सह्याद्री कॉलनीत शिरले नाल्याचे घाण पाणी तक्रार देऊनही कोणतीच दखल नाही ; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

0 99

माजलगांव, (प्रतिनिधी):- शहरालगत असलेल्या भाटवडगाव येथील सह्याद्री कॉलनीत परिसरातील नाल्याचे घाण पाणी शिरले आहे . यामुळे कॉलनीतील नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असून , डासांची संख्या वाढल्याने त्यांचे आरोग्यही धोक्यात आले आहे . याबाबत ग्रामपंचायत , गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी , तोंडी तक्रार देऊनही अद्याप कोणतीच दखल घेतली नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले .

शहराचा विस्तार झपाट्याने वाढत असल्याने शहरालगत असलेल्या भाटवडगाव शिवारात नागरिकांचे मोठे वास्तव्य झाले असून , मध्यमवर्गीय , नोकरदार कुटुंब राहतात . परिसरातून गेलेल्या एका नाल्याचे पाणी सह्याद्री कॉलनीत शिरले असून , मोठा डोह साचला आहे . हे पाणी अनेक वस्त्यांमधून येत असल्याने मोठी दुर्गंधी सुटली असून , नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे . घाण पाण्यामुळे डासांची संख्याही मोठ्याप्रमाणात वाढल्याने कॉलनीतील नागरिक , लहान मुलांना तापाच्या साथीची लागण झाली आहे . अनेक घरांना या पाण्याने वेढा टाकल्याने नागरिकांना ये – जा करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागतेय .

याबाबत सह्याद्री कॉलनीतील नागरिकांनी भाटवडगाव ग्रामपंचायतीचे सरपंच , ग्रामसेवक , गटविकास अधिकारी यांना तोंडी , लेखी निवेदने देऊनही अद्यापपर्यंत कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही . यामुळे कॉलनीत येणाऱ्या घाण पाण्याची विल्हेवाट न लावल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबिल्याशिवाय पर्याय नसल्याचे नागरिकांनी बोलून दाखविले .

“कॉलनीत शिरलेल्या नाल्याच्या पाण्याची खूप दुर्गंधी सुटली असल्याने लहान मुले , वयोवृद्धांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे . अनेकदा सांगूनही कोणीच दखल घेत नसल्याने आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय राहिला नाही .
– रणजित राठोड , नागरिक .

चिमूर तालुक्यातही शिरला कोरोना

 

error: Content is protected !!