Unlock : ३१ मार्चपासून कोरोना निर्बंधातून होणार सुटका
नवी दिल्ली – केंद्रीय गृह मंत्रालयाने देशभरात कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी कठोर निर्बंध लागू केले होते. पण आता केंद्राने हे कठोर निर्बंध शिथिल करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. ३१ मार्चपासून देशभरात कोरोनाचे निर्बंध शिथिल होणार (Corona restrictions will be relaxed across the country from March 31) आहे. पण असे असले तरी मास्क लावणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.
संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या करोनाचा देशात प्रादुर्भाव आता कमी होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्वात मोठी घोषणा केली आहे. 31 मार्चपासून देशातील सर्व करोना निर्बंध हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे तब्बल दोन वर्षांनी देशातील जनता निर्बंधमुक्त होणार (After two years, the people of the country will be free from restrictions) आहे. पण, मास्क, सोशल डिस्टन्सिगचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.
जगभरातील काही देशांमध्ये ओमिक्रॉनचा सब व्हेरिएंट BA.2ने धुमाकूळ घालत आहे. चीन, युरोप, अमेरिकेत पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. जगात एकीकडे ओमिक्रॉनच्या सब व्हेरिएंटमुळे चिंता वाढली असली तरी भारतात मात्र कोरोना नियंत्रित आल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतात दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी घट होत आहे. सध्या भारतात २३ हजारांहून अधिक कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. या दृष्टीकोनातून केंद्र सरकारने आता देशातील कोरोनाचे निर्बंध दोन वर्षांनंतर शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकारने २४ मार्च २०२० रोजी आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ (DM Act २००५) अंतर्गत पहिल्यांदा कोरोनाच्या मार्गदर्शन सूचना जारी केल्या होत्या. त्यानंतर कोरोना परिस्थितीनुसार अनेक वेळा मार्गदर्शन सूचनेत बदल करण्यात आले. आत सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवून केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला म्हणाले की, ‘२४ महिन्यात महामारी व्यवस्थापनासाठी विविध प्रकारच्या क्षमतांचा विकास केला गेला. यामध्ये चाचणी करणे, देखरेख ठेवणे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, उपचार, लसीकरण, रुग्णालयांचा विकास याचा समावेश आहे. यासोबत सर्वसामान्यांमध्ये कोरोनासंदर्भात जागरुकता वाढली आहे. ते कोरोनाला रोखण्यासाठी अनुकूल व्यवहार करू लागले आहेत.’
पुढे भल्ला यांनी पत्रात लिहिले की, ‘राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी महामारी व्यवस्थापनसाठी वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न केले आहेत. गेल्या सात आठवड्यात कोरोनाच्या नव्या रुग्णासंख्येत मोठी घट झाली आहे. २२ मार्चला देशात एकूण २३,९१३ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट ०.२८ टक्के झाला आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रयत्नामुळे आतापर्यंत देशात १८२,५६ कोटी लसीकरण झाले आहे. ३१ मार्चला सध्याच्या आदेशाचा कालावधी संपल्यानंतर गृह मंत्रालयाकडून पुढे कोणताही आदेश जारी केला जाणार नाही.’