तरीही महानगरपालिकेने हा अनाधिकृत कचरा डेपो बंद केलेला नाही .
परभणी शहर महानगर पालिका प्रशासन निर्देश देऊन हा अनधिकृत कचरा डेपो तत्काळ स्थलांतरित करावा.
दिलेल्या निवेदनाच्या तारखेपासुन १५ पंधरा दिवसाच्या आत धार रोड वरील अनाधिकृत कचरा डेपो तात्काळ बंद करुन बोरवंड येथे हलविण्यास परभणी महानगर पालिका प्रशासन असमर्थ ठरत असेल तर अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मोठे जनआंदोलन उभे केले जाईल व त्यावेळी उदभवणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नाबाबत परभणी शहर महानगरपालिका प्रशासन जबाबदार असेल असे ही या निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, तालुका प्रमुख बालासाहेब तरवटे, युवा आघाडी तालुका प्रमुख शिवाजी चव्हाण, शेतकरी आघाडी तालुका प्रमुख नारायण ढगे, दिव्यांग आघाडी तालुका प्रमुख ज्ञानेश्वर पंढरकर, मीडिया प्रभारी नकुल होगे, झरी सर्कल प्रमुख श्याम भोंग, मंगेश वाकोडे, गजानन तरवटे इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत.