तुका म्हणे : भाग २९ : MINDFULNESS
आम्ही टिपेश्वर अभयारण्यमध्ये व्याघ्र दर्शनासाठी आलो होतो. व्याघ्र दर्शनासाठी आतुरलेले डोळे सकाळच्या व दुपारच्या जंगल सफारीमध्ये वाघाचा शोध घेत घेत थकले होते परंतु वाघ काही दिसला नाही. आम्ही सर्वजण दुःखी होऊन हॉटेलवर परतलो परंतु ज्ञानदा मात्र खूप खूष दिसत होते. ती सांगू लागली, मला हरिण, नीलगाय, वानरं, ईगल, बर्ड ऑफ पॅराडाईज, हूद हुद, अनेक प्रकारची झाडे फुले दिसली. तिची खुशी तिच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होती, आम्ही मात्र वाघोबांनी दर्शन न दिल्यामुळे दुखी होतो. आमच्या चेहऱ्यावरील बारा वाजलेले पाहून आमचा सफारी चालक म्हणाला, सफारीतील प्रत्येक क्षणाचा , प्रत्येक गोष्टींचा, त्या परिस्थितीचा आनंद घेतला तर वाघ न दिसल्याचे एवढे दुःख जाणवले नसते. सुख व दुःख हे गणित मांडताना तुकाराम महाराजांनी खूप छान सांगितले आहे ,ते असे
तुका म्हणे ,
सुख पाहतां जवापाडें । दुःख पर्वता एवढें ॥१॥
धरीं धरीं आठवण । मानीं संताचें वचन ॥ध्रु.॥
नेलें रात्रीनें तें अर्धें । बाळपण जराव्याधें ॥२॥
तुका म्हणे पुढा । घाणा जुंतीजसी मूढा ॥३॥
तुकाराम महाराज म्हणतात, जीवनात सुख हे फार थोडं आहे व दुःख मात्र पर्वताएवढे असं आपण पाहतो. आयुष्याचे गणित मांडताना ते म्हणतात, मानवाच्या आयुष्याची अर्धे वर्ष रात्री झोपण्याचा जातात, बाकीचे बालपण , म्हातारपणात, आजारपणाचा जातात. त्यामुळे ते म्हणतात असे आयुष्य निरर्थक गेले तर घाण्याला बांधलेल्या बैलाप्रमाणे आपण सुखदुःखात फिरत राहू. त्यामुळे प्रत्येक क्षण आनंदी जगत रहा.
सु:ख आणि दुःख म्हणजे काय ?
सु:ख म्हणजे सु हा धातु चांगले असे दर्शवितो आणि ख म्हणजे आकाश. ज्याचे आकाश चांगल्या गोष्टींनी विस्तारत गेले आहे अशा बाबी म्हणजे सु:ख देणाऱ्या.. तर दुःख म्हणजे ज्याचे आकाश संकुचित होत गेले आहे अशा बाबी.. ही दोन्ही आकाश अनुभवणारा सर्वात महत्त्वाचा दुवा म्हणजे आपला दृष्टिकोन. एखादी व्यक्ती, परिस्थिती किंवा गोष्टीकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो यावर त्या गोष्टीबाबत अनुभवणारे सु:ख व दुःख अवलंबून असते. स्वतःला प्रत्येक क्षणाला आनंद मिळवून देण्यासाठी आवश्यक असते आपण माईंडफुल असणे.
माईंडफुल कसे राहावे ? :
१) भोवतालच्या परिस्थितीची जाणीव : समजा आपण प्रवास करत असताना ट्रॅफिक जॅम झाला, पहा आपली कशी चिडचिड होते आणि आपण किती अनावश्यक हॉर्न वाजवत असतो. त्यामुळे आपणास आपली अस्वस्थता कमी करायची असेल तर प्रथमतः त्या परिस्थीतीची पूर्णतः जाणीव करून घेणे आवश्यक असते. परिस्थितीची जाणीव करून न घेतल्यामुळे आपण बिनकामाचा हॉर्न देत असतो. पाहाना हॉर्न देऊन आपण आपली स्वतःची , दुसऱ्यांची अस्वस्थता वाढवतो. माईंडफुलनेस ची पहिली पायरी म्हणजे भोवतालच्या परिस्थितीची जाणीव. ही जाणीव आपणास माहिती देतो आपण काय करू शकतो आणि काय नाही.
