तुका म्हणे : भाग ३२ : धीर
एक ६० वर्षाचे ग्रहस्थ ओपीडीमध्ये आले. ते सांगू लागले, माझे मोतीबिंदूचे ऑपरेशन आहे. डोळ्यांच्या डॉक्टरांनी आज सकाळची तारीख दिली होती. जसाही मी ऑपरेशन थेटरमध्ये जाण्यास निघालो माझ्या मनाची अस्वच्छता खूप वाढली व मी ऑपरेशन थेटरमध्ये पायही ठेवू शकलो नाही. माझे मन खूप अस्वस्थ होत आहे, मी ऑपरेशनसाठी माझा धीर धरू शकत नाही. ही सर्व चर्चा बाजूलाच बसलेले एक बाबा ऐकत होते, ते म्हणाले तुकाराम महाराजांनी खूप छान धीराबद्दल सांगून ठेवले आहे. ते असे,
शोकें शोक वाढे । हिमतीचे धीर गाढे ॥१॥
येथें केले नव्हे काई । लंडीपण खोटें भाई ॥ध्रु.॥
करिती होया होय । परी नव्हे कोणी साह्य ॥२॥
तुका म्हणे घडी । साधिलिया एक थोडी ॥३॥
तुकाराम महाराज म्हणतात, एखाद्या गोष्टीचा शोक केला भीती बाळगली तर ती वाढतच जातो, त्याकरिता धीर धरला पाहिजे, हिंमत ठेवली पाहिजे. पुढे ते म्हणतात, हे माझ्या बंधुंनो या मानवी जीवनात कोणतीही गोष्ट न घडण्यासारखी नाही , तेथे भित्रेपणा वाईट आहे. तुम्ही मला सहाय्य कराल काय? हा प्रश्न कित्येकांना विचारला असता ते म्हणतात, करू हो ! असे केवळ हो म्हणणारे लोक खूप आहेत ; पण प्रत्यक्ष मदतीला धावून येणारे लोक कमी आहेत. त्यामुळे तुकोबाराय म्हणतात, या क्षणभंगुर जीवनात एक जरी क्षण साधला तरी जीवन सफल होईल.
आपण बऱ्याच वेळा अधीर होतो. कोणतेही काम करण्यापूर्वी, काम जमत नसेल तर मनाची अस्वस्थता प्रचंड वाढते व आपण अधीर होतो. अशावेळी आपणास बरेचजण सल्ला देतात “थोडा धीर धर ! होईल सगळं बरं !”
आपण अधीर का होतो ?
एखाद्या परीक्षेवेळी आपण खूप अस्वस्थ होतो त्याचे मूळ कारण ही परीक्षा नसून त्या परीक्षेबद्दल, परीक्षेच्या निकालाबद्दल केलेला अविवेकी विचार होय. अशी अधीरता वाढवणारी काही कारणीमिमांसा :
१) मनातील भीती : एखादी कृती करत असताना किंवा एखाद्या समस्येस तोंड देत असताना आपल्या मनात बऱ्याच वेळा भीती उत्पन्न होते. या भीती मागील महत्त्वाचे कारण म्हणजे ती कृती करण्यापूर्वी आपण स्वतःशी केलेले स्व:गत. आपण स्वतःशी कृतीपूर्वी काहीतरी बोलत असतो, बऱ्याच वेळा या बोलण्याची सुरुवात “अरे बापरे ! भयंकरच!” अशी होते. म्हणजेच कृतीबद्दल किंवा त्याच्या परिणामाबद्दल केलेले आपले महाभयंकरीकरणाचे विचारच आपणास घाबरवत असतात. त्यानंतर मात्र आपल्याला इतर कशाची भीती वाटण्यापेक्षा भीतीचीच भीती वाटायला लागते. डॉक्टर अल्बर्ट एलिस यास ‘ डिस्टर्बन्स अबाउट डिस्टर्बन्स! ‘ असे संबोधतात. म्हणूनच तुकोबाराय म्हणतात, ‘ शोकें शोक वाढे । हिमतीचे धीर गाढे ॥ ‘
२) भविष्याची चिंता : आपल्या अधीरतेचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे भविष्याची चिंता. एखादी कृती करण्यापूर्वीच त्याच्या परिणामांची चिंता आपल्या मनाची अस्वस्थता वाढवत असते . जसे एखाद्यावेळी भाषण करण्यास सुरुवात करण्यापूर्वीच आपण विचार करतो जर भाषण खराब झाले तर… आणि हीच मानसिकता आपल्या मनाच्या अस्वस्थतेचे मूळ कारण ठरते.
