वाढत्या लोकसंख्येचे दुष्परिणाम

0 402
         छोटे कुटुंब सुखी कुटुंब
         होई सुखाची भरभराट
         नका वाढवू जनसंख्या
         नसे गर्दीचा कलकलाट
             खरेच आहे! लोकसंख्या वाढीने देशात सुख-समृद्धी होण्याऐवजी दैन्यावस्था  प्राप्त होते.आपल्या भारत देशाची लोकसंख्या ही देशाच्या दारिद्र्याचे प्रमुख कारण आहे. लोकसंख्येची ही वाढ अशीच होत राहिली तर देशातील लोकांना स्थलांतर केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. गेल्या काही वर्षांत भारताची लोकसंख्या शंभर  कोटीच्या जवळपास होती. आता मात्र ती एकशे पस्तीस कोटीच्या जवळपास झाली आहे. त्यात वाढ होतच आहे. त्यामुळे गरीब गरीबच राहिले आहेत. श्रीमंत मात्र हिटलरप्रमाणे सत्ता गाजवू लागले आहेत. आपल्या श्रीमंतीच्या जोरावर सत्ता प्रस्थापित करत आहेत. गरीब त्या सत्तेखाली पिचले जात आहेत, पिळून निघत आहेत. त्याला वाली कोणी उरला नाही. जो तो आपल्याच तुंबड्या भरण्यात मग्न झाला आहे. सर्वसामान्य जनता मात्र होरपळून निघत आहे. यांचा भडाग्नी केव्हा भेटेल हे सांगता येत नाही. मात्र शेवट अत्यंत हृदयद्रावक असा आहे. अन् त्यात गरिबांच्याबरोबर श्रीमंतांची ही राखरांगोळी होणार आहे.
          पृथ्वी हा एक अतिप्रचंड ग्रह आहे. परंतु लोकसंख्येच्या प्रचंड वाढीमुळे तो अत्यंत छोटा म्हणजे चेंडूप्रमाणे वाटतो. सध्या शास्त्रज्ञ लोकांचे दुसऱ्या ग्रहावर जाऊन तिथे स्थायिक होण्याचे प्रयत्न चालू आहेत.परंतु त्यात यश येणे किंवा प्रगती होणे याला भरपूर कालावधी लागणार आहे. तोवर लोकसंख्येचा समतोल साधणे आपल्या हातात आहे. आणि आपण त्यावर नियंत्रण ठेवायलाच हवे. देशात  हुशार कर्तबगार शास्त्रज्ञ लोकांची नवनिर्मिती करण्यासाठी प्रयत्न चालू आहे. पूर्वीच्या काळात शेतात जेवढे पिकवले जाई त्या उत्पन्नावर शेतकऱ्याचे वर्षभरापूरते भागवले जायचे. परंतु लोकसंख्यावाढीमुळे आज जे शेतात पिकवले जाते त्यामुळे त्याचे उत्पादन पुरत नाही.म्हणून उत्पन्न वाढविण्यासाठी आणि अन्नधान्याची कमतरता भासू नये म्हणून निरनिराळे शोध लावण्यात शास्त्रज्ञांना यश प्राप्त झाले आहे. “संकरित शेती” हा विधायक असा घटक आहे. त्यामुळे अन्नधान्याच्या बाबतीत विपुलता आलेली आहे. देश अधिक समृद्ध होण्याचा प्रयत्न करत आहे.
