पाण्याविना हाल , रस्त्यावर कचरा ,नाल्याही तुंबल्या
नागरिक म्हणतायेत पालिकेला कोणी वाली आहे का राव ?; पद बदलीचे नाटक खेळून पुढारी झाले गायब
माजलगांव,(धनंजय माने):- माजलगांव नगर परिषद म्हणजे आतून गोंधळ बाहेरून तमाशा या म्हणीनुसार आपलं अस्तित्व दाखवून आहे.सतत राजकीय डावपेचात मशगुल असणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे शहराच्या समस्यांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे शहरवासीयांचे पाण्याविना हाल होत आहेत.रस्त्यावर कचऱ्याचे ढिगारे वाढत आहेत , तर गल्लोगल्ली तुंबलेल्या नाल्या मुळे घाणीचे साम्राज्य वाढत आहे अशा परिस्थितीत नागरिकांना पालिकेला कोणी वाली आहे.
का राव ? असा आर्त टाहो काढावा लागत आहे . दरम्यान रिक्त झालेल्या नगराध्यक्ष पदावर पद बदलीचे राजकारण खेळून पुढारी मात्र गायब झाले आहेत.
शहरातील कोणत्याही ही वार्डात गल्लीत नजर टाकली तर त्या गल्लीत तुंबलेल्या नाल्या दिसून येतात . गल्लोगल्लीत येणाऱ्या कचरा गाड्या १५ दिवसांच्या अंतराने गल्लीत येत असल्याने कचऱ्याचे ढिगारे रस्त्यावर आपली दुर्गंधी पसरवीत पालिकेची कर्तबगारी दाखवून देत आहेत.तर पिण्याचे पाणी पंधरा दिवसांनी आपली हजेरी लावत असल्याने जनतेला धरण उशाला असूनही पाण्याविना
तडपडण्याची वेळ सोसावी लागत आहे.या सर्व नागरी समस्यांचा उच्चांक माजलगांव नगर परिषदेने गाटला असला तरी वॉर्ड वॉर्डातून जनतेचे नेतृत्व करणारे पदाधिकारी मात्र निवडून देणाऱ्या जनतेकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत आहेत.
पावसाळी वातावरणामुळे शहरात घाण , दुर्गंधी मुख्य रस्त्यावरील पाणी रोगराईला निमंत्रण देत असून कोरोना महामारीच्या संक्रमण काळात शहराची अशी होत असलेली वाताहत नागरिकांच्या जीवितासी खेळ खेळत आहे.रोगराईचा राक्षस जनतेच्या डोक्यावर घोंगावत असला तरी अधिकारी , पदाधिकारी राहिलेल्या दीड वर्षात पालिकेत पडून असलेल्या कोट्यावधी रुपयाची विल्हेवाट लावून आपल्या पदरात काय पाडून घेता येईल यावर डोकं लावत असल्याचे बोलल्या जात आहे.
दरम्यान जनतेच्या समस्याचा निवारा करण्यासाठी रिक्त झालेल्या चाऊस यांच्या नगराध्यक्ष पदावर सौ मुंडे यांच्याकडे नगराध्यक्षपदाचा पदभार देण्यात येत असल्याचा हवाला पुढाऱ्यांनी दिला होता.पुढाऱ्यांचे नाटक उघडं पडलं आहे.नागरी समस्या वाढती आहे.पुढारी गायब आहेत.अधिकारी – कर्मचाऱ्यांचा अवमेळ , नगरसेवकांचे दुर्लक्ष अशा परिस्थितीत नागरिकांना पालिकेला कोणी वाली आहे का राव ? असं म्हणत टाहो फोडण्याची वेळ आली आहे .
स्वाभिमानी च्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी दुधदरासाठी महादेवाच्या पिंडीला केला दुधाचा अभिषेक