मराठवाड्यातून धावणाऱ्या महत्वपूर्ण रेल्वेगाड्या त्वरित सुरू करा : आ.लोणीकर
परभणी, प्रतिनिधी – दक्षिण मध्य रेल्वे व मध्य रेल्वे विभागाने मराठवाड्यातून धावणार्या सर्व महत्वपूर्ण रेल्वेगाड्या तातडीने सुरू कराव्यात, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नेते तथा आमदार बबनराव लोणीकर यांनी केली आहे.
रेल्वे ही मराठवाड्याच्या दृष्टीने रक्तवाहिनी आहे. मराठवाड्यातील शेतकरी, कास्तकार, लहान लहान व्यापारी नोकरदार व व अन्य महत्त्वपूर्ण कामासाठी प्रवास करणारे प्रवासी यांच्या साठी रेल्वेचा प्रवास सुखकर स्वस्त आणि विश्वासार्ह आहे. परंतु कोरोना प्रादुर्भाव काळामुळे मागील सहा महिन्यापासून सर्व रेल्वे गाड्या बंद आहेत. त्यामुळे जनसामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक लहान लहान व्यापारी, फेरीवाले यांच्यासह भाजीपाला आणि फूल विक्रेते फळविक्रेते यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. याव्यतिरिक्त मालाची ने-आण करणारे अनेक घटक देखील त्रस्त झाले आहे. त्यामुळे महत्त्वपूर्ण असणार्या खालील निवडक रेल्वेगाड्या तात्काळ सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी लोणीकर यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली.
नांदेड मुंबई देवगिरी एक्सप्रेस, नागपूर नांदेड मुंबई नंदिग्राम एक्स्प्रेस , नांदेड मुंबई राजा राणी एक्सप्रेस, जालना दादर मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस, नांदेड मुंबई तपोवन एक्सप्रेस, काचीकुडा, मनमाड पॅसेंजर, निजामबाद पुणे पॅसेंजर, हैद्राबाद औरंगाबाद पॅसेंजर, नांदेड मनमाड पॅसेंजर, नांदेड दौंड पॅसेंजर, सिकद्राबाद ते शिर्डी साई एक्स्प्रेस, धर्माबाद मनमाड मराठवाडा एक्सप्रेस, जालना ते शिर्डी डेमो या रेल्वे गाड्या मराठवाड्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या सर्व महत्वपूर्ण रेल्वे सुरु झाल्यास जनसामान्यांना खूप मोठा दिलासा मिळेल, असेही म्हटले आहे.
रेल्वे सुरू करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रस्ताव पाठवणे आवश्यक असून त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांनी पुढाकार घ्यावा व दक्षिण मध्य रेल्वे नांदेड मंडळाचे विभागीय व्यवस्थापक यांनी यासाठी पाठपुरावा करावा. या सर्व महत्वपूर्ण रेल्वेगाड्या गोरगरीब होतकरू हातावर पोट असणार्या सर्वसामान्य लहान लहान व्यापारी व प्रवासी बांधवांना दिलासा द्यावा, असेही नमूद केले आहे.