धनेवाडीच्या 70 शेतकऱ्यांचे वहिवाटीच्या रस्त्यासाठी उपोषण
परभणी,दि 13 : येथील तहसीलदारांनी आदेश देऊनही शेतरस्ता खुला करून दिला नसल्याने 70 शेतकऱ्यांना वहिवाटीसाठी अनंत यातना सोसाव्या लागत आहेत. त्यामुळे सदर रस्ता खुला करून देण्याच्या मागणीसाठी पालम तालुक्यातील धनेवाडी येथील शेतकरी 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरूवात केली आहे. दरम्यान, माजी पंचायत समिती सदस्य रत्नाकर शिंदे यांनी या उपोषणाला भेट देऊन पाठिंबा दिला.
धनेवाडी येथील शेतकऱ्यांच्या जमिनी रावराजुर शिवारात आहेत. येथील सर्वे क्रमांक 26 व 32 मधील शेतरस्ता एका शेतकऱ्याने अडवून बंद केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्याविरुद्ध तहसीलदारांनी 16 डिसेंबर 2022 रोजी आदेश काढून 23 डिसेंबर रोजी सदर रस्ता खुला करण्यासाठी नोटीसाही दिल्या होत्या. तरीही सदर रस्ता खुला करून देण्यात आलेला नाही. परिणामी शेतकऱ्यांना पेरणी पासून ते शेतमाल काढणीपर्यंत प्रत्येक कामासाठी डोक्यावर ओझे वाहवे लागत आहे. म्हणून २ जानेवारी रोजी उपोषणाचा निर्णय घेतला होता. ते उपोषण पालम तहसीलदारांनी सदर रस्ता खुला करून देण्याचे आश्वासन दिल्यामुळे मागे घेतले होते. तरीही न्याय मिळाला नसल्याने 70 शेतकऱ्यांचा शेतमाल, कृषी निविष्ठा, अवजारे डोक्यावर न्यावी लागत आहेत. या दैनंदिन अडचणीच्या विरोधात धनेवाडी येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सकाळी निवेदन देऊन उपोषणाला सुरुवात केली. निवेदनावर मोकिंदा साबळे, मैनाबाई साबळे, किशन साबळे, धोंडीबा साबळे, पुष्पाबाई साबळे, उत्तम साबळे, गिरजाबाई साबळे, बाजीराव साबळे, देवईबाई साबळे, भगवान साबळे, नंदाबाई साबळे, शंकर साबळे, गयाबाई साबळे, अंजन साबळे, गंगाबाई साबळे, राधाबाई साबळे, राधाबाई साबळे, भागीरथी साबळे, माधव साबळे, बळीराम साबळे यांच्यासह आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.