शासनाने सुरक्षा साधने न देता माणगांवात कोरोना मुक्तीसाठी नियुक्त केलेल्या सर्व कर्मचार्यांची आरोग्य सुरक्षा रामभरोसे

0 85

माणगांव, विश्वास गायकवाड – कोरोना व्हायरस या महाभयंकर संसर्गजन्य रोगाचा संपूर्ण जगात फैलाव झाला आहे. कोरोना विषाणू महामारीच्या वाढत्या संक्रमणकारी संसर्गामुळे संपूर्ण जगभरातील कोरोना बाधीतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. संपूर्ण जगासह भारतातील अनेक निष्पाप नागरिकांचा या रोगाने बळी घेतला आहे. कोरोना विषाणूचा भारतात दिवसेंदिवस वाढत चाललेला फैलाव रोखण्यासाठी आणि कोरोना विषाणूचे समूळ उच्चाटन करण्यासाठी भारतातील सर्व सरकारी निमसरकारी खात्याचे कर्मचारी डाॅक्टर्स, नर्स व सर्व प्रकारच्या वैद्यकीय यंत्रणा कंबर कसून अहोरात्र कामाला लागल्या आहेत. शासनाने कोरोना विषाणूची संक्रमण साखळी रोखण्यासाठी संपूर्ण देशात तीन मे पर्यंत लाॅकडाऊन वाढवले असून त्या अनुषंगाने शासनाची कोरोना मुक्तीची ही लढाई सुरू आहे. कोरोना मुक्तीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्यात कोरोना मुक्तीसाठी आणि तालुक्यातील विविध ठिकाणच्या गावात कोरोनाच्या भीतीने मुंबई, पुणे इत्यादी ठिकाणाहून आपापल्या गावात आलेल्या लोकांना कोरोना प्रतिबंधक सुरक्षेच्या दृष्टीने शासनाने त्या त्या ठिकाणच्या शाळांमध्ये कोरोंटाईन केले आहे.
या सर्व कोरोंटाईन केलेल्या लोकांच्या आरोग्य विषयक देखरेखीसाठी शासनाने आरोग्य खाते, पोलीस खाते,महसूल खाते, पंचायत समिती आदी सरकारी निमसरकारी खात्यातील कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे. या मध्ये शासनाने प्रामुख्याने पोलीस, डाॅक्टर्स, नर्स, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स इत्यादींची टीम अहोरात्र कोरोना मुक्तीसाठी तैनात केली आहे.
कोरोना मुक्तीसाठी तैनात केलेल्या या सर्व सरकारी निमसरकारी कर्मचारी आणि सर्व प्रकारच्या टीमला शासनाने कोणत्याही प्रकारच्या स्व सुरक्षात्मक कोरोना प्रतिबंधक सुरक्षा संसाधनांचा अर्थात मास्क, हॅन्ड सॅनिटाइजर, कोरोना प्रतिबंधक सुरक्षा कीट इत्यादी अत्यावश्यक साधनांचा पुरवठा केलेला नाही. त्यामुळे स्वतः चा जीव धोक्यात घालून कोरोना मुक्तीचे महान राष्ट्रीय कार्य करणाऱ्या सर्व कर्मचार्यांची आरोग्य सुरक्षा रामभरोसे झाली आहे. त्यामुळे सर्व कर्मचारी वर्गात कोरोना संसर्गाचे भयगंड निर्माण झाले आहे. आणि ते स्वाभाविक आहे. कारण शासनाने कोरोंटाईन केलेल्यां लोकांपैकी काही लोकांना जरी कोरोनाचा संसर्ग झालेला असेल तर त्यांच्या संपर्कात येणाऱ्या या सर्व कर्मचारी आणि संपूर्ण टीमचे आरोग्य धोक्यात येवू शकते. असे झाले तर या परिस्थितीला जबाबदार कोण असेल ? अर्थातच सरकार. कोरोना मुक्तीच्या राष्ट्रीय कार्यासाठी नियुक्त केलेल्या सर्व कर्मचारी आणि संपूर्ण सिस्टीमला स्व सुरक्षात्मक कोरोना संसर्ग प्रतिबंधक संसाधने पुरवणे कोणाची जबाबदारी आहे? तर सरकारची. मग सरकार आपले कर्मचारी आणि सर्व प्रकारच्या सिस्टीमच्या आरोग्य सुरक्षे विषयी अशा प्रकारे बेफिकीर का अाहे ? असा कोरोना मुक्तीच्या राष्ट्रीय कार्यात स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या सर्व कर्मचारी आणि संपूर्ण टीमचा रास्त सवाल आहे. त्यामुळे कोरोना मुक्तीच्या राष्ट्रीय कार्यासाठी ज्यांची नियुक्ती केली आहे त्या सर्वांना शासनाकडून स्व सुरक्षात्मक कोरोना प्रतिबंधक साधनांचा पुरेसा पुरवठा होणे अपेक्षित आहे.

error: Content is protected !!