जीवनाचं परिवर्तन हे बुद्धीच्या परिवर्तनातूनच होत असते -ह.भ.प.चैतन्य महाराज देगलूरकर

0 63

 

सेलू,दि 17 (प्रतिनिधी) ः
जीवनात माणसाला यशस्वी व्हायचे असेल तर आधी वाईटाची निवृत्ती करावी लागते तरच चांगल्याचा विचार करता येतो.कारण जीवनाचं परिवर्तन हे बुद्धीच्या परिवर्तनातूनच होत असते .असे प्रतिपादन प्रसिद्ध प्रवचनकार ह भ प चैतन्यमहाराज देगलूरकर यांनी पसायदान प्रवचन मालेतील पुष्प गुंफताना केले.
येथील वसंत प्रतिष्ठान च्या वतीने साईबाबा मंदिरात आयोजित प्रवचन मालेचे आयोजन करण्यात आले आहे .या प्रवचन मालेचे हे तिसरे वर्ष आहे.17 रोजी या प्रवचनमालेच्या दुसऱ्या पुष्पात पसायदान विषयावर विस्तृत मार्गदर्शन करतांना देगलूरकर महाराजांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या विविध श्लोकांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.सुरुवातीला वसंत प्रतिष्ठानच्या वतीने श्री.के.बा.शिक्षण संस्थेचे सचिव महेशराव खारकर,ऍड.उमेशराव खारकर यांनी संतपूजन केले.
यावेळी पुढे बोलतांना ह.भ.प.चैतन्य महाराज देगलूकर यांनी सांगितले की, समाजात व्यसनी लोकांची संख्या वाढत आहे.त्यांनी व्यसने सोडून अध्यात्माकडे वळल्यास त्यांच्या जीवनात समृद्धीचा मार्ग येण्यास वेळ लागणार नाही.परंतु बुद्धी वाईट असेल तर मात्र जीवनाचं अधःपतन झाल्याशिवाय राहणार नाही.
दृष्ट पुरुष तसेच ठेऊन जर संत ज्ञानेश्वर महाराजांनी जर जगाच्या कल्याणाची मागणी केली असती तर शक्य झाले नसते म्हणून जो ” जे खळांची व्यंकटी सांडो ” अशी मागणी संत ज्ञानेश्वर यांनी पसायदानात केली आहे.या जगतामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवात थोड्या अंशाने का होईना पण दुष्टता आहे.पण ही दुष्टता नष्ट करण्याची मागणी पसायदानात केली आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम,संत नामदेव यासारखी सर्व संत मंडळी स्वार्थी नव्हती म्हणून आज महाराष्ट्राला उदात्त संत परंपरा लाभली आहे.नामाच्या माध्यमातून व्यक्तीला जीवनात मुक्ती मिळते.ज्ञानाची अपेक्षा या जीवनात प्राण्यांना नसते फक्त माणसाला ज्ञानाची अपेक्षा असते.मनुष्याने मनुष्य म्हणून जन्माला आल्यावर मनुष्यत्व धर्माचे पालन केलेच पाहिजे.म्हणून व्यक्तीच्या प्रगतीची चिंता संत ज्ञानेश्वर महाराजांनी केली आहे.काही लोक मानवामध्ये येऊन संत होतात,काही लोक मानवच राहतात तर काही लोक मानवात जन्म घेऊन राक्षसी वृत्तीचे होतात.पण जे संत होतात त्यांचा जन्म जगाच्या कल्याणा संतांची विभूती या उक्तीप्रमाणे केवळ जगाच्या कल्याणासाठी ते संत आयुष्यभर मार्गक्रमण करीत असतात.यावेळी ह.भ.प.चैतन्य महाराज देगलूरकर यांनी संत,आजच्या काळातील परिस्थिती,संतांची शिकवण,आणि मानवाने दुष्कृत्य सोडून संतांच्या शिकवणीच्या मार्गावर चालावे याविषयी विस्तृत मार्गदर्शन केले. अनेक मान्यवरा सह या प्रवचनास पुरुषांची व महिलांची देखील मोठी गर्दी आहे .या प्रवचन मालेचे सुत्रसंचलन भागवताचार्य प्रा .संजय पिंपळगावकर यांनी केले .शेवटी पसायदानाने आजच्या प्रवचन मालेची सांगता झाली .यावर्षीच्या प्रवचन मालेचा दि १८ एप्रिल हा शेवटचा दिवस आहे .

error: Content is protected !!