२) सध्या घडीला आनंद देणाऱ्या बाबींवर लक्ष : आपण ट्रफिकमध्ये अडकलेले असताना खूप लांबवर रांगा लागलेल्या असतील आणि खूप वेळ लागणार असेल तर चिडून किंवा हॉर्न वाजवून काही उपयोग होणार नाही. मग आपण आजुबाजूस लक्ष दिल्यावर आपणास कळेल, नक्कीच बऱ्याच गोष्टी आनंद देनाऱ्याही दिसतील मग त्यात गाडीतील सुमधुर गाणी असतील, खेळणारी लहान मुले असतील, दुकानातील लोक असतील ई..मग अशावेळी आपणास ठरवायचे असेल अस्वस्थ करणाऱ्या गोष्टींवर लक्ष द्यायचे की आनंद देणाऱ्या बाबींवर लक्ष केंद्रित करायचे. सध्याच्या घडीला आपल्या हातात समस्या सोडवणे शक्य नसेल तर आपण आजूबाजूच्या आनंद देणाऱ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करून आपली अस्वस्थता कमी करू शकतो. म्हणजेच माईंडफुलनेस ची दुसरी पायरी म्हणजे आनंद देणाऱ्या बाबींवर लक्ष केंद्रित करणे.
३) कोणत्याही परिस्थितीत स्वतःला रिलॅक्स ठेवण्याचा विचार व प्रयत्न : बऱ्याच वेळा आपल्या मनाविरुद्ध कोणतीही गोष्ट झाली की आपण प्रचंड अस्वस्थ, चिंताग्रस्त होतो. अस्वस्थपणामुळे आपली बैचैनी , घबराट वाढायला लागते. अशावेळी आपणास जाणीवपूर्वक स्वतःला रिलॅक्स करण्याचा प्रथम विचार आणावा लागतो व त्यावर प्रयत्न करावा लागतो जसे रिलॅक्स होण्यासाठी जाणीवपूर्वक श्वासावर लक्ष केंद्रित करून दीर्घ श्वास घेणे व हळूवार सोडणे, स्नायूंची शिथिलता आणणे ई..
४) विवेकी दृष्टिकोन : तुकोबाराय म्हणतात सुख पाहता जवापाडे.. यामध्ये ते ” पाहता ” म्हणतात म्हणजेच आपण त्या गोष्टीकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो असे त्यांना अपेक्षित असावे. बऱ्याच वेळा आपण वाईट गोष्टींकडे पर्वताएवढ्या दुःखासारखे पाहतो तर सुखाकडे अगदी नगण्यतेणे म्हणजेच जवासारखे पाहतो. आपण एखाद्या परिस्थितीकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो त्यावर त्याचे मूल्यमापन सुख-दुःखात होत असते. तसेच आपण सुख म्हणजे ध्येय प्राप्तीच अशी मनाशी खूणगाठ बांधून ठेवतो. परंतु सुख हे कार्यमग्नतेतूनही मिळते. त्यामुळे आपण म्हणतो प्रोसेस सॅटिसफॅक्शन हे एंड गोल सटीस्फॅक्शनपेक्षा दीर्घकालीन असते.
सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आनंद मिळवायचा असेल तर तो आजच्या सध्याच्या चालू घडीमध्ये मिळवावा लागेल तोही माइंडफुलनेसने.. म्हणूनच तुकोबाराय म्हणतात आपल्या आयुष्यातील अर्धे दिवस झोपेत जातात, उरलेले बालपणात, म्हातारपणात आणि आजारपणात मग आपण आनंद केव्हा मिळवायचा.. सुखी होण्यासाठी मिळालेला वेळ म्हणजे तो सध्याची चालू घडी. परंतु आपण बऱ्याच वेळा भविष्याच्या चिंतेने किंवा भूतकाळातील घटनेमुळे अस्वस्थ होऊन सध्याचा सुखाचा वेळ वाया घालवतो आणि दुःख पर्वताएवढे करून ठेवतो. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात,
सुख पाहता जवापाडे ! दुःख पर्वता एवढे !!
डॉ. जगदिश ज्ञानोबा नाईक
मानसोपारतज्ज्ञ, मन हॉस्पिटल परभणी,9422109200