घरपोच आंबा विक्रीतून चार लाखांचे उत्पन्न; लोणगावच्या शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

0 382

माजलगांव ,धनंजय माने:-तालुक्यातील लोणगाव येथील प्रगतिशील शेतकरी विलास जाधव यांनी मागील १४ वर्षापूर्वी लागवड केलेल्या आमराईतून चार टन आंब्याचे उत्पादन झाले असून यातून चार लाख रुपयांचे उत्पन्न त्यांनी घरपोच आंबा विक्रीतून मिळविले आहे. तर या सेंद्रिय केशर आंब्याला ग्राहकांची मोठी मागणी आहे.

 

लोणगाव ( ता . माजलगांव ) येथील शेतकरी विलास जाधव यांना पाच एकर जमीन आहे. या जमिनीत त्यांनी आंब्याची लागवड करीत आमराई जोपासली आहे. २००६ मध्ये त्यांनी अडीच एकरमध्ये ठिबक सिंचनावर १२५ आंब्याच्या झाडांची लागवड केली होती. २०१० पासून या आमराईतून प्रत्यक्ष आंबा उत्पादनास सुरवात झाली. रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय खतावर या आंब्याच्या बागा जाधव यांनी जोपासल्या आहेत.

 

यावर्षी आंब्याला चांगला मोहोर आला होता. दहा ते बारा टन आंबा उत्पादन होण्याचा अंदाज होता ; परंतु प्रत्यक्षात अवकाळीमुळे मोहोर गळाला, झाडाच्या फांद्या वादळामुळे तुटून पडल्या यामुळे जवळपास सहा टन आंब्याचे नुकसान झाले. उपलब्ध पाण्याचे नियोजन केल्याने अवकाळी व वादळाच्या तडाख्यातून वाचलेल्या या बागेतून चार टन आंब्याचे उत्पादन हाती आले असून यातून चार लाख रुपयांचे उत्पन्न या शेतकऱ्याला मिळाले आहे. मागील अनेक वर्षांपासून नैसर्गिकरीत्या पिकविलेल्या या आंब्याला वेगळी चव असल्याने ग्रामीण भागासह माजलगांव शहरात मोठी मागणी आहे.
या सेंद्रिय केशर आंब्याला १२० रुपये प्रतिकिलो भाव मिळत आहे. आमराईची निगा राखण्यासाठी पत्नी मौनाबाई, तर मुलगा वैभव आणि अजय यांचे सहकार्य मिळत असल्याने आंबा विक्री जोमात सुरू आहे .

थेट आमराईतूनच होते विक्री 
कोरोनामुळे लॉकडाउन असले तरी चवदार व गोड आंबा असल्याने ग्राहकाच्या पसंतीस हा आंबा उतरला आहे. आमराईतच आंब्याची आडी केली असून, गवतामध्ये पिकविलेल्या या आंब्याच्या खरेदीसाठी ग्राहक थेट बांधावर येऊन खरेदी करतात.

शेततळ्याचे पाणी आमराईला
उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता भासू नये म्हणून पावसाळ्यातील वाहून जाणारे अतिरिक्त पाणी जमा करण्यासाठी दहा गुंठ्यांमध्ये तीस लाख लिटर क्षमता असलेले शेततळे केले असून , या शेततळ्यातील पाणी आमराईला देण्यात येते .

“निसर्गाच्या लहरीपणामुळे सातत्याने आमराईतून कमी – अधिक प्रमाणावर नुकसान होत आहे. यावर्षी हंगामाच्या सुरवातीस आमराईतील सर्वच आंब्याची परिस्थिती चांगली होती ; परंतु अवकाळीने व वादळाने त्यांचे मोठे नुकसान झाले. परिणामी सहा टन आंबा उत्पन्न खचले. जेमतेम चार टन आंबा हाती आला असून प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही या आंब्याला वाढती मागणी आहे. -विलास जाधव , शेतकरी , लोणगाव.

खळबळजनक… बीडमध्ये तिहेरी हत्याकांड; महिलेसह दोन मुलांची हत्या

error: Content is protected !!