महिलांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी समाजाची मानसिकता बदलणे गरजेचे

0 229

सद्यस्थिती पाहाता कोरोना सारख्या महामारीने महाराष्ट्रातच नव्हे तर संपुर्ण भारत देशांला आणि जगाला ग्रासले आहे याची झळ प्रत्येक राज्यातील जनतेला बसली असून अद्यापही जनता यातून सावरलेली नाही तोच आपल्या सुसंस्कृत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून वेगवेगळ्या स्वरूपात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या बातम्या समोर येताना दिसत आहेत. कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन असताना देखील कोविड सेंटर्समध्ये महिलांवर अत्याचार करण्याची प्रवृत्ती थांबलेली नाही. अगदी महिला डॉक्टरांपासून ते कोरोना बाधित महिला आणि अल्पवयीन मुलींवर वेगवेगळ्या पद्धतीने अत्याचार सुरूच आहेत. मात्र या गुन्ह्यांसंदर्भात राज्य शासन कोणतीच अशी ठोस भूमिका घ्यायला तयार नाही.त्यामुळे राज्यातील जनतेमध्ये कमालीचा असंतोष पसरला आहे. तेव्हा आमच्या या सुजलां आणि सुफलां अशा महाराष्ट्रात राहणाऱ्या महिला आणि मुली सुरक्षित आहेत का ? हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. सामूहिक बलात्काराच्या गुंह्याच्या वाढत्या उधाणाची बाब जरी चिंताजनक असली तरी ती आटोक्यात आणण्यात राज्यशासनाला अद्याप तरी प्रथितयश मिळाले नाही. ही मोठी शोकांतिकाच म्हणावी लागेल.

म्हणजेच काय तर अशा विकृतीनां वेळीच आळा घालण्यास राज्य शासन अपयशी ठरत आहे. त्यामुळे द्विधा परिस्थीती निर्माण होऊन एकच प्रश्न पडतो की या सगळ्या गोष्टींना जबाबदार कोण..?

राज्य शासन, पोलिस, अल्पवयीन मुली की महिला ? उल्हासनगरवासीय रिंकू पाटील या शाळकरी मुलीस भर शाळेत जाळण्यात आले. सांगलीच्या अमृता देशपांडेचा भर रस्त्यात खून करण्यात आला. डोंबिवलीतील १७ वर्षाच्या मुलीवर तिच्या राहत्या घरी रॉकेल ओतून जिवंत जाळल्याचे पाशवी कृत्य. साक्री तालुक्यातील उंभर्टीमधल्या १० वर्षीय मुलीवर बलात्कार घटना. कोल्हापूरातल्या करवीर मधील उचगाव येथे रिक्षाचलकाने अल्पवयीन मुलीवर केलेला बलात्कार. नांदेड मध्ये ५ वर्षाच्या मुलीचे अपहरण करुन तिच्यावर झालेला बलात्कार. विक्रोळी मधील पार्क साईट येथील वाधवा टॉवर मधील बलात्काराची घटना मैत्रिणीच्या वाढदिवसाला म्हणुन निघालेली चेंबूर येथे आपल्य़ा भावाकडे राहायला आलेल्या १९ वर्षीय तरुणीवर चेंबूर येथील लाल डोंगर मधील चार नराधमांनी केलेला सामूहिक बलात्कार. गया मधील कोच भागांत एका अल्पवयीन दलित मुलीवर झालेला सामूहिक बलात्कार त्यानंतर तिने फाशी घेऊन आत्महत्या केली. उत्तरप्रदेश मधील बलराम जिल्ह्यातील गैसडी गावांतील सामूहिक बलात्कार तिचा गुन्हा एवढाच की सकाळी कॉलेजला अड्मिशन साठी बाहेर पडली आणि वाटेत तिचं अपहरण केलं गेलं आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. कोपर्डीचे भयानक प्रकरण १५ वर्षे वयाच्या शालेय विद्यार्थिनीवर तिघा नराधमांनी पाशवी अत्याचार करुन तिचा निर्दयपणे खून केला. उदरनिर्वाह साठी घराबाहेर पडणाऱ्या एका १४ वर्षाच्या मुलीला लेबर कॉंट्रेक्टर मास्क घालायला लावून तिला बेशुद्ध पाडून तिच्यावर बलात्कार करतो. राजस्थान मधील नीमराणा गावांतील बापानेच आपल्या १६ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करुन अनेक महिने तिचे लैंगिक शोषण आणि आताचे नुकतेच ताजे उदाहरण म्हणजे उत्तर प्रदेश मधील हाथरस येथील वाल्मिकी समाजातील १९ वयाच्या युवतीवर अत्याचार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली. यां सर्व घटना, ही विकृती, हें पाशवी कृत्य, अंगावर शहारे आणणारे असुन हे क्रौरकृत्य करण्यामागे त्यांचा कुटील हेतू काय ? कां म्हणुन यां नराधमानी या निष्पाप जिवांचा नाहक बळी घेतला..? दिल्लीमध्ये एका तरुणीवर झालेला सामूहिक बलात्कार आणि त्यातून झालेला तिचा अंत या घटनेने देशातील वातावरण ढवळून निघाले होते. तिच्या प्रति आस्था वाटून मोर्चा काढला गेला, सरकारच्या निष्क्रियतेवर टीका झाली. या घटनेतील दोषींना फाशी देण्यात यावी, अशी मागणी केली गेली. एवढे सगळे होवूनही महिलांवर, अजाण मुलींवर होणारे अत्याचार व बलात्कार थांबले नाहीत. उलट अजूनच वाढताहेत. आपल्या या भारतीय संस्कृती मध्ये स्त्रियांना आदीशक्तीचे रूप समजून तिला पूजनीय मानले जाते.. कारण यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा मोलाचा सहभाग असतो. राजमाता जिजाऊ होत्या म्हणुन छत्रपती शिवाजी महाराज घडले, रमाई आंबेडकरांमुळेच बाबासाहेब संविधान प्रमुख झाले, सावित्रीबाई फुले यांची साथ होती म्हणुन ज्योतीराव फुले महात्मा झाले, अहिल्याबाई होळकर, मदर तेरेसा, कल्पना चावला, सुनीता विल्यम्स, पी. टी. उषा, अशा अनेक महिला आहेत़ की त्यांनी आपल्य़ा भारतासाठी मोलाचे योगदान दिले. असे असताना सुद्धा निर्भया हत्याकांड, कोपर्डी हत्याकांड आणि आताचे हाथसर हत्याकांड घडले जातात हीं दुर्दैवी बाब आहे. आज कित्येक तरुणी..महिला शिक्षणासाठी वा नोकरीसाठी बाहेरगावी किंवा अनोळखी ठिकाणी एकट्या राहतात. मग या अशा एकट्या मुलींना पाहून नराधमांचे फावते आणि त्यांच्यातला विकृतीमुळे अमानुष कृत्य घडतात. काही गुन्हेगार पकडले जातातही. पण नंतर पुरेशा पुराव्यांअभावी सुटून पुन्हा गुन्हा करण्यास प्रवृत्त होतात. कारण त्यांना या प्रवृत्तीची सवय झालेली असते त्यांना माहिती आहे की बलात्कार केल्यानंतर आपण पकडलो गेलो, तरी पोलिसांना मॅनेज करू शकू ही मानसिकता झालेली असते. ना कायद्याची जरब ना पोलिसाचा धाक मोठमोठे गुन्हेगार, राजकीय पुढारी हे देखील बलात्काराच्या खटल्यातून निर्दोष सुटले आहेत. गुन्हा करणाऱ्याची दहशत, आपल्याला न्याय मिळणार नाही, कोणी मदत करणार नाही या भीतीपोटी अनेक प्रकरणे उघडकीस येत नाहीत. या सर्व अन्यायाचा बिमोड कसा करायचा? त्यांना आवर कसा घालायचा? हा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे.

