गणेशखिंड, पुणे व लांडोरखोरी, जळगाव यांना जैविक वारसा क्षेत्र घोषित करणार – वनमंत्री संजय राठोड
मुंबई : गणेशखिंड उद्यान पुणे येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे झोनल कृषी संशोधन केंद्र असून येथील 33.01 हेक्टर क्षेत्र व जळगाव शहरालगत लांडोरखोरी येथील 48.08 हेक्टर क्षेत्र जैविक वारसा क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येणार असल्याची माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली.
वनमंत्री श्री.राठोड पुढे म्हणाले, राष्ट्रीय जैविक विविधता मंडळ चेन्नई यांचेकडून जैविक वारसा स्थळे घोषित करण्याबाबत राज्यांना मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत.राज्यात नागपूर येथे जैविक विविधता मंडळ कार्यरत असून राज्यातील जैविक विविधतेबाबत ते कामकाज करीत आहे. यापूर्वी राज्यात ग्लोरी ऑफ आल्लापल्ली, गडचिरोली हे पहिले जैविक वारसा क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मान्यतेनंतर आता गणेशखिंड, पुणे व लांडोरखोरी, जळगाव हे नवीन जैविक वारसा क्षेत्र म्हणून घोषित केले जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
गणेशखिंड, पुणे
गणेशखिंड उद्यान पुणे येथे पिकांच्या 49 जाती, फळांच्या 23 जाती उपलब्ध आहेत. या उद्यानात 35 विविध क्षेत्र असून तेथे विविध वृक्ष व फळझाडे आहेत. यापैकी काही वृक्ष हे 100 वर्ष जुने आहेत. गणेशखिंड पुणे या केंद्राने विविध पिके व फळे यांच्या नवीन 19 जाती विकसित केल्या आहेत. पेशव्यांच्या काळात या भागात आंब्याची बाग विकसित करण्यात आली होती. ब्रिटिशांच्या कारकीर्दीत गव्हर्नर जनरल सर जॉन माल्कम यांनी हे उद्यान विकसित केले. काही वर्षांनंतर जॉर्ज मार्शल वूड्रो यांनी 1873 मध्ये या बोटॅनिकल गार्डनची जबाबदारी स्वीकारली. पुढे राहुरी कृषी विद्यापीठाने या उद्यानाला स्वतःच्या कार्यक्षेत्रात सामावून घेतले आणि त्या पेशवेकालीन आंब्याच्या बागेचे आणि जुन्या झाडांचे संवर्धन केले आहे. उद्यानाच्या सर्व स्थित्यंतरांची कागदपत्रेही उपलब्ध आहेत.
जैववैविध्याचा अनमोल ठेवा
गणेशखिंड फळ संशोधन केंद्राच्या पेशवेकालीन आंब्याच्या बागेतील आंब्याची जात हा इतरत्र न आढळणारा जनुकीय ठेवा आहे. याशिवाय, या बागेत 165 प्रकारची जंगलात आढळणारी झाडे आहेत. यातील 48 वनस्पती औषधी आहेत. दुर्मिळ प्रकारातील बुरशी, सूक्ष्म जीवांच्याही नोंदी आहेत. विद्यापीठाने या बागेची जैवविविधता नोंदवही (बायोडायव्हर्सिटी रजिस्टर) तयार केली असून यात वनस्पतींबरोबरच सरपटणारे प्राणी, कासव, बेडूक, किडे आणि तेथील सर्व पिकांची सविस्तर माहिती त्यामध्ये आहे.
लांडोरखोरी, जळगाव
लांडोरखोरी जळगाव हे स्थळ मेहरून या गावात स्थित असून मेहरून जलाशयाच्या जवळ आहे.हे स्थळ राखीव वन क्षेत्रात असून जळगाव वन विभागाच्या अखत्यारीत आहे.याबाबत जळगाव नगरपालिकेचा संमती ठराव प्राप्त झाला आहे.या क्षेत्रावर बोरीची झाडे असून येथे विविध पक्षी व प्राण्यांचा अधिवास आहे.
मोरांचे अधिवास क्षेत्र
लांडोरखोरी हे क्षेत्र मोर या पक्षाचे अधिवास केंद्र आहे.लांडोरखोरी वनोद्यान हे 48.08 हेक्टर क्षेत्रावर जैवविविधतेने नैसर्गिक अधिवास क्षेत्र आहे. जळगाव वनविभागाने गेल्या पाच वर्षांपासून जाणीवपूर्वक प्रयत्न करून हिरवा पट्टा विकसित केला आहे. समृद्ध जैवविविधतेने संपन्न अशा खैर, नीम, अंजन, बोर, बाभूळ, काटेसावर, शेवगा, आपटा, हेंकळ या सारख्या 70 हून अधिक वनस्पतींच्या प्रजाती या ठिकाणी आहेत. तर रानडुकर, चिंकारा, निलगाय, ससा, मुंगुस, मोर सारख्या सस्तन प्राण्यांचा वावर, दगड पाल, साधी पाल, उद्यान सरडा, शामेलीयन, धामण, कवड्या, तस्कर सारख्या सरपटणाऱ्या प्राण्यांच्या 15 पेक्षा जास्त प्रजातीही येथे आहेत. तसेच चंडोल, कापशी, सोनपाठी सुतार, कोतवाल, युरोपियन चाष, शिक्रा इत्यादी स्थानिक व स्थलांतरीत पक्षांच्या 68 प्रजाती येथे आढळून येतात. या 48.08 हेक्टरपैकी 10 हेक्टरमध्ये हे वनोद्योन विकसित केले गेले आहे.
राज्यातील अधिकाधिक जैविक वारसा क्षेत्रे शोधून त्यांचे जतन व संवर्धन करण्यात यावे अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्या आहेत.अशा प्रकारे जैविक वारसा स्थळे निर्माण केल्याने या क्षेत्रातील प्राणी, पक्षी व वनस्पती संवर्धन योजना तयार करण्यात येऊन प्रजातीचे मूळ स्थळी संवर्धन व वंशवृद्धी करण्यात येते. म्हणून येणाऱ्या काळात राज्यात अशी अनेक ठिकाणे शोधून त्यांना जैविक वारसा स्थळे म्हणून घोषित करणार असल्याची माहितीही वनमंत्री संजय राठोड यांनी दिली.