३) अट्टाहासी वृत्ती : एखादी कृती किंवा समस्या मला १००% पार करताच आली पाहिजे अशी अट्टाहासी मानसिकता आपली अस्वस्थता वाढवते. एखादी कृती संपूर्णतः न जमल्यास लोक काय म्हणतील ? मला हसतील, मी संपूर्णतः अपयशी ठरेल, मी नालायक आहे असे विचार या अट्टाहासी मानसिकतेतून तयार व्हायला लागतात व आपली अधीरता वाढवते.
४) एखाद्या गोष्टीबाबत ज्ञानाचा अभाव : आपणास एखाद्या गोष्टीबाबत संपूर्ण ज्ञान नसल्यास व ती कृती आपण करण्याचा अनाठाई प्रयत्न करत असल्यास आपण अस्वस्थ होतो. इतरांना, माझ्या मित्रांना ती कृती जमते व मला नाही अशा भावनेतून आपण अस्वस्थ होतो. मनुष्य म्हणून संपूर्ण गोष्टीची माहिती असणे , स्वयंपूर्ण असणे अशक्यच.
धैर्य म्हणजे काय ?
भीतीच न वाटणं म्हणजे धैर्य नव्हे ; तर वाटलेल्या भीतीवर प्रयत्नपूर्वक मात करणं म्हणजे धैर्य !
भीती ही माणसाच्या आदिमभावानेपैकी एक भावना. त्यामुळे सर्वांनाच भीती उत्पन्न होणे सहाजिकच.. परंतु मनाची अस्वस्थता कमी करण्यासाठी करावी लागते ते भीतीवर जाणीवपूर्वक मात त्यासच आपण धैर्य म्हणजेच सुधीर म्हणतो..
१) जाणीवपूर्वक भीतीवर मात : विवेकी विचारसरणीनुसार एखाद्या गोष्टींबद्दल किंवा परिस्थितीबद्दलची भीती ही आपल्या विचारांवर म्हणजेच दृष्टिकोनावर अवलंबून असते. भीती कमी करण्यासाठी आपणास वाटणाऱ्या चिंतेमागची चुकीची गृहीतक मनातून समूळ उखडली पाहिजे ते ही विवेकाने.
२) सहनसिद्धी (Frustation tolerance) : एखादी कार्यसिद्धी न झाल्यास किंवा अप्रिय घटना घडल्यास आपण अस्वस्थ, अधीर होतो व त्यातून निराशा उत्पन्न होते. परंतु प्रत्येक गोष्ट माझ्या मनाजोगीच व्हावी असे घडणे अशक्यच.. अशावेळी आपण बऱ्याच वेळा निराश होतो स्वतःवर, इतरांवर, परिस्थितीवर. अशी मनाची अस्वस्थता कमी करण्यासाठी जाणीवपूर्वक शिकावी लागते ते सहनसिद्धी म्हणजेच frustration tolerance. संत ज्ञानेश्वरांनीही सहनसिद्धीस खूप महत्त्व दिले आहे. Frustration tolerance वाढवण्याची पहिली पायरी म्हणजे परिस्थितीचा स्वीकार.
३) सध्या घडीचा आनंद : एखादी कृती चांगल्यात चांगली करण्याचा प्रयत्न करणे हे आपल्या हातात असते, परंतु त्याचे परिणाम काय होतील हे ठरवणे आपल्या हातात नसते . म्हणून आपल्या आवाक्यातील गोष्टीवर आपण भर दिल्यास आपल्या मनाची अधीरता कमी होते. तुकोबाराय म्हणतात, ” तुका म्हणे घडी । साधिलिया एक थोडी ॥”
भीती ही जरी एक आपली आदिमभावना असली तरीही आपण त्या भीतीवर मात करू शकतो जाणीवपूर्वक प्रयत्नांतून म्हणजेच धैर्याने.. म्हणूनच या भीतीला अधीरतेने वाढवण्यापेक्षा धीराने कमी करणे शक्य असते असे तुकोबाराय म्हणतात,
“शोकें शोक वाढे । हिमतीचे धीर गाढे ॥”
डॉ. जगदिश ज्ञानोबा नाईक,
मानसोपचारतज्ञ, मन हॉस्पिटल, परभणी
९४२२१०९२००