श्री शिवाजी महाविद्यालयात शालेय गणित स्पर्धा संपन्न
जवाहर विद्यालय प्रथम, तर बालविद्या द्वितीय
परभणी, प्रतिनिधी – येथील श्री शिवाजी महाविद्यालयातील गणित विभाग आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या गणित संकुलाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ जिल्हास्तरीय गणित प्रश्नमंजुषा स्पर्धा-२०२१’ उत्स्फूर्त प्रतिसादात दिनांक १८ डिसेंबर (शनिवारी) रोजी संपन्न झाली. या स्पर्धेत जिंतूरच्या जवाहर विद्यालयाचा संघ प्रथम तर परभणी येथील बालविद्या मंदिर शाळेचा संघ द्वितीय आला. २२ डिसेंबर रोजी नांदेड येथील विद्यापीठात होणाऱ्या अंतिम फेरीसाठी हे दोन्ही संघ पात्र ठरले आहेत.
स्पर्धेचे उदघाटन प्रसंगी प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव म्हणाले, गणित हा विषय विज्ञान शाखेचा मुळ विषय मानला जातो. विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअर घडवण्यासाठी गणित विषयाचा महत्त्वाचा वाटा असतो. त्यामुळे शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांनी गणितात लक्ष देणे गरजेचे आहे. अशा स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयात आवड निर्माण होते असेही ते म्हणाले. बक्षीस वितरणासाठी प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव यांच्यासह उपप्राचार्य डॉ.श्रीनिवास केशट्टी, गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.रोहिदास नितोंडे, गणित विभागप्रमुख डॉ.चारुदत्त बेले, प्रा.शरद कदम आदींची उपस्थिती होती.
गणिताचार्य रामनुजाचार्य यांच्या जयंती निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय या स्पर्धेसाठी जिल्ह्याभरातील दहा शाळेंच्या संघाची निवड करण्यात आली होती. एका संघात चार विद्यार्थ्यांचा समावेश होता. जिल्हास्तरीय या स्पर्धेत विजेत्या संघात मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
सदरील स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रा.डॉ.रामदास टेकाळे, डॉ.चारुदत्त बेले, प्रा. शरद कदम आणि प्रबंधक विजय मोरे यांनी काम पाहिले.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्रा.संकेत मोहरे, प्रा.उजमा बेगम सय्यद, प्रा.किरण साबणे, प्रा.पूनम जाधव, प्रा.स्वामी, सुरेश पेदापल्ली, सय्यद सादिक, साहेब येलेवाड आदींनी सहकार्य केले.