सर्वसामान्य नागरिकांसाठी आळंदी ग्रामीण रुग्णालयात बाह्यरुग्ण सेवा सुरू करावी : ज्ञानेश्वर बनसोडे
आळंदी, प्रतिनिधी – महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या श्री क्षेत्र आळंदीत कोविड रुग्णांचे प्रमाण फार कमी असून दिनांक तीन सप्टेंबर पर्यंत आळंदीत फक्त पाच कोविडचे रुग्ण बाधीत असून यामुळे आळंदी ग्रामीण रुग्णालयात सर्वसामान्य नागरिकांना बाह्य रुग्ण सेवा बंद करण्यात आली होती परंतु आता कोविडचे रुग्णांचे प्रमाण कमी होत असून सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांसाठी आळंदी ग्रामीण रुग्णालयात बाह्य रुग्ण सेवा लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी आळंदी शहर भाजप ओबीसी आघाडीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर बनसोडे यांनी आळंदी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.गणपत जाधव यांना रितसर निवेदना मार्फत केली आहे.
आळंदी ग्रामीण रुग्णालयात बाह्यरुग्ण सेवा बंद असल्या कारणाने सामान्य नागरिकांची आर्थिकहानी होत असून सध्याच्या कोविड परिस्थितीमुळे बाह्य रुग्णांना ग्रामीण रुग्णालयात उपचार होत नाही त्यामुळे गोरगरीब जनतेला उपचारासाठी इतरत्र खाजगी रुग्णालयात जावे लागत आहे, ज्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून त्यांना खाजगी रुग्णालयातील उपचार घेणे परवडत नसून त्यामुळे सर्वसामान्य जनतेसाठी ग्रामीण रुग्णालयात बाह्य रुग्ण सेवा पुन्हा एकदा सुरु करावी यामुळे सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांना वेळेत व मोफत उपचार उपलब्ध होतील आणि त्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही अशी मागणी भाजप ओबीसी आघाडीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर बनसोडे यांनी निवेदनात केली आहे.
याबाबत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.गणपत जाधव यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की वरून आदेश प्राप्त झाल्यानंतर आळंदी ग्रामीण रुग्णालयात बाह्यरुग्ण सेवा सुरू करण्यात येणार आहे.