शब्दराज इफेक्ट – पाच रेशन दुकानदारांवर कारवाईचे प्रस्ताव; माजलगावांतील दुकानदारांनाही बजाविल्या नोटिसा

0 75

माजलगांव, प्रतिनिधी – लॉकडाउनच्या काळात सर्वसामान्यांना देण्यात येणाऱ्या धान्यवाटपाचा बोजवारा उडाल्याची बातमी ‘दैनिक शब्दराज’ ने मंगळवारी (दि. २१) प्रकाशित केली होती. यांची दखल घेत तहसीलदारांनी बुधवारी (दि. २२) शहरातील रेशन दुकानदारांना कारणे दाखवा नोटिसा बजाविल्या असून तालुक्यातील पाच रेशन दुकानांवर कारवाईसाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे.
कोरोनाचा वेगाने होणारा फैलाव रोखण्यासाठी महिनाभरापासून लॉकडाउन घोषित करण्यात आल्याने सर्वकाही ठप्प झाले आहे. बंदच्या काळात हातावर पोट असलेल्या गोरगरिबांचे हाल होऊ नयेत, यासाठी प्रशासनाने मोठ्याप्रमाणात स्वस्त धान्याचा पुरवठा केला आहे. आलेले धान्य लाभार्थीपर्यंत पोचविण्यासाठी कडक निर्बंध घालत प्रत्येक दुकानासाठी शासकीय कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. असे असतानाही कोरोनासारख्या महामारीच्या संकटातही गोरगरिबांच्या धान्यात काळाबाजार करण्याची संधी अनेकांनी सोडली नाही.
‘माजलगावात स्वस्त धान्य दुकानदारांची मनमानी, अनेक दुकाने बंद ‘ या शीर्षकाखाली ‘दैनिक शब्दराज’ ने मंगळवारच्या (दि.२१) अंकात बातमी प्रकाशित करून शहरातील अनेक दुकान बंद असणे, सर्व्हर डाऊनच्या नावाखाली लाभार्थीना पावत्या न देणे, मोफतचे धान्य मोजून न देता अंदाजे देऊन कमी देणे, जादा भावाने पैसे घेणे असे प्रकार होत असल्याचे उघड केले होते. याची दखल घेत बुधवारी महसूल प्रशासनाने शहरातील रेशन दुकानदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. गैरव्यवहार करणाऱ्या तालुक्यातील खेर्डा खुर्द, किट्टी आडगाव, गोविंदवाडी, वारोळा तांडा, टाकरवण तांडा येथील रेशन दुकानांवर कारवाईसाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्याकडे पाठविला आहे.

कोरोनाच्या संकटात सर्वसामान्यांना धान्य मिळणे गरजेचे असताना काही दुकानदारांकडून गैरव्यवहार होत आहे. शहरातील दुकानदारांना नोटिसा बजाविल्या असून समाधानकारक उत्तर न आल्यास कारवाई केली जाईल.
-डॉ.प्रतिभा गोरे, तहसीलदार

error: Content is protected !!