मंजरथच्या कर्मकांड , दशक्रिया विधीचे लॉक कधी उघडणार ? तीन महिन्यांपासून रोजीरोटी बंद असलेल्या पुरोहितांना प्रतीक्षा ; अटी – शर्तीवर परवानगी देण्याची मागणी

0 130

माजलगांव,प्रतिनिधी:- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे मंजरथ येथील कर्मकांड , दशक्रिया विधीला लॉक पडल्याने तीन महिन्यांपासून पुरोहितांची रोजीरोटीच बंद आहे . एक जूनपासून शासनाने मिशन बिगेन अगेन सुरू करून अनेक व्यवसायांना अटी – शर्तीवर परवानगी दिली असली तरी मंजरथ येथील दशक्रिया विधी अद्यापही बंदच आहे .

यामुळे हवालदिल झालेल्या पुरोहितांना हे लॉक कधी उघडणार , याची प्रतीक्षा लागली आहे . माजलगांव तालुक्यातील गोदावरी तीरावर वसलेल्या मंजरथ येथे तीन नद्यांचा संगम होतो . या त्रिवेणी संगमामुळे दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंजरथला अहल्याबाई होळकरांनी दगडाचा घाट बांधलेला आहे . या ठिकाणाला अस्थी विसर्जन , कर्मकांड , दशक्रिया विधीसाठी फार मोठे महत्त्व असल्याने बीडसह बाहेरच्या जिल्ह्यांतूनही मोठ्या प्रमाणावर नागरिक या ठिकाणी कर्मकांड कार्यासाठी येतात . गावातील जवळपास २० ते २५ पुरोहितांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह या व्यवसायावर चालतो .

तीन महिन्यांपूर्वी कोरोना महामारीने राज्यात शिरकाव केल्यामुळे त्याचा फैलाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाउन करण्यात आल्याने मंजरथ येथील सर्व विधी बंद करण्यात आले . एक जूनपासून शासनाने लॉकडाउन शिथिल करत राज्यातील अनेक व्यवसायांना परवानगी देत सुरू केले आहेत ; परंतु मंजरथच्या कर्मकांड विधीचे लॉक अद्यापही निघाले नाही . तेथील दहा ते बारा पुरोहितांचे पोट याच विधीवर असताना तीन महिन्यापासून हा व्यवसायच बंद असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे . तहसील प्रशासनाला याबाबत लेखी निवेदने देऊनही कोणताच निर्णय होत नसल्याने तीन महिन्यांपासून पडलेले लॉक उघडण्याची प्रतीक्षा लागली आहे .

विवाहाला परवानगी ; दशक्रिया विधीलाच का नाही ?
लॉकडाउनच्या महिनाभरातच विवाह सोहळ्यासाठी शासनाने सुरवातीला १० व्यक्तींसाठी परवानगी दिली होती . दोन दिवसांपूर्वी तर जिल्हा प्रशासनाने लॉन , मंगल कार्यालयात ५० व्यक्तींच्या उपस्थितीत विवाह करण्यासाठी परवानगी दिली ; मात्र ७ जणांच्या रोजीरोटीचा प्रश्न असलेल्या दशक्रिया विधीसाठी परवानगी का नाही , असा प्रश्न पुरोहितांतून उपस्थित होत आहे .

“तीन महिन्यांपासून दशक्रिया , कर्मकांड विधी बंद असल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे . परवानगी देण्यासाठी प्रशासनाला अनेकवेळा विनंती केली आहे . पैठण येथे महिनाभरापासून या व्यवसायाला परवानगी दिली असताना बीड जिल्ह्यातच का मिळत नाही ? – भास्करराव जोशी , पुरोहित , मंजरथ .

“मंजरथ येथील नागरिक , पुरोहितांनी परवानगी देण्याची मागणी केली आहे . याबाबत जिल्हा प्रशासनाला कळविण्यात आले असून अद्याप जिल्हा प्रशासनाकडून कोणतेच निर्देश आले नाहीत . – डॉ . प्रतिभा गोरे , तहसीलदार

पेट्रोल @ ९ ० रुपये लिटर सामान्यांचे कंबरडे मोडले

 

error: Content is protected !!