लॉकडाऊनचा अनुभव
भारत माझा देश आहे
सारेच भारतीय बांधव
कोरोना विषाणूने घेरले
सुरू केले जगभर तांडव
कोरोनाने जगभर उच्छाद मांडलाय आणि सार्या मनुष्यजातीलाच घरात बंदिस्त करून टाकलेय. फक्त बंदिस्तच नव्हे तर घाबरवलेही. घरातील काम नि घरातील माणसे इतकाच संपर्क. बाहेरचा संसर्ग टाळण्यासाठी वरचेवर दूरदर्शन, पोलीस नि व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना आवाहन करण्यात येऊ लागले. इटली, अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रात माणसे कीडामुंग्यांसारखी मरायला लागलेली दिसताच आपल्या सरकारने लगेच लॉकडाऊन घोषित केले.आयुष्यात प्रथमच असे संकट अनुभवणारी लहानथोर सगळीजणं भांबावून गेली. जगभरात कोरोनाने जो काही धुमाकूळ घातला आहे त्यांने सकल मनुष्यजातीला नि:शब्द केले आहे. या विषाणूमुळे उद्भवलेल्या परिस्थितीला तोंड देता देता चंद्रावर पोहोचलेला आणि बुद्धीच्या जोरावर अंतराळात उड्डाण घेणारा मनुष्य हतबल झाला आहे. या विषाणूच्या विरोधात लसीकरण प्रक्रिया सुरू झाली असली तरी ते तडकाफडकी होणारे काम नव्हे. पण आज आपल्यासमोर एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गरीब- श्रीमंत, स्त्री- पुरुष हा काहीच भेदभाव तो मानत नाही.
नवीन तंत्रज्ञान शिकलेल्या या आधूनिक पिढीला आपल्या बुद्धिमत्तेवर जो काही आत्मविश्वास होता, तो लूळा पडला आहे, विकलांग झाला आहे.अखेर निसर्गाने आपल्या सामर्थ्याची चुणूक दाखवून दिली आहे. अजूनही वेळ निघून गेली नाही.सरकारने सर्वांचे संरक्षण करण्यासाठी जो काही निर्णय घेतला आहे तो नक्कीच प्रशंसनीय आहे आणि आपण त्यात सफल होणार आहोत. फक्त गरज आहे सर्वांच्या सहकार्याची. इथे सहकार्य इतकेच करायचे की संपर्कातून होणारा संसर्ग टाळायचा. मोठमोठ्या हॉस्पिटलचे डॉक्टर आपल्या सुरक्षेसाठी व्हिडिओ नि लेख पाठवत आहेत ते वाचून त्याच्या अनुषंगाने वागले तर या विषाणूंचा नायनाट करण्यात आपण नक्कीच यशस्वी होणार आहोत.
उघड्या डोळ्यांनी न दिसणारा
हा कोरोनाचा विषाणू डोईजड
एकीने नि बुद्धीने करू सामना
नकाच होऊ देऊ त्याला वरचढ
दैनंदिन खाण्यापिण्याच्या, वापराच्या गोष्टी घरात भरून ठेवल्याने आपण कोरोनाच्यावर मात करू शकतो. अचानक झालेल्या या आघाताने जनता भांबावली आहे. काहीबाही खाऊन दिवस काढू लागली आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्यांना सगळ्यात मोठा फटका सहन करावा लागला. पण माणसातील माणुसकी उपयोगी पडली. माणसातले देवत्व जागे झाले.जागतिक पातळीवरचे आर्थिक बजेट कोसळले असले आणि सगळीकडे महागाई, फसवणूकीची बजबजपूरी असली तरी गरिबाला निदान रोजचे अन्न पाणी मिळू लागले. बऱ्याच संस्थांनी सढळ हातांनी मदतीचा ओघ चालू केला. धर्मादाय संस्थांनी अन्नछत्रे चालू केली.
त्यातून संसर्ग होऊ नये म्हणून मास्क लावणे, हात सॅनिटायझरने स्वच्छ धुणे अशी काळजी घेतली जाऊ लागली. त्यातुन सर्वजण थोडी सावरली आहेत. विषाणूचा सामना करण्यासाठी समर्थ बनली आहेत. त्यामुळे आवश्यक सामानाचा घरात साठा करून वेळ निभावली जात आहे. अत्यावश्यक सेवा करणारे डॉक्टर्स, नर्सेस, बँक कर्मचारी, पोलीस नि दूध पेपरवाले यांना जास्त त्रास होऊ नये म्हणून पूर्णवेळ घरातच बसणे पसंत करू लागली आहेत. काहीजण दूरदर्शन पाहणे, मोबाईलवर चॅटिंग,गेम खेळणे पसंत करतात. तर काही घरगुती गेम्स खेळतात. काही गृहिणी आपल्या उन्हाळ्याच्या साठवणीचे पदार्थ करण्यात गुंतल्या आहेत. इतकेच नव्हे तर काहीजणी नवीन पाककृती बनवून रोज घरच्या लोकांना खाऊ घालण्यातच धन्यता मानत आहेत. मी देखील घरात निरनिराळे पदार्थ बनवणे आणि खाऊ घालणे पसंत करते. तसेच मला कविता, लेख लिहिणे आवडते. वाचन हा माझा छंद आहे. त्यामुळे माझा पूर्ण वेळ मी माझा छंदकार्य करत असते. त्यामुळे कोरोनामुळे माझ्या जीवनावर वाईट प्रभाव नाही तर चांगलाच प्रभाव पडला आहे. घरातच राहून मी माझा व्यायाम,प्राणायामही करते आणि सर्वजण घरीच असल्यामुळे दोन्ही वेळचे जेवण एकत्र बसून गप्पा मारत करत असतो.
