तुका म्हणे : भाग १५ :बुरा मत देखो , बुरा मत सूनो , बुरा मत बोलो
पुण्यात शिक्षण घेत असताना आम्ही मित्रमंडळी सहज फिरत होतो. एका दुकानासमोर गांधीजींच्या तीन माकडांचा शो पीस ठेवला होता. माझा एक मित्र आम्हास सांगू लागला , हे तीन माकड आपल्याला सांगत आहेत – बुरा मत देखो , बुरा मत सूनो, बुरा मत बोलो. तेवढ्यात एक दारु प्यालेला माणूस बाजूने जात होता व जोरजोरात वाईट- अभद्र बोलत होता. दुसरा आमचा एक मित्र लगेच म्हणाला , गांधीजीनुसार चला आता डोळे बंद करा, कान झाका, तोंडावर बोट.. दुकानांमध्ये एक गृहस्थ बसले होते , ते म्हणाले या तीन माकडांचा अर्थ शब्दशः नाही रे मुलांनो, तो तर तुकाराम महाराजांनी खूप छान अभंगात सांगितला आहे तो असा ,
तुका म्हणे
पापांची वासना नको दांवू डोळा l त्याहुनि आंधळा बराच मी ll
निंदेचे श्रवण नको माझे कानी l बधिर करोनि ठेवी देवा ll
अपवित्र वाणी नको माझ्या मुखा l त्याहुनि मुका बराच मी ll
नको मज कधी परस्त्रिसंगती l जनांतुन मातीं उठता भली ll
तुका म्हणे मज अवघ्याचा कंटाळा l तू एक गोपाळा आवडसी ll
गांधीजी येरवडा जेलमध्ये असताना त्यांनी या अभंगाचे रुपांतर इंग्लिश मध्ये केले होते ते असे
O God, let me not be witness to desire for sin, better make me blind;
Let me not hear ill of anyone, better make me deaf;
Let not a sinful word escape my lips, better make me dumb;
Let me not lust after another’s wife, better that I disappear from this earth.
Tuka says: I am tired of everything worldly, Thee alone I like, O Gopal.
दुकानातील ते गृहस्थ एवढे बोलून झाल्यावर अर्थ विश्लेषण करून सांगू लागले, तो असा..
१) बुरा मत देखो :
आपल्या आजुबाजूस सतत काहीना काही घटना घडत असतात. त्यात अनेक चांगल्या – वाईट , ज्या आपल्या डोळ्यांनी पहिल्या जातात. या गोष्टीचे परिणाम आपल्यावर सतत होत असतात.
एखादी वाईट घटना घडणे , एखाद्याने वाईट कृती करणे हे आपल्या आवाक्याबाहेरील गोष्टी आहेत . परंतु त्या घटनेकडे, व्यक्तीकडे कोणत्या दृष्टीकोनातून पाहायचे हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असते. अश्या वेळी कोणत्या गोष्टींना आत्मसात करायचे व किती बाबींना दुर्लक्षित करायचे हे आपणच ठरवायचे असते. म्हणजेच आपली अस्वस्थता त्या दिसणाऱ्या घटनेवर, व्यक्तीवर ठरत नसून आपल्या दृष्टीकोनावर ठरते. मग आपणच ठरवायचे या दृष्टीकोनाच्या चष्म्यातून किती गोष्टीं गाळायच्या व किती पाहायचा . म्हणजेच See towards the whole world with the help of spect of rational eyes (views) – म्हणजेच जगाकडे पाहताना विवेकी दृष्टिकोनाचा चष्मा डोळ्यावर बसवा व आवश्यक गोष्टी पहा आणि उरलेल्या गाळून टाका .
तुकोबारायांच्या अभंगातील आंधळेपणा किंवा गांधीजींच्या माकडाच्या डोळ्यावरील हाथ म्हणजे जा गोष्टींच्या पाहण्याने आपल्या मनाची अस्वस्थता वाढेल, राग, क्रोध, वासना इत्यादी भावना वाढतील , अश्या गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे – Selective Blindness…
२) बुरा मत सुनो :
समाजात जगताना आपणास अनेक गोष्टी ऐकावयास मिळतात. त्यावर आपण नेहमी म्हणत असतो त्याने मला असं म्हणायला नको होतं, तो वाईटच बोलला, किती घाण आहेत ही लोक किती वाईट बोलतात.
आपल्या कानी एखादी वाईट गोष्ट पडली किंवा कोणी वाईट बोलले तर आपण त्या गोष्टीचे स्व:गत आपल्या कानी स्वतः दिवसभर गुणगुणत बसतो व अस्वस्थ होतो. एखाद्या व्यक्तीने काय बोलावे हे आपण ठरवू शकत नाही. आपण मात्र हे ठरवू शकतो की कोणत्या गोष्टींना आपण महत्त्व द्यायचे. तसेच विवेकी विचारसरणीनुसार आपनास आपल्या मनाविरुद्ध एखाद्याने वाईट वाक्य बोलल्यास तो संपूर्ण व्यक्तीच वाईट असा ठसा मारणे ही अयोग्यच.
मग तुकोबारायांच्या म्हणण्यानुसार कानाने बहिरा व गांधीजींच्या माकडाच्या कानावरील हाथाचा अर्थ म्हणजे कानी पडणाऱ्या अस्वस्थता वाढवणाऱ्या गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे व विवेकाने योग्य वाटणाऱ्या गोष्टींचे श्रवण करणे व त्यावर मनन करणे. Filter the words while hearing. i.e. Selective Deafness…
३) बुरा मत बोलो :
आपण प्रत्येक जण कधी ना कधी दुसऱ्यांना वाईट बोलून दुखवत असतो. मात्र असे बोलल्यानंतर त्याने मला असे केले म्हणूनच मी त्याला वाईट बोललो असे स्पष्टीकरण द्यायला विसरत नाही. दुसऱ्याने बोलले ते वाईट आणि आपण बोलले ते त्याचे प्रत्युत्तर असे विश्लेषण देऊन आपण आपल्या वाईट बोलल्यावर पांघरूण घालत असतो, मात्र खरे तर तेही वाईटच.
आपल्या कानी काय पडेल किंवा आपल्या दृष्टी काय दिसेल हे आपल्या आवाक्याबाहेरील गोष्टी आहेत. परंतु आपणास काय बोलायचे हे मात्र संपूर्णतः आपल्या आवाक्यातील गोष्ट आहे. आपल्या बोलण्याने दुसर्यास दुःख होत असेल , आपले नातेसंबंध दुरावत असतील तर असे बोलने विवेकीने विचार करून टाळावे.
तुकोबारायांचा अभंगातील मुकेपणा किंवा गांधीजीच्या माकडाच्या तोंडावरील हाथ म्हणजेच जे वाक्य आपल्या मुखातून निघाल्याने दुसऱ्याला दुःख देईल किंवा त्यांची अस्वस्थता वाढवेल अशी वाणी टाळावी. If our speach disturbs others , better to keep mum wisely… Selective Mutism
तुकोबाराय आणि गांधीजीनुसार जर आपण आपली दृष्टी , आपले ऐकणे आणि आपली वाणी योग्य प्रकारे वापरल्यास आपल्या स्वतःची आणि इतरांची अस्वस्थता कमी करू शकतो. या साठी हवी विवेकी दृष्टिकोनाची जोड ..
त्यामुळेच तुकोबाराय म्हणतात
पापांची वासना नको दावू डोळा ! त्याहूनी आंधळा बराच मी !!
डॉ. जगदिश ज्ञानोबा नाईक
मानसोपचारतज्ञ , परभणी
९४२२१०९२००