मी विरोधी पक्षनेत्यासारखं वैफल्यग्रस्त नाही, उद्धव ठाकरेंचा जहरी वार

3 178

शब्दराज ऑनलाईन,दि 21 ःपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातला भरघोस मदत केली आहे. मोदी संवेदनशील आहेत. त्यामुळे ते महाराष्ट्रालाही मदत करतील, असा टोला लगावतानाच मी विरोधी पक्षनेत्यासारखा वैफल्यग्रस्त नाही, अशी जहरी टीका मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सिंधुदुर्गाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी चिवला बीचवरील नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोले लगावले. कोकणात आलेलं चक्रीवादळ भीषण होतं. या वादळामुळे मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे नुकसानग्रस्तांना केंद्राच्या निकषाप्रमाणे मदत देण्याचे आदेश दिले आहेत. नुकसानग्रस्तांसाठी जे जे काही करता येणं शक्य होईल ते करण्यात येईल. नुकसानीचा आढावा जवळपास झाला आहे. पंचनामेही जवळपास झाले असून दोन दिवसात माझ्याकडे अहवाल येईल. त्यानंतर लगेचच निर्णय घेतला जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

पंतप्रधानांकडून मोठी अपेक्षा

केंद्र सरकारनेही अधिकाधिक मदत करावी म्हणून आम्ही विनंती करत आहोत. आम्हाला पंतप्रधानांकडून मोठ्या मदतीची अपेक्षा आहे. तसं आम्ही त्यांना कळवलं आहे. पंतप्रधान संवेदनशील आहेत. त्यांनी गुजरातला मदत केली. महाराष्ट्रालाही नक्कीच मदत करतील, असा चिमटा काढतानाच आम्हाला राजकारण करायचे नाही, विरोधी पक्षनेत्यांसारखा मी वैफल्यग्रस्त नाही, असा टोला त्यांनी लगावला. विरोधकांनी आमची काळजी करू नये. कोकणाचं आणि माझं नातं घट्ट आहे. कुणी कितीही प्रयत्न केला तरी या नात्यात बाधा येणार नाही, असंही ते म्हणाले.

error: Content is protected !!