मराठी साहित्य काल आणि आज

0 400

महाराष्ट्रात खुप पुरातन काळापासून एक साहित्य संस्कृती जन्मास आली आहे. जसा जसा काळ लोटत गेला तशी ही चळवळ बहरत गेली. अगदी संस्कृत भाषेपासून सुरुवात झालेली ही साहित्य परंपरा आजतागायत वाढतच आहे. तरीपण आजची मराठी साहित्य चळवळ आणि भूतकालीन मराठी साहित्य चळवळ यात जमीन असमान चा फरक दिसून येतो.

चक्रधर स्वामींच्या ‘लिळाग्रंथ’ या ग्रंथाच्या परंपरेपासून ते छ.संभाजी महाराजांच्या ‘ बुद्धभुषण’ ते संत ज्ञानेश्वर यांच्या ज्ञानेश्वरी पर्यंत मग त्यात तुकारामाचा’गीतगाथा’, ‘भागवतगीता’,अभंग, रामदासांचे ‘दासबोध’,’मनाचे श्लोक’असतील,एकनाथांची भारूडे असतील अथवा संतकाळातील संताचे जे साहित्य होऊन गेले त्यात भक्तीभाव, अध्यात्म हे आत्मा तर कर्मकांड अंधश्रद्धा यांना विरोध, कर्मठपणा, जातीभेद, उचनीचता या विरूद्ध केलेला विद्रोह त्यातून दिसून येतो. संतांनी समतेची शिकवन,समाज प्रबोधन इत्यादी साठी आपल्या साहित्याचा मोठ्या खुबीने वापर केल्याचे लक्षात येते.

पुढे ही चळवळ बहरतच गेली.मग स्वातंत्र्य चळवळीसाठी या चळवळीचा वापर करण्यात आला. समर गीतांच्या माध्यमातून, देशप्रेम दर्शवण्यासाठी, लोकांना प्रेरणा देण्यासाठी त्या काळात लेखन करण्यात आले.म.फुले यांचे ‘शेतकऱ्यांचा आसूड’हे शेतकरी समस्या आणि त्यांची होणारी पिळवणूक याला वाचा फोडणारे होते.

खरेतर मराठी साहित्य कधी बहरले असेल तर ते आचार्य अत्रेंच्या,कुसुमाग्रज, वि.स.खांडेकर,प्रबोधनकार ठाकरे,पु.ल.देशपांडे,साने गुरुजी, गोविंदाग्रज(रा.ग.गडकरी), व.पु.काळे यांच्या काळात. त्यांच्या लेखनाने भाषा,लेखनशैली एका उंचीवर नेऊन ठेवली आणि लेखनातून ते वाचकास एका वेगळ्या विश्वात नेऊन ठेवत असत.

पुढे मग ग्रामीण लेखन, दलित लेखन,एकांकिका,भयकथा अशा प्रकारचे लेखन उदयास आले. त्यांनी लोकांच्या मनावर अवीट अशी छाप सोडली. दया पवारांचं बलुतं, अण्णाभाऊ साठेंचं फकिरा, वारणाकाठ,नरेंद्र जाधवांचं ‘आमचा बाप आणि आम्ही’, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’, ‘शुद्र पुर्वी कोण होते?’ शंकर खरातांची ‘लाल चिखल’ ही ग्रामीण कथा. या लेखकांनी व त्यांच्या साहित्यांनी लोकांच्या मनावर गारुड घातले होते.ते आजतागायत उतरले नाही.

ऐतिहासिक आणि साहसिक साहित्याच्या माध्यमातून आपला ईतिहास लोकांसमोर मांडण्याचा अनेक लेखकांनी प्रयत्न केला. विश्वास पाटील यांची पानिपत,स्वामी, महानायक ,शिवाजी सावंत यांची मृत्युंजय, छावा,युगंधर,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित साहित्य इ.लेखकांनी आपल्या देशाचा,महाराष्ट्राचा इतिहास कादंबरीत बांधण्याचा प्रयत्न केला आहे. जो आजपर्यंत कोणालाही दुर सारता आले नाही.

काळ जसाजसा पुढे जात गेला तसा मराठी साहित्याचा विषय बदलत गेला. लोकांच्या समस्या, लोकांचं जगनं,समाजव्यवस्था, अर्थकारण यावर लेखन केलं जाऊ लागलं.साहित्यात कल्पना विलासाची जागा वास्तववाद घेऊ लागला.

पण सध्या मराठी साहित्याला एकप्रकारे ओहोटी लागली आहे. पुर्वीसारखे दर्जेदार लेखक,दर्जेदार साहित्य तयार होत नाही. बोटावर मोजण्या इतपत लेखक तयार होत आहेत. त्याला कारण वाचन संस्कृती चा ऱ्हास होणे हे आहे.. मुळात जर आपण काही वाचलच नाही तर आपणास सुचनार तरी कसे?सध्या मोबाईल, इंटरनेटच्या काळात वाचन,लेखन कमी आणि इतर गोष्टीसाठी जास्त वेळ दिला जात आहे. त्यातून माणसाची क्रयशक्ती संपून सर्जनशीलता नष्ट होत चालली आहे. जे पाहिजे ते समोर मिळत असल्याने विचारशक्ती खुंटत आहे. त्याचा परिणाम असा की साहित्य संस्कृती लयाला जात आहे.

सध्या अनेक नवीन लेखक,साहित्यिक नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. जे विचार मनात आले ते लिहायचे आणि सोशल माध्यमातून प्रकाशित करायचे. मग त्या कथा असोत,ललित असो,प्रवास वर्णन असो,कविता असो वा प्रणय कथा.लिहायचे आणि फेसबुक, व्हाट्सएप,app च्या माध्यमातून लेखन प्रकाशित करायचे असे चालू आहे. पण त्याला वाचक वर्ग नेमका किती आहे किती वाचतो असा प्रश्न केला तर उत्तर दहा टक्के एवढे येईल. कारण आपण ज्या तंत्राचा वापर करतो ते तंत्र वाचक वर्ग वापरतोच असे नाही. आणि पुस्तक वाचण्यात जी गोडी आहे ती अशी ऑनलाईन वाचणात कधीच येत नाही.
सध्याच्या लेखनाची भाषा बदलली. पुर्वी ‘भाषा म्हणजे एक संस्कृती आहे’ म्हणून जपलं जात होतं.त्यात अलंकार असायचा,त्यात शुद्धता असायची, त्यात जो विषय घेतला त्याच घटका संबंधीत निगडित भाषेचा दर्जा असायचा.म्हणजे अभिजात भाषेचा दर्जा पुर्वीच्या साहित्यात पाहायला मिळत होता.पण सध्या भाषाचा शॉर्ट कट झाली आहे. मग आपसूकच त्याचे परिणाम लेखणात दिसून येणार. ते दिसून येत आहेत. भाषेची सरळमिसळ लेखनात केली जात आहे.

नवसाहित्यीक,नवकवी,नव लेखक सध्या लिहीण्याचा प्रयत्न करत आहेत.विशेष म्हणजे त्यात तरुणांचा समावेश मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. ही साहित्यासाठी जमेची बाजू. वाचन संस्कृती पुन्हा एकदा नव्याने रुजवायची गरज आहे.ती रुजवली तरच मराठी साहित्य बहरेल.मराठी भाषा बहरेल.

सतिश यानभुरे

error: Content is protected !!