महात्मा गांधींचे विचार आचरणात आणले तर संकटाच्या परिस्थितीतून बाहेर पडू शकतो – ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे
पुणे ,दि 03 (प्रतिनिधी)ः
भारताची ओळखच मुळात गांधींजींचा, बुद्धांचा, टागोरांचा भारत अशी आहे. त्यांचे विचार आपल्याला प्रेरणा देत असतात. आज देशात परिस्थिती वेगळी आहे. पण गांधींजींचे विचार आपण आचरणात आणले तर या सगळ्या संकटाच्या परिस्थितीतून आपण बाहेर पडू शकतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार, संपादक अरुण खोरे यांनी केले.
महात्मा गांधी यांच्या 152 व्या जयंतीचे औचित्य साधून ह्युमॅनिटी फाउंडेशनच्या वर्धापनदिनानिमित्त दरवर्षी देण्यात येणार ‘महात्मा गांधी लिगसी अवॉर्ड 2021’ हा पुरस्कार यंदा अरुण खोरे यांना विविध धर्मांच्या धर्मगुरूंच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी खोरे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मौलाना करी इद्रीस, फादर नरेश अंबाला, भन्ते सुदस्सन, सिख ग्रंथी निर्मलसिंग निहाल, ह्युमॅनिटी फाउंडेशनचे अध्यक्ष कुमेल रझा, सेक्रेटरी मूर्तझा शेख आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच याप्रसंगी फाउंडेशनच्या वतीने गांधी जयंती निमित्त घेण्यात आलेल्या निबंध आणि चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.
अरुण खोरे म्हणाले, गांधींजीं सोबत लाल बहादूर शास्त्री हे देखील माझे आवडते व्यक्तिमत्व. मी जेव्हा लहान होतो तेव्हा दुष्काळ पडला होता. अन् भारतीयांना अन्न कसं द्यायचं हा मोठा प्रश्न त्यावेळी उपस्थित झाला होता. तेव्हा शास्त्रीजींनी गांधीजींना सुचवल की दर सोमवारी उपवास करायचा. अन् तेव्हापासून भारतात सोमवारच्या उपवासाला सुरूवात झाली. आज देखील शास्त्री कुटूंबिय त्या निर्णयाच्या स्मरणार्थ सोमवारचा उपवास करतात. गांधींजी, शास्त्रीजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, चाचा नेहरू हे आपल्या सर्वांसाठी आदर्श असून हा आपला एक गोतावळा आहे. या गोतावळ्यात आपल्याला साधेपणा दिसतो. शिक्षणासाठीची आवड दिसते.
पुढे बोलताना पुणे आणि महात्मा गांधी यांचे अतूट नाते आहे. गांधींजींना त्यांचे राजकीय गुरू गोपाळकृष्ण गोखले हे पुण्यामध्ये भेटले. त्यांचे पुण्यात खूपकाळ वास्तव्य होते. गांधीजी म्हणतात तत्वाशिवाय राजकारण केले तर ते वेगळ्या दिशेने जाते. आपल्या राजकीय पक्षांनी, सामाजिक संघटनांची वाटचाल तत्वाला धरून झाली तर कधीच हिंसा होणार नाही असेही खोरे म्हणाले.
ह्युमॅनिटी फाउंडेशनच्या वतीने आजपर्यंत एक हजाराहून अधिक गरजू मुलांना मोफत संगणक प्रशिक्षण देण्यात आले आहे. अनेक गरजू मुलांना शालेय फी, शैक्षणिक साहित्य देण्यात येते या उपक्रमाचे उपस्थित सर्व धर्मगुरूंनी कौतुक केले. ह्युमॅनिटी फाउंडेशनच्या वतीने गरजू मुलांसाठी स्पोकन इंग्लिशचे मोफत क्लास घेतले जातात, लॉकडाउन मध्ये ते बंद होते, येत्या 14 नोव्हेंबर पासून पुन्हा ते सुरू होणार असल्याचे कुमेल रझा यांनी सांगितले.