‘या’ राज्यात वाढवला ३१ जुलैपर्यंत लॉकडाउन
करोनाच्या धोक्यामुळे पश्चिम बंगाल ३१ जुलैपर्यंत लॉकडाउन वाढवला
सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत निर्णय
देशात करोनाचा शिरकाव झाल्यानंतर सुरूवातीच्या काळात करोना प्रसार नियंत्रणात यशस्वी ठरलेल्या पश्चिम बंगालमध्ये दिवसेंदिवस रुग्णांची वाढू लागली आहे. केंद्र सरकारनं अनलॉक करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पश्चिम बंगालमधील करोना रुग्णांची संख्या वाढली होती. त्यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ३० जूनपर्यंत लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पुन्हा महिनाभर लॉकडाउन कायम ठेवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.
पश्चिम बंगालमधील करोना बाधित रुग्णांची संख्या १५ हजारांच्या जवळ पोहोचली आहे. राज्यातील करोनाचा प्रसार वाढत असल्याच्या पार्श्वभूमी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष, बहुजन समाज पक्षाचे मनोज होवलदार, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे नेते स्वपन बॅनर्जी, काँग्रेसचे प्रदीप भट्टाचार्य यांच्यासह इतर पक्षांचे नेते उपस्थित होते.
कोलकत्त्यातील निबान्ना येथे झालेल्या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत राज्यातील परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवरही यावेळी चर्चा झाली. तसेच राज्यातील लॉकडाउन ३१ जुलैपर्यंत वाढविण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
प्रवासी वाहतूक सुरू झाल्यानंतर पश्चिम बंगालमधील करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ झाली होती. त्यामुळे केंद्र सरकारनं लॉकडाउन शिथिल करण्याच्या दिशेनं निर्णय घेतला असतानाही पश्चिम बंगालनं लॉकडाउन कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीप्रमाणे पश्चिम बंगालमधील करोना बाधित रूग्णांची संख्या १४ हजार ७२८ इतकी आहे. यात ५८० जणांचा मृत्यू झाला आहे.