पुस्तक परीक्षण : आपले हंबर्डी गाव
रामायणात श्रीरामांनी जननी,आणि जन्मभूमीला स्वर्गासमान श्रेष्ठत्व बहाल केले आहे. कारण या दोघी मुळेच आपले भूतलावरील अस्तित्व शक्य आहे. म्हणून त्यांना धन्य मानून त्यांच्या ऋणातून उतराई होणे, हेच मानवी जीवनाचे सार आहे, अशा उदात्त विचारांनी लेखक खेमचंद पाटील यांनी “आपले हंबडी गाव” या पुस्तकाचे लेखन व संपादन केले आहे.
आपल्या गावाची गुणवैशिष्ट्य, त्याला लाभलेला आध्यात्मिक वारसा, गावाला लाभलेली ऐतिहासिक पार्श्वभूमी,गावाचे पारंपारिक व्यवसाय, लेवा पाटीदारांचे जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यामधील हंबर्डी गावात झालेले स्थलांतर ,मुख्यतः शेती हा व्यवसाय ,गावाचे हवामान, विविध प्रकारची भूगर्भ स्थिती, पूर्वी भरपूर जलसंपदा होती. आजमात्र त्याची असलेली चणचण, मुख्य पिके, गावाची भौगोलिक तथा आदर्श सुविधात्मक माहिती, गावात नव्याने आलेल्या सुविधा , विकास कामे, धर्म- जाती विषयक तथा संस्काराविषयी माहिती, वर्षभर साजरे केले जाणारे सण व उत्सव,अंत्येष्टि विधी, प्रत्येक जातीची विस्तृत माहिती , त्यांच्या परंपरा, त्यांचे उपजीविकेचे व्यवसाय, त्यांची बोलीभाषा ,तिची उच्चारणाची खास वैशिष्ट्ये ,गावातील धार्मिक स्थळे -दैवत, यांचा सविस्तर इतिहास, मंदिरांची बांधकाम पद्धती ,मशीदी- त्यांची खास वैशिष्ट्य ,अगदी सनावळ्यासह वर्णिलेली आहे .गावात वारकऱ्यांचे असलेले संख्यात्मक बळ याचे प्रभावी वर्णन पुस्तकात केले आहे.
गावाची सहकार क्षेत्रातील प्रगती , विविध कार्यकारी सेवा, सहकारी सोसायट्या, गावाची आर्थिक ठेव ,सरकारी सुविधा ,याचाही यथायोग्य उल्लेख झाला आहे. गावाचे भूषण ठरलेले “वै.ह.भ.प. विठ्ठल महाराज तळेले, कै रामचंद्र विठ्ठल पाटील” यांच्या पुण्यस्मरणाने त्यांनी गाव व गावातील ख्यातनाम व्यक्ती विषयीची आपली आंतरिक ओढ, अत्यंत श्रद्धायुक्त अंतःकरणाने व्यक्त केली आहे. तसेच या गावाचे भूषण ठरलेल्या व आपल्या दैनंदिन कारकिर्दीने आपल्या गावाचे नाव देशात व विदेशातही गौरविण्यात करणाऱ्या सर्वश्रेष्ठ आणि ज्येष्ठांचा त्यांच्या व्यक्तित्व व कृतित्वाचा गौरव केला आहे. त्यांची उत्तुंग भरारी व आभाळाशी मैत्री करण्याचे थोर कार्य अत्यंत समर्पक शैलीत व्यक्त केले आहे. तसेच बाहेरगावी राजकारणात व समाजसेवेत अग्रेसर असलेल्या कर्तृत्ववान रत्री-पुरुषांच्या जीवनाचा आलेख अत्यंत विस्तृत व समर्पक शैलीत मांडला आहे.
एवढेच नाही तर आज गावाची झालेले शैक्षणिक प्रगती, उद्योगधंद्यातील उत्तम भरारी याचाही समर्पक परामर्श घेऊन आज हंबर्डी गाव सर्व दिशांनी कसे प्रगत होत आहे, तसेच गावातून उद्योग- व्यवसायासाठी बाहेर पडलेल्या धुरंधरांनी अनेक व्यवसायात प्राप्त केलेले उत्तुंग यश मोठ्या अभिमानाने सांगितले आहे .
खेमचंद पाटील यांनी ” आपले गाव हंबर्डी ” या पुस्तकात ऐतिहासिक, सामाजिक, राष्ट्रीय ,शैक्षणिक, सांस्कृतिक ,समाजसेवा, राष्ट्रसेवा, अशा सर्व स्तरावर खूप सखोल अभ्यास ,चिंतन ,चर्चा, संकलन, याची उत्तम मांडणी करून एक अमूल्य दस्तावेज ” समाजाच्या हाती देण्याचे खूप मोठे कार्य केले आहे. ग्राम इतिहास मालिकेत हंबर्डी गावाला मानाचे स्थान मिळवून दिले आहे.
पुस्तकाचे नाव :आपले हंबर्डी गाव
लेखकाचे नाव : खेमचंद पाटील
पुस्तक प्रकाशक :माधुरी ऑफसेट नासिक
पुस्तक परीक्षण लेखन : हेमंत नेहेते
मूल्य . :250 रू
पृष्ठ. :175