ब्रेकिंग न्यूज – परभणी जिल्हा ग्रीन वरुन परत आँरेंज झोनमध्ये; ३ जण कोरोनाबाधित
परभणी प्रतिनिधी – मागील ३० दिवसांपासून एकही रुग्ण नसलेल्या परभणी जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. मुंबईहून परतलेल्या एकाच कुटुंबातील ३ जण कोरोनाबाधित आढळल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून ग्रीन झोनमधील जिल्हा आँरेंज झोन मध्ये गेला आहे.
अधिक माहिती अशी की, परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालूक्यातील शेवडी या गावचे हे कुटुंब असून मुंबईवरुन परतल्यावर हे कुटुंब आरोग्य तपासणीसाठी येलदरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाले होते. त्याठिकाणाहून त्यांना तातडीने जिंतूर येथील शासकीय रुग्णलयात रेफर करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची चाचणी करण्यात आली. यात आई आणि दोन मुले असे एकूण तीन जण सकारात्मक आले आहेत. या माहितीस जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या सुत्रांनी दुजोरा दिला आहे.
बाधित कुटुंब हे पोलीस खात्याशी निगडीत
मुंबई येथील आर्थर रोड कारगृहात गार्ड असलेल्या कर्मचाऱ्याने कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता आपल्या कुटुंबाला गावी आणन्याचा निर्णय घेतला. गावी आल्यावर त्याने रुग्णालयात जाऊन तपासणी करुन घेतली असता हा कर्मचारी निगेटिव्ह आला असून त्याची बायको व दोन मुले पाॅझिटिव्ह आले असल्याची माहिती आरोग्य विभागातील सुत्रांनी दिली आहे.