पुण्याचा निर्धार- कोविडवर प्रहार
कोविडची (कोरोना) महामारी पुणे जिल्ह्यात आणखी काही काळ राहणार आहे. अशा परिस्थितीत जो पर्यंत महामारीचे प्रमाण कमी होत नाही तोपर्यंत सर्वांनीच दक्ष आणि सक्रिय राहणे गरजेचे आहे. सर्वांनी सर्व ठिकाणी योग्य पध्दतीने मास्क (मुखपट्टी) वापरणे, गृह विलगीकरणात राहणाऱ्या पॉझिटीव्ह तसेच संपर्कातील व्यक्तींनी सर्व खबरदारी घेणे. या व्यक्तींना इतरांनी सहकार्य करणे. मोठी दुकाने, मॉल, कार्यालये येथे कमीत कमी गर्दी होईल याची काळजी घेणे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे लक्षणे आढळली तर भीती न बाळगता तपासणी व उपचार करुन घेणे. या पंचसूत्रीचा अवलंब केला तर कोरोनाचा यशस्वीपणे मुकाबला करता येवू शकतो.
उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील कोविड व्यवस्थापनाचा नियमित आढावा घेण्यात येतो. विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रमकुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील, माजी आरोग्य महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे, डॉ. दिलीप कदम यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी यामध्ये सहभागी होत असतात. कोविडचाही प्रतिकार करायचा आणि कोविड पश्चात कृतीयोजनेकडेही लक्ष द्यायचे असे दुहेरी आव्हान सर्वांसमोर आहे. याअंतर्गतच शिवाजीनगर येथील जम्बो कोविड रुग्णालय, अण्णासाहेब मगर क्रीडांगणावरील जम्बो रुग्णालय, नायडू हॉस्पीटल, बाणेर येथील कोविड रुग्णालय आणि ससून सर्वोपचार रुग्णालय या 5 ठिकाणी पोस्ट कोविड ओपीडी सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
कोविड पश्चात समुपदेशन (पोस्ट कोविड कौन्सिलिंग)- सामाजिक गरजा, साधनसामुग्री व्यवस्थापन, नावीन्यपूर्ण व कल्पक उपक्रम आणि वॉर्डनिहाय गरजांचे मूल्यांकन करुन टास्क फोर्सच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी स्थानिक जनतेच्या गरजा ओळखून हा कार्यक्रम निश्चित करण्यात येत आहे.
कोविडचा (कोरोना) आजार हा ३ ते ४ आठवड्याचा आजार आहे. ३ आठवड्यापर्यंत अक्यूट कोविड इलनेस व त्यानंतर पोस्ट कोविड इलनेस असे वर्गीकरण करण्यात येते. रोग प्रतिकारक शक्तीमध्ये बदल होतो आणि त्याचा परिणाम फुफ्फुसावर होवून फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी होते. आजार बरा झाल्यानंतरही कोविडचे दुष्परिणाम पुढे बरेच दिवस दिसून येतात. या दुष्परिणामांवर करावयाचे उपचार म्हणजे कोविड पश्चात समुपदेशन (पोस्ट कोविड कौन्सिलिंग). कोविड आजारातून बरे झाल्यानंतर अंदाजे 10 टक्के रुग्ण इतर काही आजार अनुभवतात. त्यामध्ये धाप लागणे, थकवा येणे, तणाव जाणवणे यांचा समावेश होतो.
महत्त्वाचे बदल– रुग्णाच्या मानसिक आरोग्यात बदल होतो, स्वभावात बदल होतो, चिडचिडेपणा वाढतो. सामाजिक बदल होतो, जवळचे नातेवाईक, मित्र भेटू शकत नाहीत यामुळे एकटेपणाची भावना निर्माण होते. शारीरिक बदल होतो, फुफ्फुसाची क्षमता कमी होते. ऑक्सिजनची आवश्यकता लागते, त्यामुळे रुग्ण मानसिकदृष्ट्या खचतो. रक्ताभिसरणामध्ये गुंतागुंत होते. त्यामुळे नियमित तपासणी करणे आवश्यक आहे. थकवा व निरुत्साह जाणवतो. वजन व आहार कमी होतो, त्यामुळे मानसिकदृष्ट्या आत्मविश्वास गमावतो.
आवश्यक उपाययोजना– रुग्णाला प्रथिनेयुक्त आहार, जीवनसत्व व खनिजे यांचा पुरवठा आवश्यक असून फुफ्फुसाचा व्यायाम तसेच नियमित व्यायामाची गरज आहे. वैद्यकीय देखरेखीखाली उपचार, फिजीओथेरपी आवश्यक आहे. टास्क फोर्सने पोस्ट कोविड ओपीडी सर्व डीसीएच (समर्पित कोविड हॉस्पीटल) स्तरावरील रुग्णालयात सुरु करणे, पोस्ट कोविड हेल्पलाईन सुरु करणे, कोविडनंतर उद्भवणाऱ्या सर्व प्रकारच्या आजारांची माहिती एकत्रित करणे बाबत सुचना केल्या. पोस्ट कोविड ओपीडीच्या पथकामध्ये क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ / मानसोपचारतज्ज्ञ / सल्लागार, चेस्ट फीजीशियन, जनरल प्रॅक्टीशनर, फिजिओथेरपिस्ट, आहारतज्ञ, डेटा संकलक आणि प्रत्येक विभागातील तज्ञ यांचा समावेश असेल.
