मीच माझा रक्षक
घेऊया काळजी स्वतःची
घातला घाला तरी बेहत्तर
संपर्क संसर्ग टाळूया सारे
बनू देणार नाही बलवत्तर
आज संपूर्ण जगावरच ‘कोरोना’ नावाच्या महामारीची आपत्ती कोसळली आहे. सानथोर सर्वांनाच त्याची बाधा होत आहे. त्यामुळे कोविडच्या विषाणूपासून वाचण्यासाठी प्रत्येकाने स्वतःची काळजी घेणे अपरिहार्य बनले आहे.घराबाहेर जाताना तोंडाला मास्क लावणे, हात सॅनिटायझरने वरचेवर स्वच्छ धुणे, गर्दी टाळून संसर्गाला रोखणे आवश्यक बनले आहे. जीवन हे अनमोल आहे त्याची काळजी घेतली तर पुढचे आयुष्य मजा करू शकू. आपण स्वतःच स्वतःचे रक्षण करू.
देऊ लढा कोरोनाशी
बनूनी स्वतःच रक्षक
टाळूया मोह गर्दीचा
नका बनू प्राणभक्षक
आज प्रशासनाने सर्व विचारांती शाळा-कॉलेजे बंद ठेवून विद्यार्थ्यांसाठी “ऑनलाइन शाळा” चालू केल्या आहेत. या शाळांतून शिक्षण देणे किंवा घेणे मोठे जिकिरीचे झाले आहे. परंतु “समथिंग इज बेटर दॅन नथिंग”. आजच्या महामारीच्या संकटाने सर्व मनुष्यगण सैरभैर झाला आहे.सर्वांचीच विचारमंथन करण्याची बुद्धी कुंठीत झाली आहे. त्यामुळे सर्वत्र सैरभैर वातावरण आहे. जीवन जगायचे आहे. जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करणे त्रासाचे झाले आहे. कारण इथे प्रश्न आहे जीविताचा. आपला जीव धोक्यात घालून कोणीच काहीही करू शकत नाही. सर्वजण फक्त वाट पाहत आहेत त्या दिवसाची, ज्या दिवशी कोरोनाचा पुरता नायनाट होईल. कारण संपर्क नि संसर्गाने फैलावणारा हा रोग हा हा म्हणता आपला पसारा वाढवत आहे. मनुष्याच्या श्वसन यंत्रणेवर मारा करत जीवन खिळखिळे करत आहे. त्यामुळे आज स्वरक्षण करणे गरजेचे होऊन बसले आहे.
कामधंदा आणि नोकरीच्या निमित्ताने काही लोकांना आज घराबाहेर पडावे लागत आहे. त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असताना शिक्षकांवरही मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. हा हा म्हणता शालेय अभ्यासक्रमाचे तीन महिने पार पडले आणि अजूनही शाळांना कुलपे आहेत. त्यामुळे प्रशासनाने शिक्षकांवर ऑनलाईन शाळांची जी जबाबदारी सोपवली आहे ती योग्य रीतीने पार पाडणे शिक्षकांसाठी आव्हान होऊन बसले आहे. रोज सहा सात तास भरणारी शाळा आता ऑनलाईन शिक्षणामुळे दोन तासच भरते. त्यात मुलांना ऑनलाइन विद्यार्जन करणे कठीण काम आहे. आपला देश खेड्यांचा आहे. आजही गावागावांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचलेले नाही. त्यामुळे मोबाईल, लॅपटॉपद्वारे इंटरनेट चालवणे आपले विद्याधन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे शिक्षकांसाठी त्रासाचे आहे. बऱ्याच खेड्यांतुन विजेची पुरेशी व्यवस्था नसताना नेट चालवणे अतिशय दुरापास्त झाले आहे.
