बीड जिल्हा : आजही उशीरापर्यंतची प्रतिक्षा
बीड, प्रतिनिधी – आजही बीड जिल्ह्याला रिपोर्टसाठी रात्री किमान साडेबारापर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे . जिल्हाभरातील वाचक , ग्रामस्थ , अधिकारी , कर्मचारी हे वारंवार आरोग्य विभागात फोन करून विचारणा करीत आहेत . त्यामुळे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनीच याबाबत खुलासा केला आहे .
लातुरच्या प्रयोगशाळेत स्वब येण्याची संख्या वाढलेली आहे . त्यामुळे हा विलंब होत आहे . या ठिकाणी लातूर , उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्याचे स्वब तपासले जातात . एकाच वेळी तीनही जिल्ह्याचे रिपोर्ट बाहेर येतात . पण मागील पाच दिवसांपासून बीड जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने जिल्हावासिय चिंताक्रांत झालेले पहायला मिळत आहे . आतापर्यंत बीड जिल्ह्यात १२ अॅक्टीव्ह रुग्ण आहेत . तर १ ( पिंपळा ता.आष्टी ) रुग्ण बरा झालेला आहे . अन्य ७ जणांची नोंद बीड जिल्ह्यातून हटविण्यात आलेली आहे . त्यापैकी एक वृध्द महिला मृत झालेली आहे .
जिल्ह्यात चर्चांना पेव फुटलेले आहे . रिपोर्ट आले आणि इतके पॉझिटीव्ह निघाले , तितके निगेटीव्ह निघाले . आमच्या गावात आरोग्य पथक आलंय . गावात कुणी पॉझिटीव्ह आढळलंय का ? मग आरोग्य पथक कशाला आलंय ? असे विविध प्रश्न आरोग्य विभागासह मीडियाला केले जात आहेत . त्यामुळे डॉ.थोरात यांनी रिपोर्ट येण्यास वेळ लागणार असल्याचे सांगितले . जोपर्यंत अधिकृत माहिती हाती येत नाही तोपर्यंत ग्रामस्थांनी कुठल्याही अफवांना बळी पडू नये , असे अवाहनही करण्यात आले आहे .