माजलगावांत शासकीय कापूस खरेदी सुरू

0 138

माजलगांव, प्रतिनिधी – लॉकडाउन असल्यामुळे कापूस खरेदी बंद होती. यामुळे शेतकऱ्यांच्या घरात मोठ्या प्रमाणावर कापूस पडून होता. अखेर कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी कापूस विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
लॉकडाउनमध्ये कापूस खरेदीदेखील बंद करण्यात आली होती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या घरात पांढरे सोने पडून राहिले. पूर्ववत कापूस खरेदी सुरू करण्यात यावी अशी ओरड शेतकऱ्यांतून होत होती, तर बाजार समितीचे सभापती अशोक डक यांनी देखील पाठपुरावा केला होता. त्यामुळे लॉकडाउनमध्ये हमी भावाने कापूस खरेदी सुरू करण्याबाबत शासनाचे आदेश प्राप्त झाले असून कापूस खरेदी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

अशी होणार खरेदी
बाजार समितीअंतर्गत मोरेश्वर जिनिंगवर शासकीय कापूस सुरू करण्यात आली आहे. परतु दररोज केवळ २० शेतकऱ्यांच्या कापसाचे माप होणार आहे.
हीच परिस्थिती राहिल्यास तालुक्यातील शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी तब्बल एक वर्षापेक्षाही अधिकचा कालावधी लागणार आहे. यामुळे असून अडचण नसून खोळंबा अशी गत कापूस खरेदीची झाली आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत असलेल्या कापूस खरेदी केंद्रावरून कापूस खरेदी करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. तूर्त एकच शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यास परवानगी दिली आहे. सर्वच्या सर्व कापूस खरेदी केंद्र सुरू केल्यास शेतकऱ्यांच्या कापसाचे लवकर माप होईल. यासाठी शासन पातळीवर पाठपुरावा सुरू आहे.
– अशोक डक, सभापती माजलगांव

error: Content is protected !!