एकत्र बसल्यामुळे वैचारिक देवाणघेवाणही होते. घरातील मंडळी आता नव्याने कळू लागल्याप्रमाणे वाटते, कारण सकाळ संध्याकाळी थोडाच वेळ त्यांची सोबत मिळत असायची. तेव्हाही नोकरदार मंडळी घाईगडबडीतच असायची. पण आता कोरोनामुळे चोवीस तास घरात असल्यामुळे गुणाअवगुणांचे अवलोकन झाले. घरात बसून वाढदिवस, सणसोहळे साजरे करणे त्यामुळे बाहेर जाता येत नसल्याचे जास्त दुःख न होता वेळ मजेत जाऊ लागलाय. हॉटेलं बंद झाली असली तरी रोज नवीन पदार्थ बनवण्यामुळे हॉटेलमध्ये जाण्याची कमतरता पुर्ण होते. दूरदर्शनवरील सर्व कार्यक्रम घरात बसून कुटूंबियासमवेत पाहायला मिळत आहेत. उगाच भटकण्यात वाया जाणारा वेळ चांगल्या गोष्टींसाठी व्यतित होऊ लागला आहे. कोरोनारोग घातक आहे हे मान्य आहे.परंतू लॉकडाऊन होऊन घरातच आपापल्या कुटुंबासमवेत बसल्यामुळे आनंदातच व्यतित होतो.मी माझ्यापरीने कोरोनावर मात करण्यासाठी कुटूंबाला सहकार्य करत असते.
माझ्या वाचनाचा नि लिखाणाचा छंद मला फारच फायदेशीर झाला आहे.जसे काही लोकांना घरी बसून कंटाळवाणे झाले आहे.जीवनाची मजा निघून गेलीय असे वाटते. पण मला घरी बसण्याने काहीच तोटा झाला नाही.झालाच असेल तर फायदाच.कोरोनामुळे वाहतुकीवर निर्बंध आले असल्यामुळे घराबाहेर वाहनांचा नि त्यांच्या कर्णकर्कश हॉर्नचा आवाज नाही.घरात पंख्याखाली बसल्याने तीव्र उन्हाच्या झळा सोसाव्या लागत नाहीत.दूध,वृत्तपत्रांसारख्या अत्यावश्यक सेवा घरपोच मिळत असल्याने संसर्गाचा धोका नाही.त्यामुळे शांत वातावरणात मी मन लावून माझे छंद जोपासत असते. दुपारच्या वेळी पोष्टमनची कटकट नाही की कामवाल्यांची वर्दळ नाही.खाऊन पिऊन आराम करत जीवन उपभोगायचे इतकेच.घरातील सर्वजण आपापल्या खोलीत बसून ‘वर्क फ्रॉम होम’ करण्यात गुंतले आहेत नि मी माझ्या व्यापात. त्यामुळे कोणाचा कोणाला त्रासही नाही.सर्व काही आलबेल.फक्त काळजी वाटते अत्यावश्यक सेवा करणाऱ्या राष्ट्रभक्तांची जे आपल्या जीवावर उदार होऊन जनतेला मदतीचा हात देत आहेत. म्हणून आपण सर्वांनीच सरकारने घेतलेल्या निर्णयाचे नीट पालन केले तर त्या लोकांच्या वर ताण न पडता ते आपल्या कुटुंबासोबत सुरक्षित जीवन जगावेत.आता परमेश्वराला एवढीच प्रार्थना की सर्वांना निरोगी ठेवा नि मानवाच्या जीवनातील आनंद पुर्वीसारखा परत आणा.आवाज आणि वायूप्रदूषण नसल्याने आकाशही निरभ्र मोकळे वाटते.हवेतील कोंदटपणालाही आळा बसला आहे.जीवन हे सुंदर आहे.ते निरोगी राहून जगण्यासाठी प्रत्येकानेच आरोग्याची काळजी घ्यायला हवी.स्वत: सोबत इतरांच्याही मृत्यूला जबाबदार नसावे.सर्दी खोकल्यापासून बचाव करावा
आणि विषाणूंचा फुफ्फुसात प्रादूर्भाव होण्यापासून टाळावा.
आयुष्य हे अनमोल गड्या
नको रोगाची शिकार होवू
जनजागृती घडवून आणू
कोरोनाला पळवून लावू
आपण सर्वांनी सरकारच्या या निर्णयाला साथ देऊन सुरक्षित आणि निरोगी राहूया.कोरोनाला देशातूनच नाही तर जगभरातून पिटाळून लावू.समूळ उपटूनच टाकू.
सौ.भारती सावंत
मुंबई
9653445835