नेवासा तालुक्यात शेतकऱ्यांना अजूनही पावसाची प्रतीक्षा
अमोल मांडण
नेवासा,दि 15 ः
नेवासा तालुक्यातील अनेक भागात अजूनही पावसाचे आगमन नसल्याने शेतकऱ्यांचे डोळे आता पावसाकडे लागले आहे. चांदा,चिलेखनवाडी, प्रवारासंगम, बेलपिंपळगाव, सुरेगाव, खूपटी, सोनई, शिरजगाव या भागात अजूनही शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत आहे.नेवासा तालुक्यातील अनेक भागात पावसाचे आगमन झाले नसल्याने खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना अडचणी येत आहे.पाऊस नसल्याने खरीप हंगाम लांबणीवर पडतो की काय अशी चिंता शेतकऱ्याला लागली आहे.
खरिपाच्या पेरणीसाठी शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे.इतर भागात चांगला पाऊस पडतो.गेल्या दोन दिवसांपासून जोरदार वारे वाहत आहे.खरीप हंगामासाठी महागडे बी- बियाणे व जादा पैसे देऊन खते खरेदी करून ठेवले आहे.तर काही शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली आहे.पावसाची अशीच निराशाजनक परिस्थिती राहिली तर खर्च वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. सर्व परिसरातील शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीत असताना पावसाने मात्र पाठ फिरवली आहे. मुळाचे आवर्तन चालू झाल्याने काही काळ पिके वाचवण्यासाठी प्रयत्न केला जातो.पण मुळा उजवा कालव्याचे आवर्तन बंद झाल्यानंतर बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते.त्यामुळे शेतकऱ्याला पावसाच्या पाण्याची वाट पाहत बसावे लागत आहे.
हवामान खात्याने या वेळेस सांगितले की, पावसाळा वेळेवर येणार त्यामुळे तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी बी-बियाणे,खते सर्व आधीच जमा करून ठेवले.पाऊस वेळेवर येणार म्हणून आणि ऐन पेरणीच्या वेळेस पाऊसच नसल्याने सर्व शेतकरी चिंतेत आहे.आता त्यांना एकच चिंता खात आहे की, पाऊस कधी पडणार,पेरणी करायची का नाही करायची.पेरणी केल्यानंतर पाऊस जर वेळेवर नाही पडला तर पिके वाया जाण्याची भीती त्यामुळे शेतकरी द्विधा मनस्थितीत गुंतला आहे. आधीच कोरोनाच्या महामारी ने शेतकऱ्याचे पार कंबरडे मोडले आहे.आता पावसाचा पण शेतकऱ्यांना फटका बसणार असेच वाटत आहे.अनिल शिंदे,शेतकरी, सुरेगाव.