ऑनलाइन शाळेचं चांगभलं
चीनमधून आलेल्या कोरोनाच्या विषाणूने जगभर आपले ठाण मांडले आहे. आज जाईल उद्या जाईल म्हणत चार महिन्यापासून तो जाण्याचे नावच घेत नाही. गेल्या वर्षाच्या शेवटच्या सत्राच्या परीक्षा सरकारने रद्द केल्या. परंतु या वर्षीच्या पाठ्यक्रमाची सुरुवात करण्याचा निर्णय घेत ऑनलाइन शाळा सुरू केल्या. परंतु आधीच कोरोनामुळे कामे बंद झालीत, बेरोजगारी आलीय आणि खाण्याचे वांदे झालेत तिथे मुलांना अँड्रॉइड मोबाईल देणे जिकिरीचे होऊन बसले आहे.
घरात सर्वांचा मिळून एकच अॅंड्रॉईड फोन असतो. तो घेऊन दिवसभर वडील कामाला जातात. मग विद्यार्थी ऑनलाइन शाळा कशी शिकणार? पदरमोड करून ते फोन आणण्याचा प्रयत्नही करतील पण कोरोनामुळे दुकाने बंद आहेत त्यामुळे मोबाईल खरेदी करणे शक्यच नाही. मुलांना शाळेत जाऊन मुक्तांगणात गेल्याचे समाधान मिळते.
शाळेत फक्त अभ्यासच नसून विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्यातून मुलांना बक्षीसे, पारितोषिक देऊन सन्मानित केले जाते. दिवसभर फक्त विषयांचे वर्ग नसून चित्रकला, क्राफ्ट, संगीत, पी.टी. असेही विषय समाविष्ट असतात. मुलांच्या कलागुणांना वाव मिळतो.
बिनभिंतीची असावी
लहान मुलांची शाळा
प्राणी-पक्षी निसर्गात
हूंदडा बागडा न् खेळा
शाळेत मुलांच्या कलागुणांना खूप वाव मिळतो. खेळल्याने मुलांच्या अंगातील रगही जिरवली जाते.घाम गळेपर्यंत व्यायाम केल्यानंतर मुलांची मने प्रफुल्लित होतात.मुले अभ्यासाव्यतिरिक्त मारामारी, भांडणे, खोडकरपणा यातूनही आपले वेगळेपण दाखवतात. मोबाईल किंवा लॅपटॉपची स्क्रीनपुढे सुतकी चेहऱ्याने बसून हा आनंद कसा मिळणार?
शिवाय बर्याच ठिकाणी लोडशेडिंग,नेट चालू नसणे किंवा हळू चालणे, घरात अनेक भावंडे असणे त्यात सगळा गुंता झालेला दिसतो. यामुळे बाई काही सांगतात, शिकवतात ते ऐकायला अडचणी येतात. कधी कधी बाईंनी पाठवलेल्या लिंकस् उघडल्याही जात नाहीत. तसेच फोनला रिचार्ज करण्यासाठी आई-वडिलांना अशक्य होते.
अशा कितीतरी अडचणीतून ऑनलाईन अभ्यास होणे म्हणजे महासागरातील शिंपला शोधण्यासारखे आहे.एका घरात तीन भावंडे असतील शिवाय घराची, जागेची अडचण असेल तर प्रत्येक मुलासाठी स्वतंत्र खोली मिळणे दुरापास्तच. अशा आर्थिक किंवा मानसिक ओढाताणीतून ऐकलेले बाईंचे लेक्चर डोईवरून गेल्याप्रमाणे आहे.
शाळे मधले गुरुजन
शिकवती तनामनाने
कसे व्हावे आकलन
आज शासनच जाणे
कित्येक घरात लहान बाळे असतात. त्यांचे रडणे, ओरडणे त्यातून ऑनलाइन शाळेत लक्ष कसे लागणार? मुले शाळेत जाता-येता खेळत,दंगामस्ती करत घरी येतात.त्यातून थोडेसे मनोरंजन करून घेतात. आता गेले तीन-साडेतीन महिने मुले संसर्गाच्या भीतीने घराबाहेर पडली नाहीत. त्यांना ना काही मनोरंजन ना अभ्यासाचा आनंद घेता आला. त्यामुळे त्यांची मानसिक स्थिती आधीच कमकुवत झाली आहे. त्यातून ही ऑनलाईन शाळा कशी भावणार? त्यामुळे सरकारने मुलांच्या शालेय नुकसानीसाठी काढलेल्या ऑनलाइन शाळेचा फतवा म्हणजे मुले,पालक नि शिक्षकांना शिक्षेप्रमाणेच वाटत आहे. यातून ना पालकांना सुख,नाही शाळेतील शिक्षकांना आराम आणि ना मुलांना समाधान. विद्यार्थ्यांच्या घरची परिस्थिती तशीच शिक्षकांच्या घरची परिस्थिती असते. त्यांना शाळेतील मुलांना शिकवण्यासोबत आपल्या मुलांचाही पालक या नात्याने अभ्यास करून घ्यावयाचा असतो. त्यांच्या ऑनलाइन अभ्यासवर्गात हजेरी लावायची असते. त्यामुळे सर्वांचेच मानसिक खच्चीकरण होते. त्यातून काहीच साध्य होत नाही. त्यामुळे शासनाने ऑनलाइन शाळांचे असे काही बाजारीकरण चालू केले आहे ते कोणाच्याही फायद्याचे नाही. त्यातून पैसा जाऊनही फलित काहीच नाही. उलट मनस्तापच अधिक आहे. त्यातून पैसा जाऊनही फलित काहीच नाही.पालकवर्ग घरखर्च कसा भागवायचा या चिंतेत असता मोबाईल नेटचे पैसे भरण्यासाठी अजूनच काळजीत वाटतात. शिवाय लाईट गेल्यावर बुडलेले लेक्चर्स मुलांच्या डोक्यात भरवताना शिक्षकही त्रस्त आहेत. शिक्षकांना घरातील दबावा- सोबत पालक नि वरिष्ठांचा दबावही सहन करावा लागतो. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणात काही तथ्य वाटत नाही.उलट सर्वांचेच मानसिक संतुलन ढासळल्या- प्रमाणे वाटते. मुलांना समाधान नाही ना शिक्षकांना संतुष्टी.बऱ्याच प्रायव्हेट शाळांतून पालकांकडून फी मिळत नसल्याने शिक्षकांना पगार मिळतही नाही. त्यामुळे फुकट शिक्षण देणारे शिक्षक किती आणि कसे तळमळीने शिकवणार हेही प्रश्नचिन्हच आहे. शहरात थोडी अनुकूल परिस्थिती असेल, परंतु खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाने किती फायदा होणार हे शासन, शिक्षक आणि विद्यार्थीच जाणे.
नसावा मनस्ताप कधी
शाळेत मुले रहावी प्रसन्न
ऑनलाईन या शाळेमुळे
त्रस्त पालक न् पाल्य खिन्न
सौ. भारती सावंत
मुंबई
‘या’ दिवशी लागणार बारावीचा निकाल
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});