मास्क फ्री होईपर्यंत सर्वांनी जबाबदारीने वागणे आवश्यक-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत
शिवसेनेमार्फत रत्नागिरी तालुक्यातील १८ ते २९ वयोगटातील २५००० नागरिकांचे लसीकरण होणार
रत्नागिरी, दि. २४ : आपण मास्क फ्री होईपर्यंत सर्वांनी जबाबदारीने वागणे आवश्यक असून याची सुरूवात आपल्या स्वतः पासून केली पाहिजे असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले.
आज शिवसेना पक्षामार्फत रत्नागिरी – संगमेश्वर मतदारसंघातील चिंद्रवली व टेंभ्ये – हातिस येथे १८ ते २९ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ श्री.सामंत यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.श्री.सामंत म्हणाले, माननीय शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्याने कोविडची स्थिती अत्यंत चांगल्याप्रकारे हाताळली आहे. आज आपण कोविडच्या स्थितीवर काही प्रमाणात मात करू शकलो आहोत. मात्र, तज्ज्ञांच्या मतानुसार तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सर्वांचे लसीकरण होणे अत्यंत आवश्यक आहे. रत्नागिरी तालुका १००% लसीकरण झालेला राज्यातील पहिला तालुका ठरण्यासाठी सर्वांनी या लसीकरण मोहिमेत सहभागी होणे आवश्यक आहे.
आपण लस घेतल्यानंतर आपल्या कुटुंबातील सदस्य, गावातील नागरिक ज्यांनी आणखी लस घेतलेली नाही अशा नागरिकांना लसीकरण मोहिमेत सहभागी करून घेण्यासाठी तरूणांनी पुढाकार घेतला पाहिजे. सर्वांचे लसीकरण झाल्यानंतर तिसऱ्या लाटेशी सामना करणे सहजसाध्य होईल, असे श्री.सामंत म्हणाले.श्री.सामंत म्हणाले, रत्नागिरी – संगमेश्वर मतदारसंघातील १८ ते २९ वयोगटातील २५००० नागरिकांचे लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाला असून दहा दिवसांत हे लक्ष्य गाठले जाईल.
कोरोनाच्या या लढाईत आपण काही नियम पाळणे आवश्यक आहे. जे काही प्रतिबंधात्मक उपाय पाळले पाहिजेत, यामध्ये मास्क वापरणे, हात धुवणे आणि सुरक्षित अंतर पाळल्यामुळे कोविडवर मात करणे शक्य होईल.
यावेळी, विभागप्रमुख महेंद्र झापडेकर, कांचनताई नागवेकर, तुषार साळवी, सचिन सावंत, उपविभागप्रमुख दत्तात्रेय गांगण, दत्तात्रेय मयेकर, विलास भाताडे, सरपंच सलोनी जोशी व संबंधित उपस्थित होते.