रासायनिक खतांचे भाववाढीने जगाचा अन्नदाता आर्थिक संकटात,निफाड परिसरातील शेतकरी संतप्त
रामभाऊ आवारे
निफाड,दि 24 ः
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाला सुरुवात होण्याआधीच रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली असून उत्पादित केलेल्या मालाला खर्चाच्या तुलनेत योग्य भाव मिळत नसल्याने शेती आणि शेती व्यवसाय अडचणीत सापडला आहे.यावर्षी खत कंपन्यांकडून दरवाढ होणार नाही असे सांगूनही भाववाढ करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये शासनाबद्दल नाराजीचे सूर उमटत असुन शासनाच्या या अनागोंदी कारभाराचा तीव्र शब्दात निषेध करण्यात येत आहे. कोरोना काळात आधीच शेतकऱ्यांच्या मालास भाव मिळत नसल्याने आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामात रासायनिक खतांच्या भाववाढीमुळे आर्थिक गणित बिघडणार असून शेतकऱ्यांच्या डोक्यावर असलेले बँक सोसायटी पतसंस्था उसनवारी व व्याजाने घेतलेले पैसे परतफेड करायची तरी कशी ? असा यक्षप्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे.खरीप हंगाम अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपला असतांनाच रासायनिक खतांच्या भरमसाठ दरवाढीने शेतकऱ्यांची अवस्था ‘जोरका झटका धीरेसे लगे ‘अशीच झाली असून शेती करावी की शेती करणे सोडून ? या विवंचनेत तो सापडला आहे.
शेतकऱ्यांनी शेतीतील मशागतीची कामे सुरू केली आहे. प्रमुख रासायनिक खतांचे दर गगनाला भिडले आहेत; पण शेतमालाला मिळणारा भाव बघता हा भाव शेतकऱ्यांना परवडणार नाही. यावर्षी पुन्हा रासायनिक खतांचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांच्या डोक्यावर आर्थिक भार वाढणार असल्याने शेतकरी कर्जाच्या खाईत डूबत चालला आहे.
निफाड तालुक्यात खरिपाची पेरणी जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होते. तत्पूर्वी, शेतकऱ्यांना आपल्या शेतातील काडीकचरा गोळा करणे, नांगरणी, वखरणी,फणणी यासारखी उन्हाळ्यात करण्यात येणारी कामे करायला सुरुवात केली आहे. पावसाचे दिवस अगदी जवळ येउन ठेपले असल्याने शेतकऱ्यांची वेळेवर धांदल होऊ नये म्हणून मे महिन्याच्या अखेरीस बी-बियाणे, खते खरेदी करून ठेवतात. त्यामुळे दुकानदारांनी देखील खते व बी-बियाणेची संबंधित कंपनीकडे नोंदणी केली आहे.शेतकरी डीएपी हे खत मोठ्या प्रमाणात पिकांना देतात.यावर्षी खताचे भाव वाढल्याने खत मिळेल की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
परकीय व नगदी चलन मिळवून देणाऱ्या द्राक्ष पिकाला वर्षभर मेहनत करून द्राक्ष बागे वर परिपक्व काडी तयार करायची असते.यासाठी वर्षभरात या द्राक्ष पिकाला-अनेक वेळा महागड्या लिक्विड खताची मात्रा द्यावी लागते .सोयाबीन पिकाला एकरी एक बॅग खताची आवश्यकता असते.तर भाजीपाला पिकासाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खताचा खर्च येतो. खताच्या किंमतीत सरासरी २५ ते ३० टक्के वाढ झालेली आहे. या भाववाढीचा फटका शेतकऱ्यांना बसणार असून खतासोबत कीटकनाशकांचीही दरवाढ
खताच्या किंमती सोबतच तण नाशक, कीटकनाशक यांच्या भावात देखील वाढ झाली आहे. एकूणच उत्पादन खर्च वाढणार आहे आणि शेत मालाचे भाव या तुलनेने कमी वाढत आहे. शिवाय नैसर्गिक संकटाचा फटका पिकांना बसत असतो. येणारे उत्पन्न आणि होणारा खर्च याचा ताळमेळ बसवताना शेतकऱ्यांना कसरत करावी लागणार आहे.इंधन दरवाढीमुळे मशागतीचे दर वाढले गेल्या काही दिवसापासून पेट्रोल-डिझेलचे भाव दररोज वाढत आहेत. त्यामुळे ट्रॅक्टर मालकांनी आपले दर देखील वाढवले आहेत. अंतर मशागतीचा खर्च सरासरीपेक्षा दीड पटीने वाढला आहे.
विज्ञान व तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगामध्ये दरवर्षी शेतीचा खर्च वाढत चालला असून शेतमालाला मिळणारे भाव मात्र कमी असतात. नैसर्गिक संकटांमुळे कोणतेच पीक पूर्णपणे हाती येत नाही. गत दोन वर्षांपासून कोरोणा महामारीत लॉकडाऊन मुळे द्राक्ष पिकाला कवडीमोल भाव मिळाल्याने द्राक्ष बागायतदार व इतर पिके घेणारा शेतकरी पुरता कर्जबाजारी झाला आहे.
गोकुळ शिंदे -शेतकरी (खडक माळेगाव).
जिल्हा बँकेने सोसायट्यांना तात्काळ कर्जपुरवठा करावा-
द्राक्ष पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये परकीय चलन मिळवून देणारी द्राक्षी पीक असल्याने या पिकाच्या उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक भांडवलाची गरज असते सद्यस्थिती जल्हा बँकेने सहकारी संस्थांना कर्जपुरवठा बंद केल्याने शेतकरी अडचणीत असून शेतकरी हिताचा विचार करून जिल्हा बँकेने सहकारी सोसायट्यांना तात्काळ कर्ज पुरवठा सुरू करावा.
ज्ञानेश्वर रसाळ- युवा शेतकरी (आहेरगाव)