या अशा कातर वेळी

0 126

          लावते हुरहूर मनाला
सांजेची ही कातरवेळ
का नशिबाने खेळला
आपणांशी पोरखेळ
आज  मनात  अगदी मळभ दाटून  आलं  होतं. दुःखाचे  नि  नैराश्येचे सावट  होते  याचा  अदमास  लागत नव्हता. या  अशा  कातरवेळी का भेटावा तो  असा आपल्याला!  मनाचे एकेक पदर उलगडत गेले.  विचारांच्या घोंघावातच सुनिता अचानक दचकली. मागे  वळून पाहिले  तर  सुरेश  खांद्यावर हात  टाकून  मागेच  उभा होता. सकाळीच भाजी आणायला सुनिता सुरेशच्या स्कूटरवरून बाजारात गेली होती. समोर  नजर गेली  तर बाजारात ‘तो’  उभा असलेला  दिसला. क्षीण  झाला होता, केस विस्कटलेले, डोळे  तांबारलेले. कोण होता तो?  तिच्याशी त्याचा काय संबंध? पणज्ञ नाही, विचारांच्या अशा कल्लोळातच सुनिता  घरी आली. शरीराने कामाला लागलीही  पण  मनाचे काय! ते कुठे स्वस्थ बसू देतेय!  ते तिला भूतकाळात घेऊन गेले.

किती  फुलपाखरी  आयुष्य  होते तिचे!  देवाने  सवडीने  बनवलेले तिचे आरस्पानी  सौंदर्य तिला अहंकारात घेऊन  न  जाईल  तर  नवल!  बॉब केलेल्या केसांची  झुलपं  उडवत  ती चालु लागली की  बघ्यांच्या  नजरा आ ऽ वासत. नितळ गोरी कांती, चाफेकळी नाक, सर्व अवयव निगुतीने  बनवल्याप्रमाणे  आणि एका प्रसंगी  निशांत तिच्या  सहवासात आला. गोरापान , राजबिंडा निशांत  पाहताक्षणी तिला आवडला होता. पण तिने आपण त्या गावचेच नाही  असे दर्शवत त्याचे विचार  मनातून काढून टाकले. तिच्या अहंकारी वृत्तीने तिला तसे करणे भाग पाडले. परंतु निशांतने हे ओळखून तिच्याशी मैत्रीसाठी हात पुढे केला. स्वभाव जुळून येताच पुढे अगदी सोपे झाले.

मुलांनी आपला जोडीदार ठरवला तरी नियतीला ते मान्य नव्हते. सुनिताच्या वडिलांचे हार्ट अॅटॅकने अचानक निधन झाले. तिच्या दादाने मागचा पुढचा विचार न करता तिचे लग्न सुरेशसोबत लावून दिले. सुरेश हुशार,होतकरू होता. थोड्याच दिवसात सुनिता त्याच्यासोबत संसारात रमली आणि भूतकाळ विसरूनही गेली. पण आज रुबाबदार निशांत अशा भरकटलेल्या अवस्थेत नि चुरगळलेल्या कपड्यांमध्ये अचानक समोर दिसावा! सुनिता बेचैन झाली असे काय घडले नि त्याची अशी अवस्था व्हावी! या विचारांनी मनात काहूर मांडले. आपल्यामुळे तरी त्याची ही अवस्था झाली नसेल ना !असा एक विचार मनाला चाटून गेला. अशा या कातरवेळी त्याच्या आठवणींनी सुनीताचे मन पोखरून निघाले.

सौ.भारती सावंत
मुंबई
9653445835

error: Content is protected !!