         ‌‌        वाढती लोकसंख्या आपल्या देशाचा अविभाज्य घटक आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे देश आपले राहणीमान व स्वच्छता टिकवण्यात मागे पडला आहे.  सहज सुलभ जीवन जगणे मोठे जिकिरीचे झाले आहे.रोजगार मिळवण्यासाठी खेड्यातील सर्वजण शहराकडे वळू पहात आहेत आणि खेडी ओस पडली आहेत. शेती करण्यासाठी मनुष्यबळ कमी पडते. शहरात महागाई, बेरोजगार, गलिच्छपणा आणि चोऱ्यामाऱ्या यांचे प्रमाण वाढले आहे. देशात नित्य गरजा पुरवण्यासाठी निरनिराळ्या यंत्रणा आहेत पण यंत्रणांनाही मर्यादा पडत आहेत. इतकी अफाट वाढ जनसंख्याच होत आहे. प्रत्येक जीवनावश्यक गरजा भागवणे देशाच्या अर्थव्यवस्थेला कठीण झाले आहे. ती कोलमडली आहे. त्यामुळे लाचखोरी वृत्ती, भ्रष्टाचार, लुटालूट आणि खून यासारख्या समाज विघातक कृत्यांना आळा घालणे महाकठीण होऊन बसले आहे. समाज आपल्या देशाच्या प्रगतीबाबत उदासीन आहे. प्रत्येकाची चांगले व सुखवस्तू जीवन जगण्याची धडपड असते. परंतु वाढत्या लोकसंख्येमुळे ते अशक्य झाले आहे. लोकसंख्येची वाढ रोखण्यासाठी काहीतरी ठोस पावले उचलणे आता समाजाच्या हातात आहे. या अतिप्रचंड लोकसंख्या वाढीवर एकच पर्याय होऊ शकतो म्हणजे कुटुंबात एकच अपत्य जन्मले पाहिजे. कुटुंबनियोजनाचा आवाका, कायदा देशातील सर्व जाती धर्मात रुजवायला हवा. वैयक्तिक मालमत्तेवर काही बंधने आवश्यक आहेत. मुले ही ईश्वराची देणगी आहे त्यामुळे कितीही मुले होऊ द्यायची या विचारांना लगाम हवा. एका घरात एकच मुलगा असेल तर त्याच्या शिक्षणाची जबाबदारी सरकारने स्वीकारून अनेक मुले असणाऱ्यांना शिक्षा केल्या जाव्या किंवा सोयीसुविधांपासून वंचित केले जावे. तेव्हा समाजात जागृती निर्माण होईल. लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम लोकात रुजवले जावेत.
                   लोकसंख्यावाढीमूळे भावी जीवनात कितीतरी संकटांना सामोरे जावे लागेल. बेरोजगार, दारिद्र्य, उपासमारीमूळे  कूप्रवृत्ती बळावते. रस्त्यारस्त्यावर अपराध जन्माला येतील.  माणुसकी विसरली जाईल.पैशासाठी आई-मुलगा ,बहीण-भाऊ राहणार नाहीत. जातीयवाद, प्रांतवाद यासारखे प्रश्न समाजात मूळ धरतील. याचे रूपांतर म्हणजे नैतिक अधःपतन होईल. समाजात एकमेकावर विश्वास राहणार नाही.लोकशाहीऐवजी दडपशाही किंवा हिटलरशाही सुरू होईल. देशाचा विकास होण्याऐवजी अधोगतीच होईल. श्रीमंतांना अधिक महत्त्व प्राप्त होईल. पैशाला किंमत येईल. सचोटी, प्रामाणिकपणा समाजातून हद्दपार होईल. या सर्व समाजविघातक प्रवृत्तींना आळा घालायचा असेल तर त्यांना मुळापासून उपटून टाकण्याचा प्रयत्न करायला हवा. समाजात नवचैतन्य निर्माण व्हावे यासाठी समाजात साक्षरता प्रसार होणे आवश्यक आहे. त्यामुळे आपला समाज जागृत होईल. म्हणूनच उत्पादन वाढवण्यासाठी निराळे प्रयोग संशोधन होऊन अन्नधान्य उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न होईल. वाढत्या लोकसंख्येला आळा बसेल. लोकसंख्या वाढीमुळे बेकारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारला समाजाला रोजगार पुरवणे अशक्य बनले आहे आणि बेकारीच्या प्रश्नाने उग्र स्वरूप धारण केले आहे. लोकशाहीचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना तयार करताना असे म्हटले होते की लोकशाही ज्या प्रमुख तीन तत्वावर आधारित आहे, त्यापैकी एक तत्व म्हणजे सामाजिक लोकशाही. ती आर्थिक  समतेवर अवलंबून असते. पण बेसुमार लोकसंख्या वाढीने आर्थिक विषमता वाढली आहे. समाजाचा लोकशाहीवरील विश्वास नष्ट होऊन हुकूमशहा मालक बनु पाहात आहेत. म्हणूनच सरकार कडून यावर ठोस पावले उचलली जात आहेत. जीवन सुसहय बनू पाहात आहे. लोकांना रोजगाराच्या,स्वयं व्यवसायाच्या संधी मिळत आहेत. आशा करूया सर्वांनी सुख समृद्धीने जीवन जगण्याचा प्रयत्न करू.
सौ.भारती सावंत
मुंबई
error: Content is protected !!