खत दरात भरमसाठ वाढ, शेती कशी करायची ?शेतकरी नेते पियुष रेवतकर यांचा प्रश्न
दशरथ ढोकपांडे
हिंगणघाट,दि 08 ः
रशिया – युक्रेन या देशात गेली दोन महिने उडालेला युद्धाचा भडका तसेच चीनमध्ये कोरोना प्रादुर्भावामुळे औषध निर्मिती करणाऱ्या खत उत्पादक कंपन्यांची उत्पादन प्रक्रिया बंद आहे. त्यातच देशभरात इंधनाचे वाढलेले दर या कारणांमुळे शेती उत्पादक सर्वात महत्त्वाचा घटक ठरणाऱ्या रासायनिक खते, औषधे, तण नाशक, कीटकनाशके, मिश्र खते, सूक्ष्म अन्नद्रव्य आदींच्या दरात ३० ते ४० टक्के दरवाढ झाल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.सध्या सोयाबीन, हरभरा, तूर या शेती पिकांचे भाव पडले आहे. त्यातच विजेचा खेळखंडोबा, मजुरी, मशागतीच्या दरात झालेली भरमसाठ वाढ यामुळे तोट्यातील शेती कशी करायची? असा प्रश्न शेतकरी नेते पियुष रेवतकर यांच्या कडून विचारला जाऊ लागला आहे. मागील महिन्यापासून रासायनिक खतांचे भाव टप्प्याटप्प्याने वाढत आहे डी.ए.पी, १०:२६:२६, १५:१५:१५, पोटॅश, युरिया यासह इतर मिश्र खतांच्या किमतीत वाढ होत आहे. रासायनिक खत निर्माण करणाऱ्या कंपन्यांनी खतांची किंमत भरमसाठ वाढवीत असताना केंद्र सरकारकडून खतांचे अनुदान देताना कमी-अधिक पणा होत आहे. परिणामी रासायनिक खतांच्या किमती सातत्याने वाढत आहेत. अशातच डीएपी, युरिया या खतांची मागणी असतानाही विक्रेत्यांकडे खते उपलब्ध होत नसल्याने शेतकरी हतबल ठरत आहे. रासायनिक खतांसह शेती पिकांना रोगराईपासून संरक्षण करणाऱ्या कीटकनाशके, तणनाशके, सूक्ष्म अन्नद्रव्य घटकांच्या किमतीत देखील वाढ झाली आहे. मागील महिन्यात वाढलेले दर पाहता ४० टक्के यांपेक्षा अधिक
औषधांच्या किमती वाढल्या आहेत. औषधनिर्मिती मध्ये प्रमुख घटक असणाऱ्या फॉस्पेट, पोटॅश, ग्लायकोडीन या घटकांच्या उत्पादनांवर जागतिक व संकट उद्भवल्याने शेतीशी निगडीत औषधांच्या व रासायनिक खतांच्या किमतीत वाढ सुरू असल्याने केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांना किफायतशीर दराने खते व औषधे उपलब्ध करण्यास मदत करणे आवश्यक बनले आहे.
सन २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू असा दावा केंद्र सरकारने केला होता. प्रत्यक्षात मात्र रासायनिक खते, फवारणी औषधी व ट्रॅक्टर सारख्या शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूंच्या किमती वाढवून उत्पादन खर्चात सरकारने वाढ केली आहे. शिवाय सध्या पेट्रोल, डिझेलच्या किमतीत झालेल्या दरवाढीचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. मशागतीसाठी ट्रॅक्टर चा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांना अधिक दर मोजावे लागत आहेत. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे.
“रासायनिक खते व फवारणीच्या औषधांचा वापर टाळल्यास संकरित बियाणे यांची शेती पिकच देऊ शकत नाही. खते व फवारणी शिवाय शेतातील रोपे वाढत नाही व वाढले तरी विविध रोगांना बळी पडतात. म्हणून यावर होणारा खर्च शेतकरी टाळू शकत नाही. शिवाय शेतकऱ्यांना शेती कामासाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे. मिळाले तर प्रतिदिन दोनशे ते तीनशे रुपये मजुरी द्यावी लागत आहे. त्यामुळे शासनाने शेती पूरक अवजारे जीएसटी मुक्त करावीत व रासायनिक खते फवारणी च्या औषधींच्या किमती स्थिर ठेवाव्यात अशी आमची मागणी आहे”
पियुष रेवतकर,शेतकरी नेते