नांदेड येथे भाजपा तर्फे लसीकरणासाठी मदतकार्य सुरू
नांदेड/गजानन जोशी
नांदेड शहरात कोव्हाक्सिनचा दुसरा डोस घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक केल्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांची कुचंबणा होत असून त्यांच्या सुविधेसाठी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर व जिल्हाध्यक्ष प्रवीण साले यांच्या नेतृत्वाखाली भाजपा नांदेड महानगर तर्फे मोफत ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी पुंडलिकवाडी येथील भाजपा कोविड वॉर रूम मध्ये दररोज दुपारी २ ते ४ या वेळात नागरिकांनी प्रत्यक्ष उपस्थित रहावे असे आवाहन भाजपा जिल्हा सरचिटणीस धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर आणि वॉर रूम प्रमुख केदार नांदेडकर यांनी केले आहे.
नागरिकांनी नोंदणीसाठी येताना आपले आधार कार्ड तसेच मोबाईल घेऊन येणे अनिवार्य आहे. भाजपा वॉर रूमचे स्वयंसेवक कीर्ती छेडा, गजानन जोशी, राज यादव व इतर पदाधिकारी नियोजित वेळेत ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी 100% प्रयत्न करणार आहेत. ज्या ज्येष्ठ नागरिकांना ऑनलाईन नोंदणी करता येत नाही.तसेच ज्यांचा कोव्हाक्सिनचा दुसरा डोस घेणे बाकी आहे अशानीच प्रत्यक्ष वॉर रूम वर यावे. दिव्यांग अथवा वयोवृद्ध नागरिकांच्या वतीने त्यांचे प्रतिनिधी देखील नोंदणीसाठी येऊ शकतात. जे ज्येष्ठ नागरिक अथवा त्यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष येणार नाहीत त्यांची ऑनलाइन नोंदणी करणे शक्य होणार नसल्यामुळे कृपया कोणीही मोबाईल वरून संपर्क करू नये. भाजपा वॉर रूमच्या माध्यमातून आत्तापर्यंत पंधराशे कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध करून देण्यात आले. 52 रुग्णांचे खाजगी रुग्णालयातील बिल कमी करून देण्यात आले आहे. वॉर रूम मधील स्वयंसेवकांनी कोविड आपत्कालीन परिस्थितीमध्ये 2348 नागरिकांचे मोबाईल उचलून योग्य ते मार्गदर्शन केले आहे. याशिवाय आधार गरजूंना या उपक्रमांतर्गत 28 हजार रुग्णांच्या नातेवाईकांना जेवणाचे डबे पुरवण्यात आले आहेत. सेवा ही संघटन उपक्रमांतर्गत गेल्या 64 दिवसापासून लसीकरण घेणाऱ्या नागरिकांना मास्क, सॅनिटायझर, पाण्याची बॉटल व बिस्किट देणे सुरू आहे.आता नागरिकांची लसीकरणाची प्राथमिकता विचारात घेऊन ऑनलाइन मोफत नोंदणी करण्याचे काम भाजपाने हाती घेतले आहे.तरी या संधीचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घेऊन लसीकरण मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन दिलीप ठाकूर व केदार नांदेडकर यांनी केले आहे.