पाणीपुरवठा, अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेले आंदोलन मुख्याधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने मागे

0 152

सात महिन्यांपासून पालिका कर्मचारी पगाराविना 
माजलगांव, प्रतिनिधी – नगर पालिकेतील पाणीपुरवठा, अग्निशमन दल विभागातील कर्मचाऱ्यांच्या मागील सात महिन्यापासून पगार न झाल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे . कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांना वारंवार मागणी करूनही पगार न दिल्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी गुरुवारी सकाळपासून कामबंद आंदोलन सुरु केले होते; परंतु लॉकडाऊनच्या काळात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी मुख्याधिकारी, पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्याने हे आंदोलन तात्पुरते मागे घेतले आहे.
कोरोनाचा फैलाव वेगाने वेगाने होत असल्याने संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आल्याने सर्व नागरिक घरात बसलेले आहेत. अशा परिस्थितीत अत्यावश्यक सेवेत येणारे सर्वच अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर येऊन काम करत नागरिकांना सुविधा पुरविण्याचे काम करतात, त्यांना किमान त्यांच्या कामाचा मोबदला तरी वेळेवर देणे गरजेचे आहे .
माजलगांव नगर पालिकेतील पाणीपुरवठा विभागातील १९ कर्मचारी, तर अग्निशमन दल विभागातील १५ असे एकूण ३४ कर्मचाऱ्यांचे मागील सात महिन्यापासून पगार केलेले नाही.पगार नसतानाही या कर्मचाऱ्यांनी लॉकडाऊनच्या काळातही जीव धोक्यात घालून शहरातील पाणीपुरवठा नियमित सुरु ठेवला होता; परंतु पालिकेच्या मुख्याधिकाऱ्याकडे वारंवार मागणी करुनही पगार दिले नाही.
यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याने त्यांनी कामबंद आंदोलनाचे हत्यावर उपसले आहे. गुरुवारपासून पाणीपुरवठा आणि अग्निशमन दल विभागातील कर्मचारी कामावर न जाण्याचा निर्णय घेतला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊन असून, अशा परस्थितीत पाणी बंद झाल्यास नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी दुपारी मुख्याधिकारी, पाणीपुरवठा सभापती, पदाधिकारी यांनी मध्यस्ती करून कर्मचाऱ्यांना विनंती केली. यामुळे नगरपालिका कर्मचाऱ्यांनी सकाळपासून पुकारलेले कामबंद आंदोलन मागे घेतले आहे.

काही कारणामुळे संबंधित कर्मचान्यांच्या पगारी रखडल्या असून येत्या चार ते पाच दिवसात त्यांच्या पगारी देण्यात येणार आहेत.

– भागवत बिघोत, मुख्याधिकारी

सध्या लॉकडाऊन असल्याने – आमच्या आंदोलनाने नागरिकांची गैरसोय होईल ती टाळण्यासाठी आंदोलन तात्पुरते मागे घेतले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या वेळेत पगार न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्यात येईल.

-बजरंग पांचाळ, नगरपालिका कर्मचारी, माजलगांव

error: Content is protected !!