तुका म्हणे : भाग ३८ : गुंतवणूक

0 79

 

एका संकुलामध्ये यंत्रसामग्रीचे प्रदर्शन भरले होते. दोन तरुण मोठ्या उत्सुकतेने हे सर्व यंत्रे पाहत होती. ते एका स्टॉलवर थांबले व लघु उद्योगास उपयुक्त असे यंत्र न्याहाळून पाहू लागले. त्यानंतर त्यांनी यंत्राच्या किमतीबाबत विचारले, सल्लागाराने योग्य ती किंमत सांगितली. परत ते दोघे चर्चा करू लागले, काहीच इन्व्हेस्टमेंट न करता एखादा उद्योग चालू करता येईल का ? असा त्यांच्या चर्चेचा सूर होता. दुकानातील सल्लागार हसून त्यांना म्हणाला , तुकाराम महाराजांनी याबद्दल खूप छान सांगितले आहे. ते असे ,
तुका म्हणे
बीज पेरे सेतीं । मग गाडेवरी वाहाती ॥१॥
वांयां गेलें ऐसें दिसे । लाभ त्याचे अंगीं वसे ॥ध्रु.॥
पाल्याची जतन । तरि प्रत्यया येती कण ॥२॥
तुका म्हणे आळा । उदक देतां लाभे फळा ॥३॥

तुकाराम महाराज म्हणतात, शेतीमध्ये बी थोड्या प्रमाणात पेरले जाते , मग एकदा की धान्य उगवले की तो माल गाड्यांमध्ये वाहिला जातो. जे धान्य शेतात पेरले ते वाया गेले असे दिसते परंतु खरे तर त्यांच्या अंगी लाभ असतो ते पेरले तरच धान्य मोठ्या प्रमाणात उगवते. जोपर्यंत कणिस निघत नाही तोपर्यंत केवळ पाल्याचेच जतन करावे लागते व मग त्यानंतर पाल्यातून कणीस बाहेर येताना दिसते. तुकाराम महाराज म्हणतात, झाडाच्या आळ्याला चांगले पाणी दिले तरच आपल्याला फळही चांगले मिळत असते.

आपण प्रत्येक जण आयुष्यात काही काही गोष्टी करत असतो , कोणी नवीन व्यवसायास सुरुवात करतो तर कोणी शिक्षणास.. परंतु प्रत्येक वेळी आपणास काहीना काही गुंतवणूक करावी लागते आणि त्यावेळी आपणास त्याचे फलित माहित नसते. त्यामुळेच बरेचजण निर्णय घेताना अडचणीत येतात.

गुंतवणूक ( इन्व्हेस्टमेंट ) :
१) निर्णयक्षमता ( डिसिजन मेकिंग ) : कोणतेही कार्य हाती घेताना आपण त्याच्या फलीताचा विचार करतो. तसे पाहिले तर कोणताही निर्णय घेताना त्यामध्ये कधी फायदा तर कधी नुकसान होण्याची शक्यता असते. बरेचजण आपण पाहतो निर्णय घेण्यात अक्षम ठरतात ते नुकसान होण्याची मनात भीती बाळगूनच. परंतु आपल्याकडील जमेच्या बाजू , कमतरता आणि नुकसान झाल्यास त्यावरील उपायांचा सारासार विचार केल्यास आपण कोणत्याही बाबतीत निर्णयापर्यंत पोहोचू शकतो.
२) गुंतवणूक : आपणास कोणत्याही कार्य सिद्धीसाठी काहीना काही गुंतवणूक करावी लागते. एखाद्या उच्चपदवी प्राप्त करण्यासाठी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास वेळेची, ज्ञानाची गुंतवणूक करावी लागते तर व्यापाऱ्यास पैशाची, वस्तूंची गुंतवणूक करावी लागते. तुकोबारायांनी म्हटल्याप्रमाणे शेतकऱ्यास बीजाची , मेहनतीची , वेळेची गुंतवणूक करावी लागते. एखादा डॉक्टर माझे दहा वर्षं शिक्षणात गेले असे म्हणू शकतो किंवा एखादा व्यापारी माझे दहा लाख गुंतवणुकीत अडकले असे म्हणू शकतो परंतु वस्तुतः ही गुंतवणूक वाया गेली नसून त्याचा लाभ फलीतामध्ये शेवटी दिसून येतोच. म्हणूनच तुकोबाराय म्हणतात, एका बीजा केला नास । मग भोगिले कणीस ॥ म्हणजेच एक बी जमिनीत पेरले त्याचा नाश झाला तरच आपणास पूर्ण कणीस मिळते. या ठिकाणी एका बी ची गुंतवून एक कणीस देऊन जाते असे तुकोबारायांना सुचवायचे आहे.
३) गुंतवणुकीसोबत पूरक गोष्टींची पूर्तता : एखाद्या व्यवसायामध्ये सुरुवातीस पैसे गुंतवले म्हणजे संपले असे नव्हे तर त्या व्यवसायात लागणाऱ्या सर्व गोष्टींची पूर्तता वेळोवेळी केली तरच तो व्यवसाय वृद्धिंगत होतो. जसे तुकाराम महाराज म्हणतात, बी पेरल्यानंतर त्या झाडाची जोपासनी करणे, त्यास पाणी देणे या गोष्टी आवश्यक असतात तरच योग्य फळ मिळेल. सुरुवातीच्या मुळ गुंतवणुकीनंतर आपणास करावी लागते ती आपल्या वेळेची, ज्ञानाची, श्रमाची, आपल्या संयमाची गुंतवणूक..
४) गुंतवणूकीचे फलित : बहुतांश वेळा आपणास गुंतवणुकीनंतर काही ना काही फायदाच होतो. जसे तुकाराम महाराज म्हणतात, शेतामध्ये काही बी पेरल्यानंतर गाडीभर माल वाहून नेता येतो. परंतु एखादेवेळी आपला निर्णय चुकून नुकसान ही सहन करावे लागते कारण सर्वच गोष्टी आपल्या नियंत्रणात नसून काही गोष्टी निसर्गावर , इतर बाह्य परिस्थितीवर अवलंबून असतात. अशावेळी मात्र मनाची अस्वस्थता वाढू न देता त्या परिस्थितीमध्ये आपण काय चांगले साध्य करु शकतो यावर भर द्यावा. अशा बिकट प्रसंगीही एका गोष्टींची भर पडते ती म्हणजे अनुभवाची..
काही मिळवण्यासाठी काही द्यावे लागते असे म्हणतात, या बाबीसच आपण गुंतवणूक म्हणूया मग ती गुंतवणूक आर्थिक , श्रम , वेळ , ज्ञान अश्या अनेक बाबींची असते . योग्य वेळी, योग्य ठिकाणी , योग्य गुंतवणूक ही शक्यतो लाभदायक ठरते म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात,

बीज पेरे सेतीं । मग गाडेवरी वाहाती ॥
वांयां गेलें ऐसें दिसे । लाभ त्याचे अंगीं वसे ॥

डॉ. जगदिश ज्ञानोबा नाईक,
मनोविकारतज्ज्ञ, मन हॉस्पिटल, परभणी ९४२२१०९२००
dr jagdish naik

error: Content is protected !!