शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संपात एकजुटीने सहभागी व्हावे-राज्याध्यक्ष रा.जा.बडे यांचे आवाहन

0 33

 

परभणी,दि 11 ः मागील अनेक वर्षापासून राज्यातील अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्याच्या संदर्भात शासन उदासीन असल्याचे दिसून आहे. शासन दरबारी मागण्या मान्य करून घ्यावयाच्या असतील तर राज्यातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी २० फेब्रुवारी पासून सुरू होणाऱ्या बेमुदत संपात एकजुटीने सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष रा.जा. बडे यांनी शुक्रवारी (दि.१०) रोजी परभणी येथे केले.
येथील श्री शिवाजी महाविद्यालयात संपन्न झालेल्या जिल्हा बैठकीत ते बोलत होते. महासंघाच्या वतीने १४ फेब्रुवारीपासून राज्यभरात विविध प्रकारचे निदर्शने तसेच २० फेब्रुवारी पासून सुरू होणाऱ्या बेमुदत संपाच्या नियोजनाच्या संदर्भात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव, विभागीय अध्यक्ष प्रताप नागरे, जिल्हाध्यक्ष भारत हत्तीअंबीरे, कार्याध्यक्ष रवींद्र तिळकरी,महाविद्यालय संघटना अध्यक्ष गजानन जाधव आदींची उपस्थिती होती.
संपाची दिशा ठरविण्याच्या संदर्भात बोलताना रा.जा.बडे पुढे म्हणाले, कर्मचाऱ्यांसाठी आश्वसित योजना, १०,२०,३० लाभ योजना, सातवा वेतन आयोग लाभ, जुनी पेंशन योजना, विद्यापीठ कर्मचारी संघटना आदी मागण्या मान्य करून घ्यायच्या असतील तर संघटनात्मक पातळीवरील आपसातील वैयक्तिक हेवेदावे बाजूला ठेऊन कर्मचारीहित लक्षात घेऊन संपात एकजुटीने सहभागी झाले तर शासन दरबारी मागण्या मान्य होतील असेही ते म्हणाले. यावेळी प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव यांनी संघटनात्मक पातळीवर एकजूट असेल तर मागण्या मान्य होतात असे सांगत संपात एकजूट आणि सातत्य ठेवणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.
सदरील बैठकीचे प्रास्ताविक रामभाऊ रेंगे, सूत्रसंचालन प्रल्हाद काळे तर आभार गजानन जाधव यांनी मानले. यावेळी जिल्ह्याभरातील विविध महाविद्यालयातील कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

 

error: Content is protected !!