आपण ज्या भारतमातेच्या छत्र छायेत आज वावरतो आहोत त्या पूज्यनीय अशा भारतमातेला शरमेने मान खाली घालायला लावणारे हे क्रूर कृत्य करण्याचे धाडस या नराधमांना होते तरी कसे..? तर याला कारणीभूत आहे आपली निष्क्रिय आणि ढासळलेली न्यायव्यवस्था आणि त्यांचा चाललेला डळमळीत कारभार..! आज आपली न्यायालयीन व्यवस्था इतकी सूस्तावलेली आहे की, एखाद्या आरोपीचा गुन्हा सिद्ध होण्या आधी त्याचा जामीन तयार असतो आणि पुन्हा तो गुन्हा करण्यास प्रवृत्त होतो. तेव्हा अशी वेळ येऊ नये म्हणुन अशा प्रकारच्या होणाऱ्या पाशवी गुन्ह्यास वेळीच आवर घातला पाहिजे. हा कटाक्ष आपल्य़ा न्यायव्यवस्थेकडे असला पाहिजे.

त्याचप्रमाणे पोलिसांची रस्त्यावर जास्तीत जास्त गस्त हवी. निर्मनुष्य रस्त्यावर पोलिस यंत्रणा सज्ज हवी, जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावेत. व्हिडिओ क्लिपस, पॉर्न साईट व अश्लील दृश्यांवर बंदी घालण्यात यावी. जोपर्यंत समाजाची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांची समस्या कायम राहील. तेव्हा स्त्रियांनीदेखील आपल्या संरक्षणाची काळजी ही स्वतःच घेऊन अन्यायाचा प्रतिकार करायला शिकले पाहिजे. प्रत्येकाला आई आहे, बहीण आहे, मावशी आहे, आत्या आहे, पत्नी आहे, मुुलगी आहे. त्यामुळे वाईट प्रसंग आपल्याही आईबहिणीवर उद्भवू शकतो, याची जाण असूनही आपल्यापैकी अनेक लोक महिलांवर अत्याचार करतात, ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे.
तेव्हा आपल्या राज्यांत स्त्रीशक्ती जागरूकता आवश्यक आहे.त्याचप्रमाणे महिलांच्या अधिकार व मूल्य यांवर घात करणाऱ्या विघातक प्रवृत्ती वर घाला घालून हुंडा बळी, स्त्रीभ्रूण हत्या, निरक्षरता, लैंगिक शोषण, इत्यादीं विकृतीचा नायनाट करणे ही काळाची गरज आहे तसेच महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध कठोर कायदा करणे आणि त्याची अंमलबजावणी करणे आणि महिलांना सामजिक, मानसिक आणि आर्थिक बाबींमध्ये सक्षम बनविणे.

तेव्हा न्यायालयाने यां नराधमांविषयी केवळ नागरीक म्हणुन सहानुभूती न दाखवता त्यांनी केलेल्या नीच, राक्षसी कृत्याबद्दल त्यांना फाशीची शिक्षा किंवा कठोर पेक्षा कठोर शासन करावे. अन्यथा जनतेचा संयम तुटून जनता जनार्दन आपले उग्र रूप धारण करील आणि कायदा हातांत घेऊन त्यांनी केलेल्या क्रूर कृत्याचा योग्य तो जाब देईल.

maheshwar tetambe

महेश्वर भिकाजी तेटांबे
दिग्दर्शक, पत्रकार
९०८२२९३८६७

error: Content is protected !!