राष्ट्रीय एकात्मता: आजची सर्वश्रेष्ठ निकड
बांधूनी हिंदवी स्वराज्याचे तोरण
पेटवली मनात स्वातंत्र्याची ज्योत
अशा शिवछत्रपतींच्या प्रांगणात
नका विसरू जिव्हाळ्याचे गणगोत
“आम्ही सारे भारतीय आहोत” अशी प्रतिज्ञा छातीवर हात ठेवून आपण सारेजण दरवर्षी स्वातंत्र्यदिनादिवशी घेत असतो. पण वस्तुस्थिती भिन्न आहे. आम्हाला आमच्या इतिहासाचा विसर पडला असे वाटते. आम्ही सारे भारतीय आहोत या भावनेतून निर्माण झालेल्या संघभावनेच्या प्रचंड सामर्थ्याच्या जोरावर आपल्याला आपला भारत स्वतंत्र करण्यात यश लाभले. यासाठी लो. टिळक, महात्मा गांधी या नेत्यांनी आग्रह धरला तो राष्ट्रीय एकात्मतेचा. लो. टिळकांनी एकीच्या तत्वाने “शिवजयंती” आणि “गणेशोत्सव” ही उत्सव सुरु केले. इंग्रजीत एक म्हण आहे “Unity is Strength”.इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत आणि द्वारकेपासून आसामपर्यंत सारा भारत स्वातंत्र्याच्या एकाच ध्येयाने प्रेरित झाला होता. प्रत्येकाचे उद्दिष्ट एकच होते. पारतंत्र्याच्या शृंखला तोडून भारताला स्वातंत्र्य मिळावे.
या एकतेपुढेच बलाढ्य परकीय सत्तेला नमते घ्यावे लागले. स्वातंत्र्योत्तर काळातही जेव्हा आमच्या देशावर परकीय आक्रमण आले, तेव्हा आम्ही सारे भारतीय एकजुटीने शत्रूवर तुटून पडलो. या एकात्मतेच्या भावनेमुळेच नैसर्गिक संकटे, सामाजिक आपत्ती व राजकीय परकीय आक्रमण अशा अरिष्टांवर आपण सहजपणे मात करू शकलो. पूर्वीच्या काळी इमान आणि निष्ठा हेच जीवनात सर्वस्व मानले जाई. परंतु हल्ली इमानदेखील भाकरीच्या तुकड्यासाठी विकले गेलेले दिसते. त्यामुळे एकी किंवा आपलेपणच नष्ट झाले आहे. परकीय राष्ट्रांच्या चिथावणीने आमच्या काही देश बांधवांनी दहशतवाद स्वीकार केलेला आहे. काही जणांनी राजकीय स्वार्थापोटी लोकांच्या धर्मभावना चेतवल्या आहेत.
भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशातील आम्ही नागरिक धर्माच्या नावाखाली आमच्याच देशबांधवांच्या जीवावर उठलो आहोत. गांधीजींनी अहिंसा आणि सत्याग्रह अशी शस्त्रे वापरून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले त्या अहिंसक भारतात आज पैशासाठी हिंसा होताना दिसते. जवळची नाती सुद्धा पैशासाठी तोडली जातात. खून, आत्महत्त्या, बेरोजगारी, महागाई अशासारख्या समस्या भेडसावत आहेत.
आपला देश अनेक राज्ये, विविध भाषा, जीवनशैलीने घडला आहे. पण आज संकुचित विचारसरणीत अडकलेले आम्ही राज्याराज्यातील वादावरून मग तो भौगोलिक असो की पाणी वाटपाचा वाद असो, एकमेकांचे हाडवैरी झालो आहोत. त्यामुळे आमच्यातील एकीला ग्रहण लागले आहे आणि आमच्या एकसंघ भारताची पुन्हा एकदा फाळणी तर होणार नाही ना! अशी शंकेची पाल मनात चुकचुकली. यासाठी गरज आहे आदर्श आणि बहुआयामी नेतृत्वाची. आज पुन्हा एकदा राष्ट्रीय एकात्मता निर्माण करणारा नेता उदयाला येणे जरुरीचे आहे. प्रत्येक भारतीयाच्या मनात राष्ट्रीयत्वाची भावना प्रज्वलित झाली पाहिजे. राष्ट्रीयत्वाचे हे बाळकडू प्रत्येक नागरिकाला मिळाले तरच आमच्यातील उच्चशिक्षित,विद्वान तरुण आपला देश सोडून परदेशात वास्तव्य करणार नाहीत. पैशाच्या लोभाने अतिरेक्यांना आणि परकीयांना आपली गुपिते सांगणार नाहीत, सहकार्य करणार नाहीत, भ्रष्टाचाराचा भस्मासूर आमच्या देशाला ग्रासणार नाही. स्वदेशीऐवजी परदेशी वापरला जाणार नाही. आपली राष्ट्रीय संपत्ती देशातच राहावी. आपल्या सरकारने केलेली पदरमोड देशातच राहावी असे वाटत असेल तर राष्ट्रीय एकात्मता ही आजची खरी निकड आहे हे सर्व भारतीयांनी ध्यानात ठेवावे.
ठेवूया ध्यानी एकीचे बळ सारे
नका विसरू वीरांचे बलिदान
भारत देशाचे नागरिक आपण
राखू एकमेकांचा मान सन्मान
सौ. भारती सावंत
मुंबई
9653445835