गंगाखेडात “कविता पावसाच्या” कविसंमेलनातून श्रोते झाले मंत्रमुग्ध
तुझा कोकिळ दिवाना बघ माझ्यावर जळे, तुझ्या माझ्या भिजण्याचे रोज पाहतो सोहळे
परभणी,दि 15 (प्रतिनिधी)ः
संत जनाबाई साहित्य मंडळाच्या वतीने दरवर्षी “कविता पावसाच्या” या कविसंमेलनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. कोरोना च्या वाढत्या पार्श्वभूमीवर हे संमेलन यावर्षी रविवार ता. 13 जून रोजी सायंकाळी पाच वाजता झूम मिटींग च्या माध्यमातून पार पडले.
प्रा.डॉ. दीनानाथ फुलवाडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या संमेलनात साहित्य मंडळातील अनेक कवींनी आपली हजेरी लावली. यामध्ये महेश कोरडे यांनी “तुझा कोकिळ दिवाना बघ माझ्यावर जळे, तुझ्या माझ्या भिजण्याचे रोज पाहतो सोहळे” ही प्रेमाची महंती व्यक्त करणारी कविता सादर केली. रामेश्वर किरडे यांनी “रात्र अशी बहरत जावी त्यातच तुझी आठवण यावी, अन् मग तुझ्याच आठवणीत प्रिये ही बेधुंद गाणी गावी” ही प्रेमकविता सादर केली. डी.के.गुट्टे यांनी “संथ कोसळे पाऊस मीच मला सोबतीला, थेंबाळती आठवणी नभ झोंबे पापणीला ही नैसर्गिक रचना सादर केली. प्रा. डॉ. एम. डी. इंगोले यांनी “तेरे हाथों से जहर पी लेते खुशी खुशी, दर पे मेरे तुम्हारा गुजारा होता ही हिंदी काव्यरचना सादर केली. प्रा. डॉ. संतोष हंकारे यांनी “भ्रष्टाचार, दंगली , जाळपोळ लुटालूट हे सारं कधी थांबायचं, भेसूर भयाण भूकेकंगालाचं आयुष्य सांगा कुठवर जगायचं” ही सामाजिक वास्तव्याचे भान असणारी कविता सादर केली. श्रीराम घडे यांनी “शेताला शेताला निघाली माय, माझ्या शेताची पायवाट धरते माय” तर अध्यक्षीय समारोपात डॉ. दीनानाथ फुलवाडकर यांनी “थेंब थेंब पावसाचा धरती ओळवते, कण कण मातीचा बघा भविष्य तोलतो” ही निसर्गावरील भाष्य करणारी रचना सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. संतोष हंकारे तर आभार महेश कोरडे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी प्रा.डॉ. किर्तीकुमार मोरे, नाट्यकलावंत त्र्यंबक वडसकर तसेच साहित्य मंडळाच्या सदस्यांसह अनेकांची उपस्थिती होती.