पांढऱ्या सोमवारी

0 244
             “अवं बापू, कुठे चाललाय बिगीबिगी” म्हणत पारावर बसलेल्या नाम्यानं बापूंचा रस्ता अडवला. बापू बटण दाबल्यावाणी खटकन तिथंच उभं राहिलं. “का रं नाम्या? एखांदं माणूस चांगल्या कामाला जाताना उगाच आडवूनि. किती वेळा सांगितलं तुला… पण तू काय सुधरत नाहीस”. “आता विचारलंस म्हून सांगतो ….चाल्लूय आक्कीला स्थळ बघाया”. नाम्या जरा चाचपडला पण….. धीर धरून बोलला,” बापू कंच्या गावचं पावणं म्हणलात??” बापू म्हणाले,” आरं मर्दा लांब मिरजंकडलं हैती पावणं.. बगून तर येतू. पुढचं पुढं….” ” बरं जावून या” असं म्हणत नाम्यानं पैरण झाडत  घरचा रस्ता पकडला आणि बापू एस् टी् स्टॅंडकडे  निघाले .दोन वर्स झाली आक्कीचं लगीन करायचं ठरवून. ‘आक्की दिसायला काळीसावळी पण कामाला वाघ ‘.आजकाल समद्यांना गोरी बायकू पायजे.कुठनं आणायच्या गोऱ्या पोरी? आरं गुण  बघा म्हणावं….. बापू मनाशी पुटपुटतच रस्ता चालत होते.
                 तवर देवळाम्होरं  सूऱ्या म्हणजे गावातला हरहून्नरी पोरगा भेटला. गेल्याच वर्षी एका अपघातात आईबाप दगावलं. साऱ्या गावानं त्याला जणू दत्तक घेतलं. सूऱ्याबी समद्यांयची कामं हासतंच करायचा. नाही हा शब्द त्याला माहीतच नव्हता. त्यामुळे हे पोरकं पोर गावात सगळ्यांचंच लाडकं होतं. बापू  म्हणले,” सूऱ्या येतूस का रं वाईच माझ्यासंग?? जाऊ जरा मिरजेकडं.
आक्कीला स्थळ सांगून आलंय. जाऊन येऊ”. सूऱ्या एका पायावर तयार झाला. दोघं बी झपझप एस् टी् गाठायला पळाले.बापूरावांची आक्की लई गुणाची पोर.गावातंच बारावीपातूर शिकली आन   बापूरावांच्या बायकूनं म्हणजे सगुणाबाईनं बापूरावांच्या मागं टुमणं लावलं,”आवं,पोरगी न्हातीधूती  झालीया आता लग्नाचं बगूया”. बापूरावांनाही ते पटलं. त्यांनी सगळ्या पाहुण्यांना आक्कीचा बायोडेटा पाठवला न्  चांगलं  स्थळ सुचवायला सांगितलं  होतं.स्थळं आली बी दोन चार पण आक्कीचा सावळा वाण बगून फुढं होकार देत नव्हती.बापूंना आक्कीचं असं प्रदर्शन करणं मनाला पटत नव्हतं. ती नाराज झालेली बी त्यांना पाहवत नव्हतं.
        काय करावं? एवढी गुणाची पोर पण रंगावरनं डावलली जातीय.सूऱ्या न् बापू स्टॅंडवर पोचताच एस्.टी. आली.दोघंबी आत चढले नि कंडक्टरनं बेल मारली.एस्.टी.चालू झाली  त्या संग बापूंचं विचार- चक्रही चालू झालं,” ह्या बी  पोरानं नाकारलं तिला  तर कसं हूयाचं? ती बी  कंटाळलीय  सारखं पावण्यापुढं बसायला! बोलून दाखवत नाही, पण तिचं मन वळाकलंय आपण. कितीबी खर्च येऊदे लग्नात पण जोरातच करायचं लगीन.लेक एकुलती एक आपली. लाडाकोडात वाढलेली.इतक्यात कंडक्टरनं बेल मारून  शेवटचा स्टॉप पुकारले. धोतर सावरत बापू सूऱ्यासंग खाली उतरले.मुलाचा बा स्टॅंडवर न्यायला आला होता.तो सरळ घरीच घेऊन गेला. बापूंनी मुलाचं घरदार ,परिवार पाहिला. अगदी  मनाजोगं स्थळ होतं, पण बापूंना लेकीच्या पसंती विषयी शंका आली.बोलता बोलता विषय निघाला आणि सोबत आणलेला बर्‍यापैकी दिसणारा तिचा फोटो त्यांनी त्या सर्वांना दाखवला.सर्वांच्या तोंडावर स्मित पाहून बापू मुलाकडे बळून म्हणाले,” खर्चाला हात मागं नाही घेणार. कधी येताय मुलीला बघाया ?लग्नात चार चाकी बी देऊ. मुलगा आणि मुलाच्या बापाच्या तोंडाला पाणी सुटले. बघून घेऊ मुलगी काळीसावळी असली तर काय झालं?? चारचाकीही मिळणार. त्यांनी पुढच्या आठवड्याची तारीख मुलीला पाहायला येतो म्हणून सांगितले.
           यथावकाश मुलगी पसंत करून लग्नाची तारीख ठरली. आज आपणास चार चाकी मिळणार म्हणून जावईबापू मांडवाच्या दरवाजाकडे तोंड करून बसले. मंगलाक्षता पडल्या. गाडी आता दिसेल मग दिसेल शेवटी पावणं न् पावणं निघून गेलं. मग जावईबापू नाराज झाले. त्यांनी बापाच्या कानात काहीतरी पुटपुटले. वरबाप बापूरावाकडे आला आणि म्हणाला,” पावणं लग्नात चारचाकी द्यायचं कबूल केलं होतं…. अजून दिसेना ती! तशी बाबुराव खो खो करत सातमजली हसले आणि म्हणाले आणू की  पांढऱ्या सोमवारला.काय घाई आहे!! मुलाकडली माणसं “ही काय भानगड” म्हणून एकमेकांकडे बघत राहिले. इतक्यात बापूरावांनी सूऱ्याला डोळ्याने ईशारा केला. सुऱ्या गेला नि चार चाकाची बाबा गाडी ढकलत घेऊन आला आणि बोलला, “बापू ही बघा चारचाकी”.आता मात्र वऱ्हाडी मंडळीत हवा पिकला.वर नि वरबापही त्यात सामील झाले.आक्कीला हा काय प्रकार आहे ते समजेनाच. बापूरावांनी आक्कीकडे बघून हळुच डोळा मिचकावला नि आक्कीही त्या हश्यात सामील झाली.

 

bharti sawant
सौ.भारती सावंत
मुंबई
9653445835
error: Content is protected !!