शाळा बंद : शेतातील कामाला हातभार खरीप पेरणीच्या काळात विद्यार्थ्यांची होतेय पालकांना मदत
वडवणी,धनंजय माने:- जून महिन्याच्या सुरुवातीलाच समाधानकारक पाऊस झाल्याने या वर्षी खरीप हंगामातील पेरणीची सुरुवात झाली आहे . या वर्षी कोरोनामुळे शाळा सुरू व्हायला वेळ असल्याने शालेय विद्यार्थी देखील पेरणीसाठी आपापल्या आई – वडिलांना मदत करीत आहेत . त्यामुळे पेरणीला वेग आला आहे .
वडवणी तालुक्यात दरवर्षीच्या तुलनेत या वर्षी पावसाळा लवकर सुरू झाला . विशेष म्हणजे जून महिन्यात सुरुवातीलाच दमदार पावसाने हजेरी हजरी लावली . जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाला आहे . त्यामुळे तालुक्यातील सर्वच गाव शिवारात खरिपाच्या पेरणीला सुरुवात झाली डोंगराळ भूभाग जास्त असणाऱ्या वडवणी तालुक्यातील बहुतेक जमीन हलकी ते मध्यम स्वरूपाची आहे .
सिंचनाखालील क्षेत्र कमी असल्याने पावसावर अवलंबून असणारी कोरडवाहू शेती येथील शेतकऱ्यांना जास्त प्रमाणात करावी लागते . त्यामुळे पावसाळ्यातील सुरुवातीला जून महिन्यात चांगला पाऊस पडावा ही शेतकऱ्यांची अपेक्षा असते .
या वर्षी जूनच्या पहिल्याच आठवड्यात तालुक्यातील सर्वच गाव शिवारात दमदार पाऊस झाल्याने जमिनीत पेरणीयोग्य ओल निर्माण झाली आहे . त्यामुळे शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीला सुरुवात केली आहे . कवडगाव आणि वडवणी महसूल मंडळात कापूस , तुरीची लागवड करण्यासाठी लगबग सुरू आहे .
अधूनमधून पाऊस होत असल्याने शेतात वापसा टिकून राहत नाही . त्यामुळे वापसा असताना लागवड उरकून घेण्यासाठी शेतकरी घाई करताना दिसत आहेत . एकाच वेळी सर्वच शेतकऱ्यांची लागवड सुरू झाल्याने मजुरांचा तुटवडा निर्माण झाला आहे .
त्यामुळे विद्यार्थी देखील पेरणीसाठी आपापल्या आई वडिलांना मदत करण्यासाठी शेतात जाऊ लागले आहेत . या वर्षी कोरोनामुळे शाळा सुरू व्हायला वेळ असल्याने शालेय विद्यार्थी घरीच आहेत .
शिवाय अनेक दिवसांपासून विद्यार्थी घरीच राहून कंटाळले आहेत , त्यामुळे विद्यार्थ्यांनादेखील शेतात जाऊन कापूस , तूर लागवड करताना मौज वाटत आहे.यामुळे शेतातील कामे गतीने होत आहेत .
पावसात काळजी घ्यावी : वडवणी तालुक्यातील मोरवड शिवारात आई वडिलांना कापूस लागवड करण्यासाठी मदत करण्यासाठी बहीण – भाऊ गेले होते . परंतु वीज अंगावर पडल्याने त्यांचा मृत्यू झाला . सध्या शेतातील कामे सुरू असून अशा वेळी पाऊस आल्यास सुरक्षित ठिकाणी थांबणे आवश्यक आहे . पालकांनीही याची विशेष काळजी घ्यायला हवी .
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});