नगर परिषद व नगर पंचायतचे कर्मचारी काळ्याफिती लावून काम करणार
सेलू, प्रतिनिधी – राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायत मधील सफाई कामगार व इतर अत्यावश्यक सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा जीवनविमा उतरवणे बाबत शासनाकडून सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षामुळे, शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दिनांक 27 एप्रिल रोजी पालिका कर्मचारी काळ्या फिती लावून काम करणार आहेत.
कोरोना लढ्या मध्ये शासकीय कामगारांना, आरोग्य कामगारांना शासनाने वीमा कवच दिले मात्र नगर परिषद, नगर पंचायत कामगारांना डावलले. राज्यांमध्ये कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. नगर परिषदेचे मुख्याधिकारी, सफाई कामगार, अग्निशमन कर्मचारी, पाणीपुरवठा कर्मचारी, तसेच सर्व विभागातील कर्मचारी 14 फेब्रुवारी पासून कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू नये, व त्याचा प्रसार होऊ नये यासाठी, अहोरात्र शहरातील प्रत्येक भागात औषधी फवारणी, नव्याने आलेल्या लोकांची माहिती संकलित करण्याचे काम करणे, यात शहरात शहरातील येणाऱ्या नागरिकावर लक्ष ठेवण्यासाठी नाकेबंदी करणे, त्यांच्या नोंदी घेणे, या मध्ये गर्दीच्या ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून वेगवेगळ्या भागात पथके निर्माण करून कारवाई करण्यात व्यस्त आहेत. अशी कामे प्रत्येक कर्मचारी व स्वतः मुख्याधिकारी देखील करत आहेत. ते 24 तास प्रशासनाच्या कामात लक्ष घालत आहेत.
राज्यातील अनेक विभागातील कर्मचाऱ्यांचा विमा उतरून, राज्य शासनाने वैद्यकीय संरक्षण दिले आहे. संघटनेने नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना देखील विमा उतरणे बाबत व आरोग्य सुविधा पुरविण्याबाबत वारंवार शासनाकडे पाठपुरावा केला आहे. तसेच कोरोनासारखे मोठे संकट व त्याचा सामना कर्मचारी करत असताना, नगरपालिका कर्मचाऱ्यांना शासनाकडून विमा संरक्षण मिळत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांची मानसिकता व मनोधैर्य यांचे खच्चीकरण होत आहे. नगरपालिकेकडून दैनंदिन साफसफाईचे काम नेहमीप्रमाणे सुरू आहे. तसेच कोरोनाचा संपूर्ण नायनाट होईपर्यंत, हे सर्व कर्मचारी काम करतच राहणार आहेत. परंतु शासनाने 26 एप्रिल पर्यंत पालिका कर्मचाऱ्यांचा विमा उतरविण्यात बाबत निर्णय न घेतल्यास शासनाच्या उदासीन धोरनाबाबत राज्यातील नगर परिषद मधील सर्व अधिकारी, कर्मचारी दिनांक 27 एप्रिल रोजी काळ्या फिती लावून काम करतील, असा इशारा कर्मचारी संघटनेच्या वतीने सदरील निवेदनाद्वारे दिला आहे. या निवदेनावर स्वामी एम.बी., सुधाकर देशमुख, अ. खलील, एस.के. समींद्रे, मो.मसूद मो. युनूस, उगळे एम.आर. आदींच्या स्वाक्षर्या आहेत.