प्रत्येक कोविड रुग्णाला डिस्चार्ज होण्यापूर्वी एक दिवस अगोदर प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन समुपदेशन सत्रामध्ये कोविडनंतरच्या दिनक्रमाबाबत माहिती व मार्गदर्शन देण्यात येईल. योग्य व नियोजित आहार, व्यायाम, प्राणायाम याबाबत मार्गदर्शन देण्यात येईल. मानसिक स्वास्थ्य सुदृढ, निरोगी आणि सकारात्मक विचार टिकवण्यासाठीच्या उपक्रमाबाबत तज्ञांकडून विशेष मार्गदर्शन व सल्ला देण्यात येईल. रोज एका कोविड केंद्रावर समुपदेशक आणि मोटीवेशनल स्पीकर सत्र घेतील. पुणे शहरातील कोविड सेंटरसाठी 30 ते 40 समुपदेशक काम करतील. या समुहात तज्ञ डॉक्टर्स, मानसोपचार तज्ञ, तज्ञ समुपदेशक, समाजकार्यातील पदव्युत्तर व्यक्तींचा समावेश असेल. कोविड आजारातून बरे झाल्यानंतर 28 दिवसांनंतर प्लाझ्मा दानाबाबत त्यांना योग्य मार्गदर्शन करुन तयार करण्यात येईल.
ऑक्सिजन उत्पादन व वितरण- पुणे विभागात एकूण ३३० ते ३५० मेट्रिक टनची मागणी असून ११० ते १३० मेट्रिक टन एलएमओ ठाणे व रायगड जिल्ह्यातून मागविण्यात येतो. तसेच मे. आयनॉक्स एअरप्रोडक्ट्स, चाकणची पूर्वीची क्षमता १४९ मे. टनावरून १६५ मे. टन वाढविण्यात आली आहे. ३५०० नवीन ऑक्सिजनच्या सिलेंडरची संख्या वाढविण्यात आली. ऑक्सिजनचा वापर नियमित ३० टक्के वैद्यकीय व ७० टक्के औद्योगिक (सद्यस्थिती ८० टक्के वैद्यकीय व २० टक्के औद्योगिक) असा आहे. औषध विभागातील १४ नोडल ऑफिसरची नेमणूक ऑक्सिजन उत्पादकाच्या स्तरावर करण्यात आलेली आहे. मुंबई येथे २४ x ७ कंट्रोल रूम स्थापन करण्यात आली आहे. तसेच ऑक्सिजन वाहतुकीसाठी ३२ टँकरची व्यवस्था केलेली आहे. एअर लिक्विड, चाकण या कंपनीचे उत्पादन ऑक्टोबरमध्ये सुरु होणार आहे. एअर लिक्विड कंपनीकडून २ टँकर ऑक्सिजन पुरवठ्यासाठी वापरण्यात येतात. सर्व उत्पादकांना ऑक्सिजनचे दैनंदिन उत्पादन व वितरणाचा तपशील दररोज सकाळी १० वाजता ईमेलद्वारे पाठविणे बंधनकारक केलेले आहे. औषध निरीक्षकांमार्फत ऑक्सिजन उत्पादन व वितरण यामध्ये संनियंत्रण सुरु आहे. ऑक्सिजनची कोठेही कमतरता नाही. ऑक्सिजनच्या नवीन किमती (एलएमओ १५.२२ रुपये व रीफिलर्स २५.७१ रुपये) आकारण्याबाबत सर्व उत्पादक व रीफिलर्स यांना कल्पना देण्यात आलेली आहे.
प्लाझ्मा नियोजन– कोविडच्या अतिगंभीर रुग्णांसाठी प्लाझ्माची (रक्तद्रव) गरज लक्षात घेवून पुणे विभागात 42 रक्तपेढ्यांना प्लाझ्माफेरसिसची परवानगी देण्यात आलेली आहे. पुणे जिल्हा 21, सांगली 8, सातारा 3, सोलापूर 7 आणि कोल्हापूर 3 अशा एकूण 42 रक्तपेढ्या आहेत. 2030 डोनरकडून 200 मि.ली. प्रमाणे 4211 युनिट्स एकूण संकलन करण्यात आले. त्यापैकी एकूण वितरण 3894 युनिट्स करण्यात आले असून 298 युनिट्स शिल्लक आहेत.
