इंग्लिशला देशीचा पर्याय… आता देशीचा पर्याय खुंटल्याने गावराणचा धुमधडाका
माजलगांवसह तालुक्यातील परिसरात गावठी दारू विक्रीत वाढ
माजलगांव, धनंजय माने – एकीकडे कोरोना विषाणूचे संक्रमण होऊ नये यासाठी शासनाने बार, वाइन शॉप, देशी दारूची दुकाने बंद ठेवली असल्याने तळीरामांची मोठी पंचाईत झाली आहे. त्यामुळे गावरान (गावठी) दारूला चांगलीच मागणी वाढली असून चढ्या भावाने ही गावरान दारू सहज उपलब्ध होत आहे.
सद्या जिल्ह्यात लॉगडाऊन असल्याने सर्व प्रकारची दुकाने बंद राहत मध्ये मोहफुल विक्रीला आवर बसल्याने गावठी दारू बनविणाऱ्यानी चक्क गूळ, नवसागर तर रासायनिक केमिकलच्या माध्यमातून गावठी दारू बनवून तळीरामांना खुश करण्याची नामी संधी शोधत त्यांच्या आरोग्यावरच घाला घातला आहे. सद्या जिल्हा प्रशासन योग्य ती काळजी घेत जिल्हावासियांना घरीच बसण्याचे आवाहन करीत असल्याने सिक्सटी, नाइनटी मारणाऱ्यांची खूप पंचाईत झाली आहे. संपूर्ण जिल्ह्यातील बार, वाइन शॉप व देशी दारूची दुकाने बंद असल्याने विशेष करून ग्रामीण भागात बनविल्या जाणाऱ्या गावठी दारूला मोठे उधाण आले असून माजलगांव तालुक्यातील ग्रामीण भागात चढ्या भावाने खुलेआम या दारूची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
तालुक्यातील काही गांवातील गावठी दारू आड्याच्या ठिकाणी पोलिसांनी छापे टाकून दारू पकडल्याचे प्रकरणे समोर येत असले तरी तालुक्यातील अनेक ठिकाणी हा व्यवसाय खुलेआम चालु आहे. एक प्रकारे इंग्लिशला चोरी छुपके देशीचा पर्याय सापडत असून देशीचा पर्यायही अनेक ठिकाणी खुंटत असल्याने गावरान (गावठी) दारू धुमधडाक्यात विक्रीस उपलब्ध होत आहे.
अनेक ठिकाणी पोलिसांचे छापे, गती वाढविण्याची गरज
तालुक्यातील अनेक गांवात पोलिसानी छापे टाकुन हजारो लिटर दारू जप्त करत गावठी दारूचे अनेक अड्डे उध्वस्त केले आहे. तरी देखील गावठी दारू बनवुन विक्री पुरवठा करने मात्र चालुच आहे.
मोहफुलाचा तुटवडा, गूळ, नवसागर व केमिकलचा होतोय वापर, जनतेचे आरोग्य धोक्यात
ग्रामीण भागात शहरी भागातून येणाऱ्या मोहफुलाला पायबंद बसल्याने गावात सहज उपलब्ध होणाऱ्या गुळापासून त्यात नवसागर टाकण्यासोबतच रायायनिक केमिकलच्या माध्यमातून तळीरामांना चढ्या भावाने गावठी दारू विकल्या जात असल्याने त्यातून आरोग्याचा प्रश्न उपस्थित होत आहे.
पोलीस व प्रशासनाचे पथक रस्त्यावर, तरीही धंदा तेजीत
सध्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक गावात दररोज पोलीस व महसूलचे पथक दौरा करत असून जनतेला सामाजिक अंतर व घरातून बाहेर न पडण्याच्या इशारा वजा सूचना देत असतांनाही खुलेआप मिळणाऱ्या व तस्करी होणाऱ्या गावठी दारू विक्रीवर पाहिजे तो वचक नसल्याने या धंद्याला उत येत आहे.
शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला
एक महिन्यापासून लॉगडाऊन सुरू असल्याने बिअर बार, शॉपी व देशी दारू विक्रीची दुकाने कोरोना विषाणूचे संक्रमण होऊ नये म्हणून बंद आहेत. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला असतांना मात्र ग्रामीण भागातील गावठी दारूच्या अड्ड्याना उधाण आल्याने अनेकांना ही दारू सहज उपलब्ध होत आहे.