गंगाखेडला किसान सभा काढणार गल्हाटी प्रकल्पग्रस्तांचा गुरुवारी मोर्चा
परभणी,दि 06 (प्रतिनिधी)ः गंगाखेड तालुक्यातील गल्हाटी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी भूसंपादन मोजणीस नकार दिलेला असून त्या विरुद्ध दिनांक ७ एप्रिल गुरुवार रोजी मोजणीस विरोध करण्यासाठी गंगाखेड उपजिल्हाधिकारी कचेरीवर प्रकल्पग्रस्तांच्या प्रचंड मोर्चाचे किसान सभेच्या वतीने आयोजन करण्यात आलेले आहे.
सदर गल्हाटी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात बोरगाव बु (ता पालम) वरवटी, जोगलगाव, फुगनरवाडी, कुंडगीरवाडी, गुंजेगाव, राणीसावरगाव या गावातील बागायत जमिनी संपादित केल्या जाणार आहेत. या बुडीत क्षेत्रात टाकळवाडी, बोथी आणि राणीसावरगाव लघु पाटबंधारे प्रकल्पाखालील बागायत जमिनी कवडीमोल भावाने संपादित केल्या जात आहेत आणि वरवटी हे संपूर्ण गाव विस्थापित करण्यात येत आहे. सदर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी वेळोवेळी शासनास निवेदने सादर केली परंतु जमीन संपादित करण्यापूर्वीच प्रकल्पाच्या ठेकेदारास शासनाने नियमबाह्य रित्या पैसे देखील अदा केले आहेत असा आरोप आंदोलकांनी केला आहे.याच बरोबर मासोळी प्रकल्पाची देखील उंची वाढवून उपलब्ध होणारे सर्व पाणी लाभ क्षेत्रात न देता धरणातील ३३ दलघमी पाणी साठा १०१ किमी पुढील कालव्याद्वारे नांदेड जिल्ह्यास देण्यात येणार आहे. मुळात मासोळी प्रकल्पात पाणीसाठा केवळ २१ दलघमी उपलब्ध आहे. यामुळे इसाद, मर्डसगाव, ढवळकेवाडी, मालेवाडी, नरळद, इरळद, गोपा,वाघलगाव, झोला, पिंपरी आदी लाभक्षेत्रातील गावे कोरडवाहू बनण्याचा धोका आहे तर आधीच पुनर्वसित असलेल्या माकणी आणि चिलगरवाडी, खोकलेवाडी, सिरसम, या गावात बुडीत क्षेत्र वाढण्याचा धोका आहे.परभणी जिल्ह्यातील विविध प्रकल्पांचे पाणी नांदेड जिल्ह्यास नेण्यासाठी सत्ताधारी सदोदित प्रयत्नशील आहेत आत्तापर्यंत येलदरी सिद्धेश्वर प्रकल्प, दिग्रस उच्चस्तर बंधारा तसेच आता होवू घातलेल्या गंगाखेड तालुक्यातील गल्हाटी प्रकल्पाचे पाणी आणि मासोळी प्रकल्पाची उंची वाढवून आणि मासोळी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील गावे कोरडवाहू बनवून माजलगाव कालव्याद्वारे पाणी नांदेड जिल्ह्यात नेले जात आहे. या प्रकरणी जनतेत तीव्र असंतोष निर्माण होत आहे.सदर प्रकरणी गंगाखेड तालुक्यातील गल्हाटी प्रकल्पाची प्रस्तावित दि १२ एप्रिल २२ रोजीची भूसंपादन मोजणी रद्द करण्यात यावी आणि मासोळी प्रकल्पाची उंची वाढविण्या ऐवजी सदर प्रकल्पातील गाळ काढून लाभक्षेत्रातील गावांचा पाणी हक्क कायम राखावा या मागण्यासाठी उपजिल्हाधिकारी गंगाखेड कचेरीवर किसान सभेच्या वतीने दि ७ एप्रिल गुरुवार रोजी मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे.या मोर्चाचे नेतृत्व कॉम्रेड राजन क्षीरसागर, ओमकार पवार सुभाष माने चंद्रकांत माने, अशोक कदम, मोतीराम राठोड, भारत शिसोदे, गणेशराव शिसोदे गोपीनाथराव भोसले, पिराजी माने, नागोराव फुगनर, तुकाराम डूमनर, इत्यादी कार्यकर्ते करीत आहेत.