रेमडेसिवीर इंजेक्शन नियोजन– पुणे विभागात रेमडेसिवीर इंजेक्शनची निकड विचारात घेऊन इंजेक्शनचे उत्पादक, कंपनीचे डेपो व वितरकांच्या स्तरावर संनियंत्रण करण्यात येत आहे. हेट्रो, सिप्ला, मायलान, जुबीलियंट, डॉ. रेडडीज व झायडस कॅडीला या ६ कंपन्यांचा साठा उपलब्ध करण्यात आला आहे. औषध प्रशासनाने सर्व कोविड रुग्णालयांना 23 सप्टेंबर 2020 रोजी रेमडेसीवीर इंजेक्शनचा वापर शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार आवश्यक असलेल्या रुग्णासाठीच करण्याच्या सूचना दिल्या आहेत. औषध प्रशासनाने गुगल शीट तयार केली असून सर्व कोविड हॉस्पीटलने दररोज सायंकाळी ७ वाजता त्यांच्याकडे असलेल्या रेमडेसीवीर इंजेक्शन खरेदी-विक्री व शिल्लक साठा याबाबतची माहिती देणे बंधनकारक केले आहे.
कॉल सपोर्ट यंत्रणा – पुणे जिल्ह्यात 15 सप्टेंबर 2020 पासून झूम कॉल सपोर्ट यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर यांच्या पर्यवेक्षीय मार्गदर्शनाखाली गंभीर व अत्यवस्थ रुग्णांच्या औषधोपचाराबाबत चर्चा करण्यात येते. ग्रामीण भागातून सकाळच्या सत्रामध्ये 8 ते 10 डॉक्टर्सचे व सायंकाळच्या सत्रामध्ये 12 ते 14 डॉक्टर्सचे कॉल प्राप्त होत आहेत. सकाळचे सत्र दररोज 11.30 ते 12 आणि सायंकाळचे सत्र 5.30 ते 6 या वेळेत होते.
रुग्णांचे बिल व्यवस्थापन– पुणे जिल्ह्यात एकूण 2431 लेखा परीक्षण केलेल्या देयकांची संख्या असून 30 सप्टेंबर अखेर रुग्णांच्या देयकांतून 3 कोटी 90 लाख 94 हजार 636 रुपये लेखा परीक्षणांती कमी करण्यात आले आहेत. पुणे महानगर पालिका क्षेत्रातील 605 देयके, पिंपरी चिंचवड महापालिका 1152 देयके आणि पुणे ग्रामीण मधील 674 देयकांचा समावेश आहे. लेखा परीक्षण केलेल्या देयकांची एकूण रक्कम पुणे महानगर पालिका क्षेत्रातील 10 कोटी 34 लाख 70 हजार 167 रुपये, पिंपरी चिंचवड महापालिका 1 कोटी 63 लाख 99 हजार 751 रुपये आणि पुणे ग्रामीण मधील 50 लाख 33 हजार 738 रुपये अशी आहे.
रुग्णवाहिकांची उपलब्धता – पुणेजिल्ह्यात एकूण कार्यरत रुग्णवाहिकांची संख्या 399 असून या व्यतिरिक्त 500 रुग्णवाहिका प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत (आरटीओ)अधिग्रहित करण्यात आलेल्या आहेत. 102 सुविधेमार्फत कार्यरत रुग्णवाहिका 126 असून 108 सुविधेमार्फत82 रुग्णवाहिका,जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पुणे महापालिका व पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी अधिग्रहित रुग्णवाहिकांची संख्या 99 आहे. ग्रामपंचायतींमार्फत भाडेतत्वावर लावलेल्या रुग्णवाहिकांची संख्या 40 तर ग्रामीण भागात अधिग्रहित रुग्णवाहिकांची संख्या 52 आहे. या 92 पैकी 51 रुग्णवाहिका 14 व्या वित्त आयोगामधून व 5आमदार स्थानिक निधीमधून खरेदी करण्यात आल्या आहेत.
कोविड रोगाबाबत नागरिकांमधील हलगर्जीपणा, संसर्गाचे प्रमाण चिंताजनक असतांना ‘चलता है’ दृष्टिकोन खूप धोकादायक ठरु शकतो. अनलॉकनंतर बाजारपेठांमध्ये दिसणारी गर्दी पाहिल्यानंतर ही बाब सहज लक्षात येते. कोरोनाचा यशस्वी मुकाबला करण्यासाठी गृह विलगीकरण (होम आयसोलेशन) समुपदेशन, कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेणे यामध्ये लोकांचा सहभाग या गोष्टीही महत्त्वपूर्ण ठरु शकतात. जिल्ह्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम नियोजनबद्ध राबविण्यात येत आहे. या मोहिमेबरोबरच कोविड पश्चात समुपदेशन करुन कोरोनाच्या संकटावर मात करता येऊ शकते.
राजेंद्र सरग, जिल्हा माहिती अधिकारी, पुणे
9423245456)