शाळा बंद पडल्या तर…

1 1,322
      सांग सांग भोलानाथ
      पाऊस पडेल का
      शाळेभोवती तळे साचून
      सुट्टी मिळेल का
              आमच्या लहानपणी मराठी विषयात परीक्षेमध्ये निबंधलेखनाचा प्रश्न असायचा. हमखास एक निबंध विचारला जायचा. “शाळाच बंद पडल्या तर!” आम्ही सारे विद्यार्थी त्यावर भर भरून लिहायचो. शाळा बंद पडल्या तर आई झोपेतुन उठवणार नाही. गृहपाठ, अभ्यास काहीच नसेल. आठ तास शाळेत बसायला नको. फक्त खेळायचे आणि लोळायचे. खूप खूप मजा येईल. दिवसभर खाऊ खायचा, दूरदर्शन वरील कार्यक्रम पाहायचे. मज्जाच मज्जा! तसेच मारकुट्या गुरुजींची छडी खायला नको. गृहपाठ झाला नाही तर अंगठे धरुन उभे रहायची शिक्षा नको.युनिफॉर्म घालून शाळेच्या शिस्तीत राहावे लागणार नाही. वगैरे वगैरे.
              आमच्या लहानपणीचे हे स्वप्न २०२० सालाने पूर्ण केले.सुरवातीला ही सर्व बच्चेकंपनी घरात राहायला मिळणार, दूरदर्शनवरील सर्व कार्यक्रम पाहायला मिळणार, वाटेल ते खायला आणि खेळायला मिळणार या आनंदात एकदम खूष होते. आई सकाळी झोपेतून उठवतही नव्हती. त्यामुळे खुशाल लोळायचे, खायचे-प्यायचे आणि खेळायचे. परंतु कोरोनाच्या संकटामुळे त्याचा कहर वाढतच गेला. तसतसे मुलांना बाहेर जाण्याची बंदी आली. चार भिंतीच्या आतच बंदिस्त घरातच बसावे लागले. त्यामुळे मुले आता “घरी बसायला नको पण शाळा हवी” असे म्हणू लागले आहेत. गेले सात महिने घरात राहून कंटाळलेली ही बच्चेकंपनी आता नवीन गाणे म्हणत आहेत.
         असुदे अभ्यास गृहपाठ
          उघडू दे आमची शाळा
          घरातच झालोय बंदिस्त
          पण कोणी म्हणेना खेळा
              सहा महिन्यापासून कोरोनाचा जो काही कहर झाला आहे, त्यामुळे मुले शाळा नसूनही कंटाळली आहेत. कारण शाळा नाही आणि खेळणेही नाही, मैदानावरची मस्ती नाही, दोस्तांसंगे भांडण नाही. घराच्या चार भिंतीत कोंडून घुसमट वाढली आहे .आता “भीक नको पण कुत्रे आवर” म्हणजे नको दूरदर्शनचे कार्यक्रम किंवा लोळणे आणि फक्त खाणे परंतू शाळेत जाऊन मित्रमैत्रिणींच्या गळ्यात गळे झालेले घालून अभ्यास करणे किंवा मैदानावर जाऊन हुंदडणे, खेळणे मुलांना आवडू लागले आहे. असे म्हणण्याची पाळी आली आहे .शाळा हवी, अभ्यास हवा परंतु हे२४ तास घरी बसून राहण्याची शिक्षा नको असे वाटू लागले आहे.असेच ही फुलाप्रमाणे सुकोमल मने म्हणत आहेत.घरात राहून त्यांची कुचंबणा होऊ लागली आहे.
        घराबाहेर मोकाट फुलपाखरासारखे स्वच्छंद बागडायचे त्यांचे वय.परंतु या कोरोनामूळे सगळ्यात गोष्टींवर बंदी आणली आहे. त्यांना पूर्वीसारखे घरा बाहेर जायचे आहे, मित्र-मैत्रिणींना भेटायचे आहे, एकमेकांच्या खोड्या काढायच्या आहेत. मस्ती करायची आहे. तसेच अभ्यास करून कोणीतरी मोठे बनायचे आहे. त्यासाठी फक्त आणि फक्त शाळा हवी आहे. घरातून बाहेर पडण्यासाठी  मुले सैरभैर झाली आहेत. किती दिवस असेच चालणार आहे किंवा मुलांना अशा शिक्षेला सामोरे जावे लागणार आहे देवच जाणे! हल्ली जरी शासनाने ऑनलाइन शाळा सुरू केली  असली तरी बऱ्याच ठिकाणी खेड्या पाड्यातुन मोबाईल, लॅपटॉपची व्यवस्था नसल्यामुळे शाळा चालू करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे त्या मुलांना ऑनलाइन शाळेचा काहीही फायदा होत नाही. मोबाईल नाही, नेट उपलब्ध नसते. त्यामुळे शासनाचा हा प्रयत्न अयशस्वी झाला आहे. शहरात देखील मुलांना ऑनलाइन शाळा जरी उपलब्ध असतील तरी बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे. एका घरात दोन दोन, तीन तीन मुले ऑनलाइन शाळा कशी शिकु शकणार! त्यामुळे मोबाईलने अभ्यास  होणार! शिक्षक आणि पालकांना हा प्रश्नच आहे. त्यांनाही बऱ्याच संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्याचा शेवट कुठे आहे ते कोणी सांगू शकत नाही.
             लसीकरणाचे काम जरी युद्धपातळीवर सुरू असले तरी ते इतके सहजासहजी किंवा लवकर होणारे नाही. आता फक्त स्वतःच्या सुरक्षितेसाठी प्रयत्न करणे आणि गर्दीतील संपर्क टाळून कोरोनावर मात करणे आणि त्याची बाधा होऊ न देणे हाच त्याच्यावर उत्तम उपाय आहे. मानवजातीच्या हितासाठीच आहे आणि कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न करणे महत्त्वाचे. त्यामुळे हे संकट लवकरात लवकर दूर होईल आणि या इवल्या लेकरांना चार भिंतीच्या तुरुंगातून सुटका होऊन मुक्त मैदानावर खेळता येईल. यासाठी गरज आहे समजूतदार पणाची आणि सहकार्याची.
         बाबा नका जाऊ बाहेर
         नको मला खेळणी खाऊ
         राहूया घरामध्ये बंदिस्त

         दारात आहे कोरोना बाऊ

bharti sawant
सौ.भारती सावंत
मुंबई
9653445835
error: Content is protected !!