स्त्रियांनी दुर्गा व्हावे हे कितपत योग्य?
आपल्या देशाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. महान ज्ञानवंत स्त्रिया जसे लोपामुद्रा, गार्गी ,मैत्रेयी यांच्यापासून ते थोर संत स्त्रियां बहिणाबाई, जनाबाई, निर्मलाबाई यांच्यापर्यंत समाजाला शिकवण देण्याचे काम स्त्रियांकडून होत गेले आहे. घरात दळिता ,कांडिता देखील स्त्रियां बोधप्रद शिकवण समाजाला देत असतात आणि प्रबोधन करत असतात. छत्रपती शिवरायांना घडवणारी ती जिजाऊ स्त्रीच होती. तिच्या स्वप्नांच्या कुंचल्यातूनच घडलेले शिवराय मूठभर मावळ्यांच्या मदतीने हिंदवी स्वराज्य उभारू शकले. फार पूर्वीपासून खूप महान वीरांगणा होऊन गेल्या आहेत. त्यात राणी ताराबाई, राणी लक्ष्मीबाई तसेच राणी येसूबाई.एवढेच नाही तर महाभारतकालीन, रामायणातील कैकेयीराणीनेही आपल्या पतीला म्हणजे दशरथ राजाला लढाईसाठी सहाय्य केले होते. परंतु तो काळ वेगळा होता. तेव्हा शत्रू माहीत होता. आज आपल्यातच एक शत्रू दडलेला आहे आणि तो नात्यातील ही असू शकतो.
तो शत्रु कधी घाला घालेल, शोषित करेल याचा नेम नसतो. त्यामुळे नक्की शत्रू कोण आहे हे मुलींना, स्त्रियांना कळत नाही. आज परिस्थिती इतकी बोकाळली आहे की घरात भाऊ, वडील, काका, मामा ही नातीही लाजिरवाणी वाटावी असे वर्तन घडू पाहत आहे. अशावेळी मुलींनी कराटे आणि जुदो शिकणे अपरिहार्य झाले आहे. कारण पहिल्यापासून स्त्रीला दुबळे म्हणूनच वागवले गेले आहे. स्त्रीची जागा खेटराजवळ. स्त्रीने मान वर करून बोलायची हिंमत दाखवताच तिची मान मोडली जाते.त्यामुळे तिने मान खाली घालूनच राहायचं अशी वृत्ती असल्यामुळे स्त्रियांना पहिल्यापासून खूपच जाच, त्रास सहन करावा लागला आहे. शारीरिक त्रास किंवा मानसिक त्रासापेक्षाही लैंगिक त्रास मुलींचे आयुष्य बरबाद करून टाकतो. आणि याला कारण आहे स्त्रीचं नमतेपणा घेऊन वागणं. स्त्रीला सौंदर्याचे जे वरदान देवाकडून सहज मिळाले आहे यात तिची काही चूक नाही. परंतु समाजातील लांडग्यांना तिच्यात आई, बहीण, वहिनी, मावशी न दिसता एक मादीच दिसते आणि असे लिंगपिसाट तिच्या मागावर राहतात. संधी मिळताच तिचा उपभोग घेतात, तिच्यावर अत्याचार करतात. त्यावेळी ते अजिबात विचार करत नाहीत की तिच्या फुलासारख्या मनावर किती परिणाम होईल किंवा तिचे आयुष्य बरबाद तर होणार नाही ना! त्यांची वासनेची भूक भागल्यानंतर तिला मारून टाकतात किंवा कुत्र्यासारखे रस्त्यावर सोडून निघून जातात. अशा नराधमांना फाशीची शिक्षा व्हायलाच हवी. परंतु आपल्या देशातील न्याय व्यवस्था इतकी संथ गतीने जात असते की त्या मुलीला न्याय मिळेपर्यंत तिचे सर्व आयुष्य नष्ट झालेले असते. धनदांडग्यांची मुले पैसे देऊन देखील सुटतात. त्यामुळे तिला योग्य न्याय मिळत नाही. त्यामुळे सच्चा न्याय मिळवण्यासाठी मुलींना आज सक्तीने स्वतःच्या सुरक्षिततेचे नियम शिकवावेत आणि कराटे वगैरे शिकवून त्यांनी स्वतःचे संरक्षण करावे. स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून घराबाहेर पडली आहे. पूर्वीसारखी मुळूमुळू रडत, चूल आणि मूल सांभाळत असणारी स्त्री आज नाही. आधुनिक काळातील वीरांगणा ही अष्टभुजा नि आपल्या घराचा, संसाराचा, मुलाबाळांचा आणि नोकरीचा ताण सांभाळत असते. अशावेळी तिच्यावर अत्याचार होत असेल तर तिने का म्हणून सहन करावा? तीदेखील साक्षर आहे, सक्षम आहे. मग त्रास करून घेण्यासाठी का तिने जन्माला यावे? समाजात स्त्रीला दुय्यम मानणे हाच पहिला गुन्हा आहे. आणि हा गुन्हा पुरुषांकडून केला जातो. किंबहुना स्त्रीकडून ही स्त्रीची पिळवणूक होत असते. अशी पिळवणूक होऊ नये म्हणून स्त्रियांनी स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःचा उदरनिर्वाह करतानाच, संसार सांभाळतानाच स्वसंरक्षणाची जबाबदारी घ्यावी असे मला वाटते. त्याशिवाय स्त्री ही प्रसंगी वाघीण बनू शकते हे पुरुषजातीतील नर जमातीला कळणार नाही. तेथे तिच्यावर अत्याचार करायला धजावणार नाहीत. तिच्यात आपल्या आई, बहिणीला पाहतील.आज सर्व बाबतीत स्त्रिया पुढे जात असताना जर तिच्यावर अजून अन्याय होत असेल तर तिने तो का म्हणून सहन करायचा?
आज तिने एक शस्त्र ही हातात ठेवायला हरकत नाही. जेणेकरून ती स्वतःच्या सुरक्षेचा प्रश्न सोडवू शकते.पुराणकाळात देवी-देवतांना ही राक्षसांचा संहार करण्यासाठी जन्माला यावे लागले होते. म्हणून आज मुलींनी आपल्यातल्या देवींना जागृत करून स्वतःचा सन्मान वाढवण्यासाठी सुरक्षित राहणे आणि स्वतःच्या सुरक्षेचा प्रश्न स्वत:च सोडवणे आवश्यक आहे.
सौ.भारती सावंत
मुंबई