घरात निरक्षर आई-वडील आणि एका फोनवर दोन तीन भावंडांचे ‘ऑनलाइन शिक्षण’ ही कसरत पार पाडणे विद्यार्थ्यांना, शिक्षकांना तसेच पालकांनाही डोकेदुखी होऊन बसली आहे. परंतु विद्यार्थी आणि शिक्षक दोघांनीही एकमेकांना सहकार्य करत ते शक्य करून दाखवले तर कोणतीच गोष्ट कठीण नाही. सर्वांनी प्रशासनाच्या या निर्णयाला सहमती दाखवून योग्य ते सहकार्य करावे.शक्य होईल तेवढे ग्रहण करता येतील तेवढे करून विद्यार्थ्यांनी स्वयंअध्ययन करावे आणि शिक्षकांनी गोड शब्दात संयमाने या ऑनलाईन शाळांसाठी प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचा अवलंब ,स्वीकार करावा. त्यामुळे विचारांती पुढची पावले उचलणे प्रशासनाला जाचत ठरणार नाहीत. २०२० साल सर्व जगासाठी विनाशक ठरले आहे. ही गोष्ट अटळ आहे. तरीही मिळालेल्या संधीचे सोने करून घेण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा. फावला, रिकामा वेळ वाया घालवण्यापेक्षा काही नवीन शिकता येईल त्या प्रयत्नात राहिले तर वेळेचा सदुपयोग होईल.आणि आयुष्यातील हा काळही वाया जाणार नाही.
पोलिस,डॉक्टर्स,परिचारिका नि समाजकार्यकर्ते आपल्या जिवाची बाजी लावून कोरोनाशी लढा देत सर्वसामान्य माणसांना आपल्या हातून जेवढी होईल तेवढी मदत पुरवत आहेत. सहकार्य करत आहेत. आपणही त्यांच्या या प्रयत्नांना आपल्या परीने सहकार्य केले तर कोरोना पसरण्याऐवजी कायमचा नष्ट होईल.संयम, शिस्त नि नियमांचे पालन करत फक्त कामापुरतेच घरातून बाहेर पडले तर रोगाला आळा बसेल.आपणा सर्वांना विषाणूंपासून मुक्ती हवी आहे.स्वातंत्र्य किंवा रोगमुक्त होण्यासाठी आपणां सर्वांकडून सहकार्याची अपेक्षा आहे.तरच आपण रोगावर मात करू शकतो. पुन्हा पूर्वीसारखे जीवन जगू शकतो. आज घरात बसल्यामुळे जरी त्रास वाटत असला किंवा बंदिस्त असल्यामुळे जिकिरीचे झाले असले तरीसुद्धा आपल्या जीवनासाठी, प्राण्यासाठी एवढे करणे गरजेचे आहे.महामारीच्या संकटापासून दूर रहायचे असेल तर आपणा सर्वांना स्वरक्षक बनून स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे.
आपली वृत्ती संकुचित न ठेवता स्वबळावर गगनभरारी घेऊ शकण्याची जिद्द बाळगावी. “रिकामे मन सैतानाचे घर” त्यामुळे मनाला सतत कार्यशील ठेवले तर “होत्याचे नव्हते” करून दाखवण्याची धमक मानवामध्ये आहे. काहीतरी वेगळे करून दाखवणे, वाचन, लिखाण यात मन रमवून जे विषय आपणास कठीण वाटतात त्यांचा सराव करणे अशा गोष्टीत कार्यरत राहिले तर कोरोनाच काय कोणताही जिवाणू, विषाणू आपल्या वाऱ्यालाही फिरकणार नाही. कोरोनाचा समूळ नायनाट आज न उद्या होणारच आहे. जगभराचे डॉक्टर्स, संशोधक लसीकरणासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे ज्या वेळी कोरोना जगातून हद्दपार होईल तेव्हा आपण सामान्य मानव न राहता असामान्य, जगाहून वेगळे बनलेले असू अशी जिद्द मनाशी बाळगून त्या योगाने प्रयत्न केले तर “दुनिया मेरी मुठ्ठीमें” येऊ शकते हे सिद्ध करून दाखवू शकतो. हवी फक्त इच्छा आणि प्रयत्नांची जोड.
संकटांची मालिका आली तरी
करू साहसाने त्यावरीच मात
फैलावले असे किती विषाणू
जगू समजदारीने जीवन शांत
सौ.भारती सावंत
मुंबई
9653445835