….तरच जिल्हा क्षयमुक्त होईल-जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राहुल गीते
परभणी,दि 25ः
क्षयरोग निदान झाल्यास त्याचा उपचार शासनातर्फे करण्यात येईल त्यामुळे संशयित रुग्णांनी लवकरात लवकर निदान करून घ्यावे व उपचार घ्यावा तरच जिल्हा क्षयमुक्त होईल असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राहुल गीते यांनी जागतिक क्षयरोग दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात केले आहे.
जागतिक आरोग्य संघटना क्षयरोग संदर्भात लक्ष वेधून घेण्यासाठी तसेच क्षयरोग निर्मूलनाचे संदर्भात महत्त्वाच्या बाबींवर प्रकाश टाकण्यासाठी दर वर्षी 24 मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिनाचे आयोजन करून घोषवाक्य प्रसारित करते. यावर्षीचे घोषवाक्य हे टी बी संपविण्यासाठी गुंतवणूक करा व जीव वाचवा असे आहे.
जिल्हा क्षयरोग मुक्त करण्यासाठी सर्व स्तरातून खाजगी वैद्यकीय व्यवसायिक, खाजगी केमिस्ट अँड ड्रगिस्ट, खाजगी पॅथॉलॉजी लॅब, खाजगी एक्सरे सेंटर तसेच खाजगी उपचार घेणारे क्षयरुग्ण यांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवून राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत सर्व शासकीय योजनांचा लाभ घेऊन आरोग्य यंत्रणेस सहकार्य करावे असे आवाहन देखील डॉ गिते यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या कै. बाबुराव गोरेगावकर सभागृहात आयोजित जागतिक क्षयरोग दिनानिमित्त कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. कालिदास निरस यांनी केले. याप्रसंगी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.कल्याण कदम, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. रावजी सोनवणे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गणेश सिरसुलवार, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विद्यासागर पाटील, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. मंजुषा कुलकर्णी, डॉ. रामेश्वर नाईक डॉ. मुरलीधर सांगळे, डॉ. संजय हरबडे, सुनील कोकडवार, शशी डोलारकर, विठ्ठल रनबावरे इत्यादी सह बहुसंख्येने आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.